जमैका (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजचा अनुभवी ऑफस्पिनर सुनील नरिनला आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची मुदत रविवारी संपत आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार कीरॉन पोलार्डने संघनिवडीबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, नरिनला संघात समाविष्ट न करण्याच्या कारणांबद्दल बोललो, तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल. आता आपल्याकडे असलेल्या १५ खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर अधिक चांगले. हे आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. आम्ही या खेळाडूंसह आमच्या जेतेपद राखू शकतो का, याचा प्राधान्याने विचार करावा लागेल. मला यावर अधिक टिप्पणी करायची नाही. यावर बरेच काही सांगितले गेले आहे. मला वाटते की त्याला संघात समाविष्ट न करण्याची कारणे त्यावेळी स्पष्ट केली गेली. वैयक्तिकरित्या, मी सुनील नरिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूपेक्षा चांगला मित्र मानतो. आम्ही एकत्र खेळून मोठे झालो. तो जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे.
सुनील नरिन हा ऑगस्ट २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या महिन्यात टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा नरेनचे नाव त्यात समाविष्ट नव्हते. नरिन बोर्डाने ठरवलेल्या तंदुरुस्तीच्या निकषांची पूर्तता करत नसल्याची नोंद करण्यात आली.
ऑफस्पिनर सुनील नरिनने आयपीएल २०२१ च्या यूएई लेगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात. एलिमिनेटरमध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध २१ धावांत ४ विकेट घेत संघाला क्वॉलिफायर २मध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. नरिनने कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलच्या विकेट घेतल्या. त्यानंतर नरिनने फलंदाजीत एका षटकात तीन षटकार मारून सामना कोलकात्याच्या बाजूने फिरवला. आयपीएल २०२१ च्या यूएई लेगमध्ये नरेनने ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात.
वेस्ट इंडिज संघ : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पुरन, फॅबियन अॅलन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, ओबेद मॅककॉय, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर. राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, अकील होसेन.