
डेन्मार्कच्या पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, असे डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे. त्यात तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. फ्रेडरिक्सन यांचे काल नवी दिल्लीमध्ये आगमन झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचे स्वागत करत आदरातिथ्य केले.
परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली विमानळावर दाखल होत मेट फ्रेडरिक्सन यांचे स्वागत केले. उल्लेखनीय म्हणजे, डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदी यांनी मेट यांचं स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा झाला. मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते.
भारत आणि डेन्मार्कनं पाणी आणि पर्यावरणशील इंधनावर काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसंच आम्ही आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांतही सोबत काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा हरित सहयोग महत्त्वकांक्षी आहे, असं यावेळी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले. आम्ही भारताकडे एक जवळचा सहकारी देश म्हणून पाहतो, असंही यावेळी मेट यांनी सांगितले. मेट यांनी मोदींचे कौतुक करताना त्यांना डेन्मार्कला येण्याचे आमंत्रणही दिले.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन आणि माझी ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असली तरी कोरोना काळात भारत आणि डेन्मार्क दरम्यान संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती, असं यावेळी मोदी यांनी म्हटले.जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही व्हर्च्युअल समिटमध्ये भारत आणि डेन्मार्क दरम्यान ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय उभायदेशांच्या दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाप्रती सन्मानाचं प्रतिक आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.