Sunday, May 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेतात, हे चुकीचे आहे, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी संवाद...

उद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेतात, हे चुकीचे आहे, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी संवाद साधणे आवश्यक होते

शरद पवारांनी टोचले उद्धव ठाकरेंचे कान

मुंबई : कुणाशीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कुणाशीही चर्चा न करता, संवाद न साधता उद्धव ठाकरे स्वत: निर्णय घेतात, हे चुकीचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले.

मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण तुम्हाला तीन पक्षांनी मिळून मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अदानी प्रकरण असो वा इतर मुद्द्यांवरून पवारांचे मत हे विरोधी पक्षांशी जुळत नसल्याचे समोर आले. त्यात आता महाविकास आघाडीतील झालेल्या मतभेदांवर शरद पवारांनी उघडपणे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला, असे विधान करत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची कानउघाडणी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरून भाजपा-ठाकरे गटात रणकंदन माजले होते. त्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ला टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे. उद्धव ठाकरे हे फडणवीसांना फडतूस बोलले नसते तर फडणवीसांनीही काढतूस काढले नसते, असे सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही

राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवल्या. मात्र महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार म्हणाले की, मविआच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही. कोण कशी भूमिका घेईल हे आज सांगता येणार नाही. हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यातील सहकारी आणि नेतृत्वाची आता मानसिकता एकत्रित काम करण्याची आहे. जोपर्यंत ही मानसिकता आहे तोपर्यंत मला काळजी नाही. उद्या ही मानसिकता सोडून काहीतरी वेगळं करायचा असा कुणी निर्णय घेतला तर हा त्यांचा निर्णय असेल. तिन्ही पक्षांचा असणार नाही, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -