Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरभारतीय शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळावे

भारतीय शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळावे

शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांचे प्रतिपादन

सफाळे : वाढते जागतिक तापमान, पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, अनियमित पर्जन्यमान, मनुष्यबळाची कमतरता यांमुळे परंपरागत शेती धोक्यात आली असून, शेतकरी आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी सफाळे येथे बोलताना व्यक्त केले.

सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठान या संस्थेने भारतीय आधुनिक बांबू शेती शास्त्र-संधी-नफा या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पटेल पुढे म्हणाले की, बांबू लागवडीसाठी लागणारी अत्यल्प गुंतवणूक कमी मनुष्यबळ, कमी निगराणी या तुलनेत मिळणारा प्रचंड परतावा लक्षात घेता भविष्यात बांबू शेती ही सोने पिकविणारी शेती ठरेल.

बांबू शेतीचे फायदे सांगताना पाशा पटेल पुढे म्हणाले की, बांबूचा उपयोग अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच विविध शोभिवंत वस्तू, बांधकाम याबरोबरच निरनिराळ्या प्रकारच्या सतराशे वस्तू बांबूपासून बनविण्यात येत असून यास जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आपल्या लातूर जिल्ह्यातील उदाहरण देताना पटेल म्हणाले, आम्ही आमच्या भागातील अशिक्षित स्त्रियांना बांबूपासून फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण दिले असून, बांबूपासून फर्निचर बनविणारा अत्याधुनिक कारखाना उभारला आहे.

या अशिक्षित लमान स्त्रियांनी बनविलेले फर्निचर युरोपीय बाजारपेठेत विकले जात आहे. याप्रसंगी इमार संस्थेचे सभासद व यशस्वी बांबू उत्पादक व उद्योजक संजीव करपे यांनी उपस्थितांना चित्रफितीद्वारे बांबूपासून उत्पादित होणारी उत्पादने व उपयोग याबाबत सचित्र माहिती देतांना शेतकरी आज बांबू उत्पादनाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवित आहेत, देशात दरवर्षी सुमारे वीस हजार करोड रुपयांचा बांबू आयात केला जातो, यात मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाचे परकीय चलन खर्च होते, ही बाब लक्षात घेता बांबू उत्पादन व बांबूवर आधारित उद्योगांस खूप मोठी संधी आपल्या देशात उपलब्ध असून, आपल्या देशातील शेतकरी महिला व बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने इच्छुक शेतकऱ्यांना बांबू लागवाडीस रोपे उपलब्ध करून देण्याचे तसेच बांबूपासून विविध उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी प्रशिक्षणाकरिता प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन प्रगती प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रवीण राऊत यांनी याप्रसंगी दिले.

 

बांबू लागवडीचा गांभीर्याने विचार करावा

भविष्यात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा गांभीर्याने विचार करावा या जिल्ह्यात भविष्यात बांबू लागवड केल्यास उत्पादित होणारा बांबू व त्यावर आधारित उद्योगांतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आपण सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करू, असे आश्वासनही परिषदेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले. याप्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या बांबू लागवडीसाठी असलेल्या योजना व अनुदान याचीही माहिती पाशा पटेल यांनी यावेळी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -