Monday, May 20, 2024

संस्कार

कथा : डॉ. विजया वाड

आपण नेहमी इच्छा धरतो की, माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप शिकावी. तिला मोठी पोस्ट मिळावी. माझ्या मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ असं कोणी तरी व्हावं आणि त्यांचं चहूकडे नाव व्हावं, या संदर्भात मला श्यामच्या आईची फार आठवण येते. श्यामची आई आपल्या लेकावर अपरंपार माया करणारी स्त्री. अगदी साधी, सोज्वळ, कारुण्यमूर्ती! साने गुरुजींनी लिहिलं आहे, “माझ्या आईने कधीही म्हटले नाही, की, श्याम तू मोठा ऑफिसर हो… बॅरिस्टर हो. तिने मला फक्त एकच सांगितले, श्याम, तू सर्वांचा आवडता हो. मोठे झाल्यावर मला समजले की, सर्वांचा आवडता होणे या इतकी कठीण गोष्ट या जगात दुसरी नाही.”

खरंच… सर्वांचं आवडतं होणं ही सोपी गोष्ट नाहीच. त्यासाठी लहानाहून लहान होता यायला हवं. आपण नम्रतेचं बाळकडू आपल्या लहानग्यांना पाजलं काय? दुसऱ्याचं म्हणणं सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची, उत्तम श्रोता होण्याची सवय आपण आपल्या मुलांना लावली काय? ‘वर्गात पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी हो’, असा आशीर्वाद आपण मुला-मुलींना देतो. पण आपल्या वर्गातला पहिल्या क्रमांकाचा ‘माणूस’ हो, असं आपण आपल्या पाल्याला कधी सांगितलं आहे? आठवून पाहा…! आपल्या मनाशीच याचा विचार केला, तर असं लक्षात येईल की, याचं उत्तर नकारात्मक मिळतंय.

ही फक्त स्वतःपुरती सवय! पण दुसऱ्याचं दु:ख सहजपणे वाटून घेणं, मदतीचा हात पुढे करणं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, या गोष्टीही संस्कारांचाच भाग आहेत. पुष्कळ पालक आज-काल आपल्या पाल्याचे जुने कपडे, गणवेश धुऊन, इस्त्री करून आदिवासी किंवा अनाथ बालकांसाठी पाठवतात. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

कामाला असलेल्या, धुणीभांडी-केरवारे करणाऱ्या कष्टकरी स्त्रीला सन्मानाने वागवण्याची किती घरात पद्धत आहे? तिला आपण कधी अहोजाहो म्हणतो? ‘ही आमची मोलकरीण’ असा तिचा सहज उल्लेख तिच्या मनाला टोचत असेल, बोचत असेल, असं आपल्या स्वप्नातही येत नाही. मुलांना आपणच सांगायचं… ‘ए मीरा’ म्हणून नाही हाकारायचं, मीराताई म्हणायचं. ज्या घरातली आई घासातला घास काढून आपल्या या मदतनीस सखीस देते, त्या घरातली मुलं हा संस्काराचा वारसा आपापल्या घरी नेतात.

सुगंधा भन्साळी रविवारचा दिवस थोडा वेगळा घालवतात. रविवारी दुपारी तीन ते पाच या वेळात त्या अंध व्यक्तीसाठी वाचक (रिडर) म्हणून काम करतात. परिसरातली अशी व्यक्ती त्यांना सुदैवाने मिळाली. पण परिसराबाहेर रिक्षाने जाऊनही अशा व्यक्तींसाठी वेळ देण्यास त्या हसतमुखाने तयार असतात. या नेमाला आता सत्तावीस वर्षं झाली. कसलीही सबब नाही. जेव्हा मुलीच्या बाळंतपणास त्या बंगलोरला गेल्या, तेव्हा त्यांना रविवारी एकदम नर्व्हस व्हायला झालं. पण त्यांच्या मुलीने त्यांना म्हटलं, “आई, तू काळजी करू नकोस. आज तू माझ्या जागी जा. तुझा वसा मीही घेतला. रविवार! तीन ते पाच इथल्या प्रज्ञा मेननला मी वाचून दाखविते. आपल्या कॉलनीतच आहे.” सुगंधा भन्साळींचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. आपली मुलगी आपला वसा वारसाहक्काने चालवते आहे, याहून अधिक मोठा आनंद कुठला असू शकतो?

यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली का? सुगंधाताईंनी एक व्रत अतिशय आवडीने, स्वत:च्या इच्छेने स्वीकारलं नि ते अत्यंत श्रद्धेने पाळलं. आपल्या मुलीला ‘तूही अशी अंध व्यक्तींची रिडर हो ना’, असं त्यांनी कधी आपणहून सांगितलं नाही. पण त्यांच्या मुलीने स्वत:हून तेच व्रत अंगीकारलं. आपलं वर्तन मुलांचा आदर्श कसा ठरतं, याचं हे माझ्या डोळ्यांसमोरचं उदाहरण आहे.

श्रीयुक्त आणि श्रीमती माने यांच्याबद्दल आपणास सांगायला हवं. यांची मुलं अजून लहान आहेत. शाळकरी वयाची! श्रीयुक्त माने कामावरून आले की, सोमवार आणि गुरुवार मुलांची जबाबदारी घेतात. अनुराधा माने जवळच्या म्युनिसिपल इस्पितळात जातात आणि आजारी बायकांना भजन म्हणून दाखवितात, त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करतात. संध्याकाळी ४ ते ६ ही व्हिजिटर्सची वेळ संपली की, ६ ते ७ ही अनुराधाची वेळ, गोड गळ्याच्या अनूची बायका आतुरतेने वाट बघतात.

अशोक माने मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी अस्थिव्यंग विभागात जाऊन विनोदी कथांचं वाचन करतात. वजनं लावून त्रासलेल्या, कळांनी उदासलेल्या लोकांना जरा हलकं-फुलकं ऐकून बरं वाटतं. अशोक माने यांचा पस्तिसावा वाढदिवस या वॉर्डातल्या पेशंटांनी उत्साहाने साजरा केला, म्हणजे बघा! अलीकडे तर चित्रभूषण आणि साधिका ही त्यांची छोटी मुलंही मागे लागतात की, आम्हाला पण आजारी माणसांचं मनोरंजन करायचं आहे. ती १० वर्षांचीही नाहीत; त्यामुळे कशीबशी समजूत घालून त्यांना घरी बसवावं लागतं. पण अंकुरलं आहेच हे उत्तम बीज दोन्ही छोट्यांच्या मनात. ही फक्त डोळ्यांपुढे असलेली दोन उदाहरणं मी आपल्यापुढे ठेवली.

संस्कारांचा आणखी महत्त्वपूर्ण भाग म्हणजे मोठ्यांबद्दलचा आदरभाव. या आदरभावाचा अभावच सर्वत्र दृष्टीस पडतो. मोठ्या व्यक्तीला (ती मानाने मोठी नसली तरीही) ‘नमस्ते’ म्हणण्याची पद्धत गावठी वाटून निकालात निघाली आहे. नुसते ‘नमस्ते’ म्हणायची मारामार, तिथे वाकून नमस्कार कुठला घडायला? सामुदायिक प्रार्थना हा घरचा नियम असावा. ओंकार हा मोठा पवित्र मंत्रघोष आहे. सर्वांनी (घरातील सदस्य) एकत्र बसून ओंकार जपला, तर घरात एक सुंदर वातावरणनिर्मिती होते. फार नको. केवळ पाच-सात मिनिटेही पुरेत. पण निश्चित वेळ नि एकत्र येणं फार महत्त्वाचं. आपण पंधरा दिवस तरी सातत्याने अनुभव घ्या. माझी खात्री आहे, आपण सोळाव्या दिवशी एकत्र येण्याची वाट बघाल. पूर्वी पाढे, परवचे, रामरक्षा आणि दिव्या दिव्या दीपत्कार म्हटल्याशिवाय जेवायला मिळत नसे. आता टू वन्झा टू आणि ट्विंकल ट्विंकल लिटल स्टारच्या जमान्यात या गोष्टी इतिहासजमा झाल्यायत. आपण मुलांना मनाचे श्लोक शिकविले नाहीत, तर इतर कुणीही ते शिकविणार नाही. आपण पसायदान मुलांपर्यंत पोहोचवा. गायत्री मंत्र उगवत्या सूर्याच्या साक्षीने त्यांना म्हणायला सांगा. संस्कारांची ही शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल, त्यांच आत्मबळ वाढवेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -