Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून निर्णय ८ मार्चला घेणार

संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून निर्णय ८ मार्चला घेणार

सभागृहाचा अवमान झाल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टिप्पणी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी ८ मार्चला हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान सभेत सांगितले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस जोरदार गाजला. राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. यावरुन विधीमंडळात गदारोळ झाला.

यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे मत वाचून दाखवले. तसेच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु, असे राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितले. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली.

राहुल नार्वेकर यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरूच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीतच संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधारी आग्रही दिसत आहेत.

दुसरीकडे संजय राऊत हे कोल्हापुरात बोलत असताना आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोरमंडळ’ असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितले आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचे मंडळ… विधीमंडळ नाही ‘चोरमंडळ’ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -