विजय मांडे
कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्याच्या ताफ्यात एक वर्षा पूर्वी एका वाहनाची भर पडली होती. ते म्हणजे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन मात्र ते दाखल झाल्यानंतर पुन्हा कधीच दिसले नव्हते ते आज दि.१३ ऑक्टोबर रोजी कर्जत शहरातील रस्ते साफ करताना चक्क दिसले.
नगर परिषदेच्या फंडातून ४७ लाख ३३ हजार रुपये खर्च करून रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्यात आले आहे. ही मशीन खरेदी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली होती.
नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते कॉक्रीटचे झाले आहेत, या सर्व रस्त्यावर साफसफाई ठेवणे तेवढेच जिगरीचे आहे आणि त्यासाठी मनुष्य बळ असणे गरजेचे आहे. याचा विचार करून नगर परिषदेने रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. नगरपरिषद फंडातून ४७ लाख ३३ हजार रुपये खर्च करून ही गाडी खरेदी करण्यात आली. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाडीच्या ताफ्यात अजून एका वाहनाची भर पडली होती.
ही गाडी २० मे २०२० रोजी लोकार्पण झाली होती, या गाडीच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ होणार आहेत. रस्त्यावर असलेली धूळ सुद्धा ही मशीन व्दारे साफ होणार होती मात्र नंतर तांत्रिक कारणामुळे गाडी पुन्हा रस्त्यावर फिरली नाही. काही दिवस ही गाडी नगरपरिषद कार्यालयाजवळ उभी होती. मात्र १ वर्षाच्या कालावधीनंतर आज दि.१३ मे रोजी ही गाडी रस्ते साफसफाई करताना दिसली.