बळीराजाचे कष्ट पाण्यात; परतीच्या पावसाचा धुमाकूळ

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांना मोठा दणका बसला आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस मेघ गजनासह पडत असल्याने कापणीला आलेले भातपीक पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचा सुखाचा घास हिरावला आहे.

पावसामुळे झोपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांना मात्र गहिवरून येत आहे. त्यामुळे या भाताची कापणी करावी कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वषर्भर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पीकवावी की नाही. असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे. कापणीला आलेले भात जमीदोस्त झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मजुरीच्या वाढत्या दरामूळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची भात कापणी लवकरात लवकर करण्याकडे कल आहे. पण मजूर मिळेनासे झाले असून उपलब्ध असलेल्यांचा मजूरीचा भावही चांगलाच वधारला असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाचा वाढलेला धोका पाहता मजूरी वाढीसाठी अडून बसलेल्या मजुरांना विनंत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका

मुख्यमंत्र्यांचा पायगुण!

कुडाळ (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत परतून काही तास उलटत नाहीत तोच माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री शनिवारी सिंधुदुर्गात येऊन गेले. म्हणूनच हा धक्का दिला आहे. ही तर सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेक लोकांचा विश्वास नाही, हे दाखवण्यासाठी कुडाळमधील तीन पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे १०, तर भाजपचे संख्याबळ ८ आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ ८ वरून ११, तर शिवसेनेचे संख्याबळ १० वरून ७ वर घसरले आहे.

शिवसेना कधी संपेल कळणारही नाही

शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही. सुरुंग लावला आहे. अनेकजण कुंपणावर आहेत. शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही. ती वेळ लांब नाही. आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे, असा दावाही त्यांनी केला.

नवाब मलिक, तोंड उघडायला लावू नका

निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात. ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज विकतो, हेच तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग्ज अॅडिक्टला साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

संवादासारखं राहिलं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात संवाद झाला नाही. त्यावरही त्यांनी मिष्किल भाष्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्यासारखं काही नाहीच नव्हतं. नारायण राणे मनात ठेवून काही वागत नाहीत. उद्धव ठाकरे कुजक्या मनाचे आहेत. त्याला आमचे साहेब काय करणार? असा सवालही माजी खासदार निलेश यांनी केला आहे.

दुसऱ्या लढतीतही भारत पराभूत

गोल्डकोस्ट (वृत्तसंस्था): भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात १४ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे यजमानांनी ही मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावत १४९ धावा केल्या आणि विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय संघ २० षटकात ६ गडी गमवून १३५ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १४ धावांनी पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली. या सामन्यातही शफालीची बॅट चालली नाही. अवघ्या १ धावसंख्येवर बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांचा भागीदारी केली. जेमिहा रॉड्रिग्स हीच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. ती २६ चेंडूत २३ धावा करून तंबूत परतली. स्मृतीने झुंज सुरुच ठेवली होती. ४९ चेंडूत ५२ धावा करून बाद झाली. त्यानंतर धावगती मंदावली आणि चेंडू आणि धावांचा फरक वाढला. हरमनप्रीत कौर १३, तर पूजा वस्त्रकार ५ या धावसंख्येवर बाद झाली. हरलीन देओल २ या धावसंख्येवर धावचीत झाली.

आघाडीला आलेल्या अलिसा हिली दुसऱ्या षटकात अवघ्या ४ धावा करून बाद झाली. रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर ऋचा घोषने तिचा झेल घेत तिला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लानिंग या जोडीनं डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ४४ असताना लानिंग बाद झाली. १४ या धावसंख्येवर असताना राजेश्वरीच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाली. त्यानंतर आलेली गार्डनरही जास्त काळ मैदानात तग धरू शकली नाही. अवघी एक धाव करत तंबूत परतली. असं असताना बेथ मूनीने एकाकी झुंज सुरुच ठेवली. एलिस पेरी ८ धावा करून बाद झाली. बेथ मूनी ४३ चेंडूत ६१ धावा करून राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर बाद झाली. या खेळीत तिने १० चौकार मारले.

ड्रग्ज प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील अमली (ड्रग्ज) पदार्थांच्या पार्टी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नबाव मलिकांची आदळआपट का सुरू आहे? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित आहे का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता म्हणून तो व्यसनाधीन झाला काय?, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणी राजकारण आता वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणात एक खान अडकल्यामुळे मलिक त्याची दखल घेताहेत, असे राणे यांचे म्हणणे आहे.

कोळसाटंचाईचे संकट गडद

मुंबई (मुंबई) : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

वापर काटकसरीने करा

ग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

उद्यापासून सर्वसामान्य साधणार थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून पुन्हा भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचे भाजप पक्षाने जाहीर केले आहे.

उद्यापासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. कार्यकर्ते आणि सामान्यांच्या समस्या सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून जीवघेणा प्रवास टाळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून, खड्डे तातडीने भरण्याबाबत दिवाळीपूर्वी ठोस पावले उचला. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. एखादा पेंग्विन कमी पाळा. पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला आहे.

मुंबईकरानी गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय की, एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असे नितेश यांनी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

कराचा पैसा खड्ड्यात घातला की क्रॉन्ट्रक्टर्सच्या घशात?

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

म्हणूनच आयुक्तांना आमची भीती?

महानगरपालिकेतील सत्ताधारी सेना काँट्रॅक्टरधार्जिणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल, तर लोकशाही मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत.

याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही काँट्रॅक्टरच्या संगनमताने सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची आयुक्तांना भीती वाटतेय, असे राणे यांनी नमूद केले आहे. सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवा. अन्यथा, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरू, असं नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

विमानतळाबाहेर रस्त्यांवरील खड्डे बघायचे का?

अपुऱ्या सोयीसुविधांवरून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

संतोष राऊळ

चिपी : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उद्घाटन हा माझ्यासह संपूर्ण कोकणवासीयांसाठी अविस्मरणीय दिवस आहे. माझ्यासह केंद्र सरकारने विमानतळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. विमानसेवेचा शुभारंभ झाला तरी इथे एअरपोर्टला मुबलक पाणी नाही. अव्याहत वीजपुरवठा नाही. चांगला रस्ताही नाही. हा कसला विकास? विमानतळाचे उद्घाटन झालं, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? हे खड्डे पाहावेत का? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करायला पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पायाभूत सुविधा आहेत. त्याचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही, असे सुनावले. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला आलेल्या सर्वांना दीर्घ व उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करत त्यांच्या ईडापीडा दूर कर, असे मी इथल्या देवदेवतांना गाऱ्हाणं घालत असल्याचे राणे यांनी म्हटले.

बहुप्रतीक्षित चिपी येथील ‘सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. अध्यक्षा संजना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले होते.

इथे येऊन राजकारण करू नये असे मला वाटत होते. जावे, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारं विमान डोळे भरून पाहावे, या उद्देशाने मी आलो होतो. विमान पाहून आनंद वाटला. १९९० मध्ये मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्गमध्ये तू जा, तुला मागणी आहे. मी मालवणमध्ये निवडून आलो. मी जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला? उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलं. त्यावेळी शिवसेना असल्याने. साहेबांचं श्रेय आहे. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स नव्हे तर बॅटला क्रेडिट द्यायचा. मला सामान्यांसाठी काम करणं आवडते, असे राणे पुढे म्हणाले.

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांनीच केला होता विरोध; राणेंनी दाखवली कात्रणे

नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी विरोध करणाऱ्यांचे वृत्तपत्रातील कात्रणे उपस्थितांना दाखवली.

१५ ऑगस्ट २००९ रोजी मी आणि सुरेश प्रभू विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. यावेळी काही जण या विमानतळाला विरोध करत होते. यातील काही मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सिंधुदुर्गात हायवेच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे.

हे काम देखील काहींनी अडवून, अगोदर आमचं भागवा, असं सांगितलं.रेडी फोर्टला महिन्याला जाऊन काय गोळा करतात? या व्यक्ती कोण आहेत, ते उद्धवजी तुमच्या सहकाऱ्यांना विचारा. सी-वर्ल्ड प्रकल्पालाही याच लोकांनी विरोध केला. अजित पवार अर्थमंत्री मी १०० कोटी आणून दिले होते. मात्र ते काम काही झाले नाही. तुम्ही समजता तसं इथे काही नाही, याठिकाणची परिस्थिती अतिशय वेगळी आहे, असं सांगून राणेंनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय माझ्याकडे आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत ८० टक्के उद्योग येतात. या खात्यामार्फत राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. पुढील ८ ते १० दिवसांत एमएसएमईचे अधिकारी सिंधुदुर्गात येणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जातील, असे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी रक्ताचे नाते : ज्योतिरादित्य शिंदे

‘माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझे सिंधुदुर्गासोबतही संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचं प्रतिक आहे. मी ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं की, माझ्या वडिलांचं विमानतळाचे एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संवाद साधताना म्हटले.

कोकणचे ऐश्वर्य काकणभर जास्तच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला आलो नाही. चिपी विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची निसर्ग संपन्नता जगासमोर येणार आहे. याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात. पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रेवस-रेडी मार्गासाठी केंद्राची मदत घेऊ : पवार

रेवस ते रेडी पर्यंत जाणारा नवा मार्ग राज्यसरकारने जाहीर केला आहे.या मार्गासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बाळासाहेबांना खोटे न बोलणारी माणसे आवडत होती : नारायण राणे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोलणारी माणसे आवडत नव्हती, असे केंद्रीयमंत्री राणे यांनी चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी शनिवारी म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना याला प्रोटोकॉल म्हणतात का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी नाही, तुमचे लोकप्रतिनिधी याठिकाणी काय करतात, याची तुम्ही गुप्त माहिती घ्या, असा सल्ला राणेंनी दिला आहे.

आदित्यने कन्सल्टन्सीच्या अहवालाचा अम्यास करावा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तरुण आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी टाटा कन्सल्टन्सीने तयार केलेला अहवाल वाचावा, त्याचा अभ्यास करावा आणि जिल्ह्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत.

अलीकडच्या काळात येथील धरणांना एक रुपयाही मिळाला नाही, मी केलेल्या कामानंतर धरणाचं १ टक्का काम देखील पुढे गेलेलं नाही. आज विमानतळ सुरु होत आहे, मात्र या विमानतळाला रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही. या विमानतळावर दाखल होणाऱ्या पर्यटकांनी येथील खड्डे पाहावेत का ? या रस्त्यासाठी ३४ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली.

आठवलेंच्या कवितेने वातावरण हलके फुलके

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान, कारण मुंबई वरून आले आहे विमान…, असे सांगताना सिंधुदुर्गसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे.

या विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल. पर्यटक येतील रोजगार वाढेल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

“एकत्र आले ठाकरे आणि राणे, मला आठवले महायुतीचे गाणे..” अशी दुसरी चारोळी करत आमने सामने असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये हशा पिकविला आणि वातावरण हलके फुलके केले.

या सिंधुदुर्ग मध्ये येणार आहे विकासाची नांदी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. माझ्या खात्यांतर्गत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासाठी प्रेरणास्रोत

डेन्मार्कच्या पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, असे डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे. त्यात तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. फ्रेडरिक्सन यांचे काल नवी दिल्लीमध्ये आगमन झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचे स्वागत करत आदरातिथ्य केले.

परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली विमानळावर दाखल होत मेट फ्रेडरिक्सन यांचे स्वागत केले. उल्लेखनीय म्हणजे, डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदी यांनी मेट यांचं स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा झाला. मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते.

भारत आणि डेन्मार्कनं पाणी आणि पर्यावरणशील इंधनावर काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसंच आम्ही आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांतही सोबत काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा हरित सहयोग महत्त्वकांक्षी आहे, असं यावेळी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले. आम्ही भारताकडे एक जवळचा सहकारी देश म्हणून पाहतो, असंही यावेळी मेट यांनी सांगितले. मेट यांनी मोदींचे कौतुक करताना त्यांना डेन्मार्कला येण्याचे आमंत्रणही दिले.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन आणि माझी ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असली तरी कोरोना काळात भारत आणि डेन्मार्क दरम्यान संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती, असं यावेळी मोदी यांनी म्हटले.जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही व्हर्च्युअल समिटमध्ये भारत आणि डेन्मार्क दरम्यान ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय उभायदेशांच्या दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाप्रती सन्मानाचं प्रतिक आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.

चेन्नईसमोर दिल्लीचे आव्हान

दुबई (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२१च्या प्ले-ऑफ फेरीला (बाद फेरी) रविवारपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. त्यातील क्वॉलिफायर-१मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत.

क्वॉलिफायर-१मधील लढतीतील विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचेल. पराभूत संघ स्पर्धेतून बाद होत नाही. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांतील विजेत्यांसोबत क्वॉलिफायर-२मध्ये (दुसरी उपांत्य लढत) त्यांना खेळण्याची संधी मिळते. थेट फायनल प्रवेशाची संधी असल्याने क्वॉलिफायर-१मध्ये खेळणारा प्रत्येक संघ कामगिरी उंचावण्यासाठी उत्सुक असतो. यंदाही त्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये तशी चुरस असेल.

दिल्लीने १४ सामन्यांत १० सामने जिंकून २० गुणांनिशी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कॅपिटल्सनी उर्वरित हंगामातील सहा सामन्यांपैकी ४ सामने जिंकत बऱ्यापैकी फॉर्म राखला आहे. शेवटच्या सामन्यांत बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सकडून मात खावी लागली असली तरी दिल्लीने पहिले स्थान कायम राखले. चेन्नईला १४ सामन्यांत ९ सामने जिंकता आलेत. युएई हंगामातील सलग चार सामने जिंकणारे धोनी आणि सहकारी अव्वल स्थानी कायम राहतील, असे वाटले. मात्र, शेवटच्या तीन सामन्यांत पराभव झाल्याने दुसऱ्या स्थानी घसरले. ताज्या क्रमवारीत चेन्नई आणि बंगळूरुचे समसमान गुण आहेत. मात्र, सरस रनरेटवर चेन्नईने अव्वल दोन संघांत स्थान राखले.

साखळी फेरीचा शेवट पराभवाने झाला तरी सांघिक कामगिरी उंचावल्याने क्वॉलिफायर-१मध्ये चेन्नईविरुद्ध दिल्लीचे पारडे जड आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या ओपनर्ससह श्रेयस अय्यर, कर्णधार रिषभ पंत तसेच शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉइनिसमुळे सातव्या क्रमांकापर्यंत बॅटिंग आहे. वेगवान दुकली कॅगिसो रबाडा आणि अॅन्रिच नॉर्ट्ज तसेच आर. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीला अवेश पटेल, मार्कस स्टॉइनिसची चांगली साथ मिळाल्याने गोलंदाजीतही चिंतेची बाब नाही.

चेन्नई हा आयपीएलमधील एक यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सनंतर त्यांनी सर्वाधिक जेतेपदे पटकावली आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने जबरदस्त फॉर्म राखला तरी गेल्या तीन सामन्यांत चेन्नईची फलंदाजी ढेपाळली आहे. गोलंदाजीतही तीच तऱ्हा आहे. पराभवाच्या हॅटट्रिकमुळे क्रिकेटपटू निश्चितच निराश झाले आहेत. निराशा झटकून स्पर्धेत परतण्याचे आव्हान चेन्नईसमोर आहे.

वेळ : सायं. ७.३०