Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणविमानतळाबाहेर रस्त्यांवरील खड्डे बघायचे का?

विमानतळाबाहेर रस्त्यांवरील खड्डे बघायचे का?

अपुऱ्या सोयीसुविधांवरून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

संतोष राऊळ

चिपी : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उद्घाटन हा माझ्यासह संपूर्ण कोकणवासीयांसाठी अविस्मरणीय दिवस आहे. माझ्यासह केंद्र सरकारने विमानतळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. विमानसेवेचा शुभारंभ झाला तरी इथे एअरपोर्टला मुबलक पाणी नाही. अव्याहत वीजपुरवठा नाही. चांगला रस्ताही नाही. हा कसला विकास? विमानतळाचे उद्घाटन झालं, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? हे खड्डे पाहावेत का? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करायला पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पायाभूत सुविधा आहेत. त्याचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही, असे सुनावले. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला आलेल्या सर्वांना दीर्घ व उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करत त्यांच्या ईडापीडा दूर कर, असे मी इथल्या देवदेवतांना गाऱ्हाणं घालत असल्याचे राणे यांनी म्हटले.

बहुप्रतीक्षित चिपी येथील ‘सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. अध्यक्षा संजना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले होते.

इथे येऊन राजकारण करू नये असे मला वाटत होते. जावे, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारं विमान डोळे भरून पाहावे, या उद्देशाने मी आलो होतो. विमान पाहून आनंद वाटला. १९९० मध्ये मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्गमध्ये तू जा, तुला मागणी आहे. मी मालवणमध्ये निवडून आलो. मी जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला? उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलं. त्यावेळी शिवसेना असल्याने. साहेबांचं श्रेय आहे. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स नव्हे तर बॅटला क्रेडिट द्यायचा. मला सामान्यांसाठी काम करणं आवडते, असे राणे पुढे म्हणाले.

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांनीच केला होता विरोध; राणेंनी दाखवली कात्रणे

नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी विरोध करणाऱ्यांचे वृत्तपत्रातील कात्रणे उपस्थितांना दाखवली.

१५ ऑगस्ट २००९ रोजी मी आणि सुरेश प्रभू विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. यावेळी काही जण या विमानतळाला विरोध करत होते. यातील काही मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सिंधुदुर्गात हायवेच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे.

हे काम देखील काहींनी अडवून, अगोदर आमचं भागवा, असं सांगितलं.रेडी फोर्टला महिन्याला जाऊन काय गोळा करतात? या व्यक्ती कोण आहेत, ते उद्धवजी तुमच्या सहकाऱ्यांना विचारा. सी-वर्ल्ड प्रकल्पालाही याच लोकांनी विरोध केला. अजित पवार अर्थमंत्री मी १०० कोटी आणून दिले होते. मात्र ते काम काही झाले नाही. तुम्ही समजता तसं इथे काही नाही, याठिकाणची परिस्थिती अतिशय वेगळी आहे, असं सांगून राणेंनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय माझ्याकडे आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत ८० टक्के उद्योग येतात. या खात्यामार्फत राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. पुढील ८ ते १० दिवसांत एमएसएमईचे अधिकारी सिंधुदुर्गात येणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जातील, असे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी रक्ताचे नाते : ज्योतिरादित्य शिंदे

‘माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझे सिंधुदुर्गासोबतही संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचं प्रतिक आहे. मी ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं की, माझ्या वडिलांचं विमानतळाचे एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संवाद साधताना म्हटले.

कोकणचे ऐश्वर्य काकणभर जास्तच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला आलो नाही. चिपी विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची निसर्ग संपन्नता जगासमोर येणार आहे. याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात. पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रेवस-रेडी मार्गासाठी केंद्राची मदत घेऊ : पवार

रेवस ते रेडी पर्यंत जाणारा नवा मार्ग राज्यसरकारने जाहीर केला आहे.या मार्गासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बाळासाहेबांना खोटे न बोलणारी माणसे आवडत होती : नारायण राणे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोलणारी माणसे आवडत नव्हती, असे केंद्रीयमंत्री राणे यांनी चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी शनिवारी म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना याला प्रोटोकॉल म्हणतात का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी नाही, तुमचे लोकप्रतिनिधी याठिकाणी काय करतात, याची तुम्ही गुप्त माहिती घ्या, असा सल्ला राणेंनी दिला आहे.

आदित्यने कन्सल्टन्सीच्या अहवालाचा अम्यास करावा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तरुण आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी टाटा कन्सल्टन्सीने तयार केलेला अहवाल वाचावा, त्याचा अभ्यास करावा आणि जिल्ह्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत.

अलीकडच्या काळात येथील धरणांना एक रुपयाही मिळाला नाही, मी केलेल्या कामानंतर धरणाचं १ टक्का काम देखील पुढे गेलेलं नाही. आज विमानतळ सुरु होत आहे, मात्र या विमानतळाला रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही. या विमानतळावर दाखल होणाऱ्या पर्यटकांनी येथील खड्डे पाहावेत का ? या रस्त्यासाठी ३४ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली.

आठवलेंच्या कवितेने वातावरण हलके फुलके

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान, कारण मुंबई वरून आले आहे विमान…, असे सांगताना सिंधुदुर्गसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे.

या विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल. पर्यटक येतील रोजगार वाढेल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

“एकत्र आले ठाकरे आणि राणे, मला आठवले महायुतीचे गाणे..” अशी दुसरी चारोळी करत आमने सामने असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये हशा पिकविला आणि वातावरण हलके फुलके केले.

या सिंधुदुर्ग मध्ये येणार आहे विकासाची नांदी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. माझ्या खात्यांतर्गत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -