Monday, May 20, 2024

पतंग

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

आजही बालमन पक्ष्याप्रमाणे उडायला अधीर असते. कसं उडायचं? हे शोधतानाच पतंगाशी मैत्री झाली. त्याचा दोर आपल्या हाती असल्याने अप्रत्यक्षपणे आपणच आकाशात उडतो. माणसाने आकाशात मुक्तपणे उडावे, ही इच्छाच पतंगाच्या उत्पत्तीची प्रेरणा होय. ‘पतंग उडवू चला गड्यांनो; पतंग उडवू चला!…’

पतंग कोण उडवीत आहे? असा प्रश्न विचारता लहान मुलगा म्हणाला, पतंग मी उडवीत आहे. पतंगाचे शेपूट म्हणाले, पतंग मी उडवीत आहे. वारा म्हणाला, पतंग मी उडवीत आहे. दोरा म्हणाला, पतंग मी उडवीत आहे. यावर आजोबा म्हणाले, आपण सारे मिळून पतंग उडवित आहोत. साऱ्यांशी गोड बोला, जीवन आनंदानं जगा! हीच शिकवण नववर्षाचा पहिला सण ‘मकरसंक्रांत’ देत आहे.

रथसप्तमीपर्यंत असणारी मकरसंक्रांत हा सूर्याशी जोडला गेलेला सण. या महिन्यात आकाश निरभ्र असते, मंद वारे वाहतात. सूर्याची किरणे अंगावर पडावीत. दूरवर मोकळ्या आकाशाकडे पाहिले जावे, यासाठी पतंग उडविण्याची प्रथा-परंपरा किंवा रिवाज पडला असावा. पूर्वी सकाळी उठून आकाशातील सूर्याला नमस्कार करताना सूर्याची किरणे अंगावर पडत होती.

पतंग हा एक पंखच आहे. विशिष्ट प्रकारचा पातळ कागद, बांबूच्या उभ्या काडीमुळे होणारे दोन समान भाग पतंगाचा समतोल राखतात. वरच्या कामानिकार काडीमुळे मिळणारे निमुळते टोक, पतंगाला वर जाण्यास मदत करते. काचेच्या वस्त्रगाळ पावडरमुळे धार आलेल्या मांजाने दुसऱ्याचा पतंग कापला जातो. उडविणाऱ्याची हाताची बोटेही कापली जातात. हवेमुळे पतंग आकाशात उडत असला तरी धाग्याचा ताण महत्त्वाचा असतो, तो पतंगाला ओढ देतो. पतंग उडविण्याबरोबरच दुसऱ्याचा पतंग काटणे आणि गूल झालेला पतंग मिळविणे, हा आनंद वेगळाच असतो.

वसंतपंचमीलाही काही राज्यांत मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या रंगांचे, आकाराचे, चित्रमय, शेपटीचे-बिनशेपटीच्या पतंगांनी आकाश खुललेले दिसते. पूर्वी पतंगाचा उपयोग संदेश पाठविण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी आणि वाऱ्याची चाचणी घेण्यासाठी करीत होते. राईट बंधूंच्या संशोधनात पतंगाचा मोठा वाटा होता. मानव उचलणाऱ्या पतंगावर खूप प्रयोग झाले. आज विमान प्रवासामुळे आकाशाकडे बघण्याचेही औत्सुक्य कमी झाले. शहरी विकासामुळे माणसांना, पक्ष्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याने पतंग उडविणे कमी झाले; परंतु मनाला निर्मळ आनंद देणारा पतंग उडविणे हा खेळ ‘ख़ुशी, उल्हास, आजादी और शुभसंदेश का वाहक है|’ म्हणून सुरक्षित धागा वापरून मोकळ्या जागेत पतंग उडविण्याचा प्रवाह चालू राहिला पाहिजे.

“अरे, ढील दे रे…” ही साद देऊन, उडविणारा, पतंगाला मोकळे सोडून देतो तसेच धागा खेचून स्थिरही ठेवतो. डावीकडे, उजवीकडे, वर, खाली विहरणारा पतंग मध्येच गोल-गोल गोता खात एकदम खाली येऊ लागतो. क्षणात धाग्याला स्वतःकडे खेचून वर आणणे, कुणाच्या हाती न लागणे, हे उडविणाऱ्यांचे कसब असते. आयुष्य कसे जगायचे? हे आपल्याला पतंग शिकवितो. त्यासंबंधी वाचलेले शेअर करते.

आकाशात उडणारा कागदाचा तुकडा पतंग, आपल्याला आशा-आकांक्षा, विश्वासाना पंख देत उंच झेप घ्या, हाच संदेश देतो. रंगीबेरंगी रंगासह जीवनाचे संपूर्ण रंग सांगतो. कागदाचा तुकडा आकाशाकडे जाताना, हवा त्याचे स्वागत करते, तर इतर पतंग (सहकारी) त्याला विरोध करतात, घाबरवतात. खालून उडणारे तिरस्कार करतात. (स्पर्धा करतात) त्याला तोडण्याचा (पाय खेचण्याचा, पाडण्याचा) प्रयत्न करतात. पतंग उडविणारा स्वतःकडे दोरा खेचत पतंगाला (स्वतःला) पुन्हा उंच झेपावतो. तो शाश्वत समस्यांशी लढत असतो.

नमकहराम चित्रपटात पतंग विकणारा कवी रझा मुराद मृत्यू जवळ आल्यावर आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो. आपल्या दुकानातील पतंगाकडे पाहतो आणि म्हणतो, ‘मी मेल्यावर हे सगळे पतंग वस्तीमधील गरीब मुलांना वाटून टाका. त्यांना हे पतंग उडवू द्या.मग प्रत्येकाला कळेल, “हवेत उडणाऱ्या प्रत्येकाची नाडी तळाशी असणाऱ्यांच्या हातात असते.”

(“उपर वालों की डोर नीचे वालों की हाथ में होती है.”)

एका वडील आणि मुलाच्या संवादात मुलगा विचारतो, बाबा! पतंग कशामुळे वर जातो? वडील उत्तरतात, धाग्यामुळे!

“पण बाबा? धागा तर पतंगाला खाली धरून ठेवतो. हे बघ! बाबा पतंगाचा धागा कापताच तो पतंग खाली येतो.”

बाबा म्हणाले, “काही वेळा जी गोष्ट आपल्याला खाली ओढतेय, असं वाटतंय तीच गोष्ट भरारी मारायला सांगते.”

संस्था व पतंग यांच्यात साम्य आहे. पतंग आकाशात अधिकाधिक वर उडवायचा असेल, तर तुम्ही त्याला वर ढकलत नाही, मांजा खाली खेचता म्हणजेच स्वतःजवळ ओढता. अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पुढे ढकल्यास (ओरडल्यास) जास्त धक्क्यांनी ते कोसळून पडतील; परंतु ममतेने जवळ घ्या, विश्वास टाका, बघा पतंग कसे झेप घेईल ते. कंपनीचा गौरव होताना ज्यांच्यामुळे हा गाडा सुरळीतपणे चालतो. त्यांचे श्रम, त्यांचे अस्तित्व मान्य करा. त्यांना धन्यवाद द्या.

पतंग उडविण्याची काही कौशल्य असतात. पतंगाच्या कणीची गाठ बरोबर बांधता आली पाहिजे. मांजा हातात धरणं सोपं नसतं, बोटांना इजा होते. मांजा थोडा ढील आणि थोडा घट्ट पकडला, तरच पतंग वाऱ्यावर चांगला उडतो. हे आपापसांतील नाते आहे. मांजावर ग्रीप हवी. जास्त ढिलेसुद्धा सोडू नये आणि तुटेल इतपत घट्टही पकडू नये. महत्त्वाचे आपल्या हातातील मांजा (प्रयत्न) सोडून चालत नाही. तुमच्या हातात धागा आहे तोपर्यंतच खेळ चालू असतो.

“हर पतंग जानता है,
अंत में कचरे में जाना है।
लेकिन उसके पहले उसे
आसमान छूकर दिखाना है।”

“पतंग और जिंदगी में एक ही समानता है; उंचाईमे हो तब तक ही वाह वाह होती है.” तेव्हा पतंगाची शिकवण लक्षात ठेवा, “आपला काटला गेलेला पतंग कुठेही पडला तरी लक्ष न देता आकाशाकडे पाहत तुम्ही पुढे चला. उंच झेप घ्या”.

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -