Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात 'हक्कभंगा'ची मागणी

संजय राऊतांविरोधात ‘हक्कभंगा’ची मागणी

सर्वपक्षीय आमदार एकवटले; विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हणणे राऊतांना भोवणार?

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळाने झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हणणे संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राऊतांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घेतली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. त्यावरील चर्चेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊंतावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच संजय राऊतांनी केलेले विधान हे संपूर्ण विधीमंडळातील सदस्यांना उद्देशून केले आहे आणि हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यांनी विधीमंडळाचा अपमान केला आहे, त्यामुळे अशांवर कारवाई केली गेली पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचे म्हटले. पण त्यांनी संजय राऊत यांचे थेट नाव घेणे टाळले. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असे विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरेच असे विधान केले आहे का? हेही तपासून पाहिले गेले पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केले असेल तर त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर हे हक्कभंगाच्या नोटीसवर आदेश देत असतानाच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाची नोटीस आता हक्कभंग समितीकडे पाठवली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -