Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीKartitki Ekadashi Mahapuja : फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीची महापूजा

Kartitki Ekadashi Mahapuja : फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीची महापूजा

महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi 2023) पंढरपुरात (Pandharpur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्निक शासकीय महापूजा संपन्न झाली. विशेष म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे. नाशिकचं घुगे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

महापूजेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुरायाचरणी साकडं घातलं. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं त्यांनी घातलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वारकरी कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या दिशेने चालत राहिले, त्यामुळेच कुठलाही कुकर्मा आमचा हा विचार संपवू शकला नाही. महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. माणसं बदलली तरी श्रद्धा बदललेली नाही. विकास आराखडा आपण केला आहे, आधी मंदिराचं संवर्धनाचं काम पाहिजे, अशी आपली भूमिका होती. ७५ कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचं भूमीपूजन आज झालं आहे. पुरातत्व विभागाला मला सांगणं आहे की, कोट्यावधी लोकांच्या भावना यासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे काम उत्तम आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. पंढरपूर विकास आराखडा हा सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे.”

इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे

“कोणाला विस्थापित करायचा आमचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाव नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आमची वारी ही आता आमची वारी राहिली नाही, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. त्यामुळे इथे व्यवस्था देखील त्याच पद्धतीनं उपलब्ध असली पाहिजे. इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे, यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी वेळ लागेल मात्र आपण सुरुवात केली आहे. इंद्रायणीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे स्वच्छ करूनच त्यामध्ये गेले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी

“पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होईल. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, हेच विठुरायाकडे मागणं आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती मोठं संकट आहे. अवर्षणग्रस्त शेतकरी आहेत, शेतकऱ्याला समाधान देण्याची शक्ती विठुरायानं आम्हाला द्यावी. राज्यात आज अनेक समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सर्वांसाठी प्रार्थना मागितली, त्याच पद्धतीनं विठुराया चरणी मी मागणं मागतो की, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी”, असं देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाला साकडं घातलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -