Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीमाझ्याजवळ मोदींची गॅरंटी आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माझ्याजवळ मोदींची गॅरंटी आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या सभेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन

नांदेड : विश्वासाचे दुसरे नाव म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी व माझ्याजवळ सुद्धा मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच प्रगतीसाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी नांदेडला सभा आयोजित करण्यात आली होती. त्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हिंदीमधून भाषण केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारकाईने ते भाषण ऐकत होते. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून राम मंदिर पूर्ण झाले. आता रामराज्य आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माझ्याजवळ मोदींची गॅरंटी आहे व महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण मोदींच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. ‘रोटी, कपडा और मकान’ या तिन्ही गोष्टी मोदींमुळे महाराष्ट्रातील जनतेला मिळत असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच आवश्यक असल्याचा पुनरुचार त्यांनी आपल्या भाषणातून केला.

ही निवडणूक देशाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे सांगत देशाला महासत्ता करायचे असेल तर पंतप्रधान म्हणून मोदी यांना पुन्हा एकदा निवडून आणणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, आज आपसात लढण्यासाठी काँग्रेसच पुढाकार घेत आहे. मोदींच्या गॅरंटीची व त्यांच्या शब्दांची चोरी देखील काँग्रेस करीत आहे. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ‘ अशी काँग्रेसची अवस्था झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

देशातील नागरिक स्वप्नात देखील राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाहीत. कारण राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारताची तसेच मोदीजींची बदनामी केलेली आहे. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारात चंद्रयान मोहीम यशस्वी होते. परंतु अद्यापही काँग्रेसला राहुल गांधींची लॉन्चिंग करता आली नाही. त्यात ते सातत्याने अयशस्वी होत आहेत. यावरूनच काँग्रेसची अवस्था लक्षात येते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. २०१४ पूर्वी देशात दंगल, बॉम्बस्फोट व भ्रष्टाचार होत होते. परंतु आत्ताचे प्रधानमंत्री बेदाग आहेत. त्यांच्या कार्यकाळात देशात कुठेही या गोष्टी घडल्या नाहीत. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या पाचही जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दहा टक्के मराठा आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा फायदा मराठा समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात नक्कीच होईल, असे सांगून शरद पवार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरले. परंतु आम्ही मराठा समाजातील लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणून आम्ही सोडविला. यात मला वेगळा आनंद आहे, असे सांगून मराठा समाजाच्या भावना भडकविणाऱ्यांच्या शब्दात कोणीही येऊ नये, असे सांगून मराठा समाजाला भडकविणाऱ्याविरुद्ध मतदारांनी सावध राहावे व प्रताप पाटील चिखलीकर व बाबुराव कोहळीकर या दोन्ही नांदेड व हिंगोलीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -