पालघर (प्रतिनिधी) : राज्यात शाळेची घंटा वाजली, पण अनेक पालकांना ती ऐकूच आली नाही. कारण शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे दिसून आले आहे. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कोरोनाच्या भितीमुळे शाळेत पाठवण्यास तयार नाहीत,असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ३० ते ३५ टक्के इतकीच आहे. योग्य त्या सुविधांचा अभाव, कोरोना विषयक खबरदारीचे उपाययोजना करण्याबाबत शाळा प्रशासनाची उदासीनता आणि पालकांची मानसिकता, अशा तीन कारणामुळे शाळेची घंटा वाजली. परंतु वर्ग भरले नाहीत, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. २५ ते ३० टक्के शिक्षकांना अद्याप दुसरी लस न मिळाल्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळत नाही. तर अनेक शिक्षक कोरोनाच्या भितीमुळे कामावर येऊ पाहत नाहीत. मंदिरांची घंटा वाजली व भक्ताची गर्दी उसळली, तसे शाळांच्या बाबतीत घडू शकले नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेला पाठ फिरवली. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. सद्यपरिस्थितीत शाळा सुरू करणे कठीण आहेच परंतु विद्यार्थ्यांसाठी ते धोकादायकही ठरू शकते, असे पालकांचे म्हणणे आहे.
पालघर जिल्ह्यात हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, या शाळांमधून सुमारे तीन ते चार लाख मुले शिकत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने शाळा बंद करून ऑनलाईन ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू केली. ऑनलाईन शिक्षण शहरी विद्यार्थ्यांना सोयीचे ठरले मात्र ग्रामीण भागात ही व्यवस्था कुचकामी ठरली.