Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनेरुळ, सिवूड रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद

नेरुळ, सिवूड रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद

आयुक्तांकडे कारवाईची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात जुन्या व नव्या अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला असून नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांना इशारा दिला असतानाही फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघत नाही. म्हणून या दोन्हीही रेल्वेस्थानकाच्या शेजारी नव्याने अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस अॅड. मंगल घरत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

नेरूळ व सिवूड येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रात्रीच्या वेळी तर नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात व आवारात तर अनेक अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू असतात. अवैध फेरीवाल्यांच्या दहशतीला मागे ठाणे येथील घटनेमुळे नागरिक घाबरूनच असतात. यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सिवूड रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या डी मार्ट समोर अनेक फेरीवाले बस्तान ठोकतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत ताबडतोब फेरीवाल्यांची वर्गवारी करून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात काही फेरीवाले पूर्वपार काळापासून व्यवसाय करत आहेत. त्यांना त्यांचा कायदेशीर अधिकार मिळणे गरजेचे आहे. म्हणून नवीन व जुने फेरीवाले अशी वर्गवारी करून नव्या अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी. – मंगल घरत, सरचिटणीस, महिला मोर्चा, भाजप, नवी मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -