कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कचऱ्याचे साम्राज्य

कल्याण (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट परिसरात कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फुलमार्केट, भाजी मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, फळ मार्केट, धान्य मार्केट असा परिसर असून या परिसरात विविध प्रकारच्या मालांच्या गाड्यांचा मोठा राबता असतो. नवरात्री उत्सवामुळे फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी आवक झाली आहे. परंतु दररोज नित्यनेमाने संध्याकाळी येणारा पाऊस आणि ग्राहकवर्गाने फिरवलेली पाठ पाहता फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील खरेदीला ग्राहकांचा निरउत्साह पाहता फुल मार्केट मधील व्यापऱ्यांवर न खपलेली फुले फेकून देण्याची वेळ आलेली आहे. या कुजलेल्या आणि सडलेल्या फुलांचे कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यालगत ढिगारेच्या ढिगारे दिसत असून धक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्याच्या फुलांच्या ढिगांमधून फुले वेचून काहीजण ती विक्रीसाठी नेतात, हे दुदैवी असून फुलांच्या कचऱ्याचे ढिग लागेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन करते काय? असा सवाल आता उभा रहिला आहे.

फुल मार्केटचे मनपा, कृषी उत्पन्न बाजार समिती यामधील भिजंत घोगंडे, फुल मार्केटची दूरवस्था, तेथील घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पाहता सर्वसामान्य ग्राहकवर्ग कसा या मार्केटमध्ये पाऊल टाकणार, अशी शोकांतिका झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील भाज्यांचा कचरा इतस्ततः पसरलेला असून त्यातून फळभाज्या वेचणारे लोक पाहता आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक असणाऱ्या, भाजी घेणाऱ्या ग्राहकांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही असे दृष्य दिसत आहे. धान्य बाजारात देखील कचारा व गाड्यांची बेशिस्तपणे केलेली पार्किंग पाहता, मोकाट जनावरांचा वावर पाहता ‘स्वच्छ भारत मिशनचे’ तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहटेच्या सुमारास घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहता कोरोना नियमवलीला हरताळ फसल्याचे चित्र दिसते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कचरा, घाणीचे साम्राज्य कधी संपवणार, आवार कसा स्वच्छ करणार? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सभापती कचाऱ्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्ग यानिमित्ताने मोठ्या आशाने अपेक्षा करीत आहेत.

‘कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही’. ‘कल्याण – डोंबिवली मनपा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या फुल मार्केटमधील कचरा संकलनासाठी दररोज ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या आवारातील कचाऱ्याची विल्हेवाट करावी याबाबत दोन नोटीसा दिल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने कचऱ्याबाबत गंभीरपणे दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगितले. ‘कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘फुल मार्केटमधील कचरा मनपा नेत नसल्याने फुलांचा कचारा दिसत आहे आणि आम्ही आमचा कचारा उचलतो’ असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हट्टाने नाही, तर जोखीम पत्करून निर्णय घेतात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात, जोखीम पत्करतात. म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय परिणामकारक ठरतो. देश बदलण्यासाठी भाजप सरकार स्थापन झाले आहे. देशात बदल घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.

पंतप्रधान मोदी यांना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमित शहा यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. मात्र, विकासाची गंगा आणून त्या राज्याला देशातील एक सर्वोत्तम राज्य बनवले, असे शहा यांनी म्हटले. राजकारणात नेते धोका पत्करणे नाकारतात. त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात, असे मुलाखतकाराने विचारले. त्यावर अमित शहा यांनी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करून निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक ठिकाणी पोहोचवायचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला, जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे, असे म्हटले आहे.

मोदींच्या आयुष्यातील आव्हानांविषयी विचारले असता शहा म्हणाले की, त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागांत विभागले जाऊ शकते. एक, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरचा. त्यांना भाजपमध्ये पाठवण्यात आले, तेव्हा त्यांना संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. त्यानंतर ते संघटन मंत्री झाले आणि १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. पहिल्यांदाच भाजप स्वबळावर सत्तेवर आला. त्यानंतर भाजपचा प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. त्यानंतर १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही,” असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यांशी आजपासून थेट संवाद

भारतीय जनता पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारपासून (११ ऑक्टोबर) आता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना भाजप मुख्यालयात थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेसाठी असलेला सहकार विभाग कोरोनामुळे काही काळ हा विभाग कार्यरत नव्हता, अशी माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यापासून होणार आहे.

‘सक्षम पिढी घडवणाऱ्या मातृशक्तीचा सन्मान’

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना काळात कितीही संकटे आली तरी न डगमगता कार्यरत राहून सक्षम पिढी घडवणाऱ्या मातृशक्तीचा हा सन्मान आहे, असे गौरवोद्गार आमदार संजय केळकर यांनी काढले. नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे शहर भारतीय जनता पार्टी, स्लम सेलच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव रविवारी ठाण्यात करण्यात आला. यावेळी आ. केळकर बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजक स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या कल्पकतेचेही आ. केळकर यांनी कौतुक केले, तर हा सोहळा म्हणजे समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे म्हणाले.

रविवारी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, स्लम सेलच्या वतीने विविध क्षेत्रातील नऊ नवदुर्गांचा सन्मान सोहळा ठाणे पूर्वेकडील सर्वसेवा समिती हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, ज्येष्ठ भाजप नेत्या वीणा भाटिया, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमो अध्यक्ष सारंग मेढेकर, ओबीसी सेल अध्यक्ष सचिन केदारी, मच्छीमार सेल अध्यक्ष अमरिश ठाणेकर, राजेश गाडे, सचिन कुटे, विद्या कदम, उषा पाटील, सिद्धेश पिंगुळकर आणि विकी टिकमाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी गृहिणी ते यशस्वी उद्योगिनी जया झाडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी ममता डिसोझा, चार्टर्ड अकौंटंट सोनाली दळवी, संगणक अभियंता मृणाली खेडकर, महिला कीर्तनकार हभप अर्चना आडके, सिंधी भाषा पुरस्कारकर्त्या कशिष जग्यासी, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, संध्या सावंत, वनिता जेठरा आणि गौरी सोनवणे आदी नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

माथेरानमधील एटीएम बंद, बीएसएनएल नॉट रिचेबल

मुकुंद रांजाणे

माथेरान : माथेरानमधील एकमेव बँक असलेल्या युनियन बँकेच्या सेवेला मागील काही वर्षापासून घरघर लागली असून अनियंत्रित सेवेमुळे माथेरांकर हैराण झाले आहेत ह्या बँकेच्या मार्फत गावातील एकमेव एटीएम सेवा चालविली जाते पण नेमक्या विकेंड लाच हे एटीएम बंद पडत आहे तर बँकेमधील ऑनलाईन सेवाही नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना पासबुक वर एन्ट्री मिळण्यास विलंब होत असतो व बँकेबाहेर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे माथेरान मधील अनेकांनी ह्या विरोधात तक्रारी करून देखील ही सेवा जैसे थे आहे .

माथेरान या मुंबईपासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटनस्थळी सुट्टी एन्जोय करण्यासाठी येत असतात . तेथे असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी सर्वात म्हहात्वाचे साधन म्हणजे दूरसंचार सेवा . माथेरानचे आर्थिक नियोजनाचा मुख्य भार असणाऱ्या टेलीफोन सेवेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत .केवळ मनस्ताप नाही तर माथेरान मधील व्यावसायिक यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्यास देखील दूरसंचार सेवा जबाबदार आहे . भारत दूरसंचार निगम च्या अशा भोंगळ कारभारामुळे माथेरान कर दूरसंचारच्या सेवेला पूर्णपणे कंटाळले आहेत . दरम्यान , गेली तीन वर्षे सतत असे प्रकार होत असल्याने माथेरान मध्ये अनेकांनी दूरसंचार निगमच्या सेवेला रामराम करून खासगी कंपनी यांची सेवा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

माथेरान हे पूर्वी पूर्णपणे भारत दूरसंचार निगमच्या सेवेवर अवलंबून होते. माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, स्थानिक रहिवाशी तसेच लहान सहान उद्योजक यांच्याकडे मिळून किमान पाचशे टेलिफोन होते. त्यानंतर माथेरान मध्ये दूरसंचार निगमच्या मोबाईल सेवेला प्रचंड प्रतिसाद होता. जवळपास आठशे ग्राहक दूरसंचार निगमची सेवा वापरत होते. मात्र आता परिस्थितीत फार बदलली आहे. कारण आजचा विचार करता जवळपास शंभर दूरध्वनी केवळ राहिले आहेत. त्यांची देखील सेवा पर्यटन हंगाम असलेल्या शनिवार आणि रविवारी बंद असते. अशावेळी पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने अनेकांनी आपली मोबाईल सेवा देखील बदली करून घेतली आहे. अन्य नेटवर्क असलेल्या खाजगी कंपनी यांची सेवा चांगली मिळत असल्याने हा बदल सर्वांना व्यवसायासाठी करावा लागला आहे. त्यात महिन्यातून पंधरा दिवस माथेरानमध्ये दूर संचार निगम ची सेवा बंद असते. त्यामुळे युनियन बँकेचे एटीएम, विविध हॉटेल व्यावसाईक यांची बुकिंग, क्रेडीट कार्ड यांची सुविधा बंद पडते . त्यामुळे होणारे नुकसान याची मोजदाद केली असता माथेरान मध्ये भारत दूरसंचार निगमची सेवा कोणालाही फायद्याची नाही.

दुसरीकडे माथेरानमध्ये भारत दूरसंचार निगम जाणीवपूर्वक सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माथेरान कर करीत आहेत . कारण माथेरान मध्ये असलेल्या टेलिफोन कार्यालयात असलेले ऑपरेटर यांचे पाद गेली काही महिन्यापासून रिक्त आहे आहे . त्यामुळे कोणीही तंत्रज्ञ नसल्याने माथेरान मधील कार्यालय ओस पडलेले असते . त्याशिवाय गंभार बाब म्हणजे माथेरान मध्ये असलेल्या भारत दूरसंचार निगम च्या मोबाईल टॉवरला दोन खाजगी कंपनी चे मोबाईल यंत्रे बसविली आहेत. त्यांची सेवा कधीही बंद होत नाही, परंतु बीएसएनएलची सेवा दर आठवड्याला कोलमडून पडते. याचे गौडबंगाल कोणालाही समजून येत नाही. भारत दूरसंचार निगम च्या टॉवरमधून अन्य खासगी कंपनी सेवा देतात.

नवरात्रीतील नवरंग : चौथा दिवस – नारंगी रंग

नारंगी रंग : चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

आई महाकाली ग्रुप
मिनल नर्वेकर
सेन्सो क्रिएशन
किलबिल परिवार (भांडुप-पूर्व)
निसर्ग, लालबाग
प्रतिक्षा नगर सोसायटी सायन
रसिका चंदन गावडे
सरिता सचिन धाडवे (पुणे कसबा पेठ))
पद्मश्री ऐताल
सरोज अरोंडेकर

दिघ्यात नियमबाह्य नळजोडणी

नवी मुंबई ( प्रतिनिधी) : झोपडपट्टी परिसरात १९९५ पूर्वीच्या घरांना काही अटी व शर्थीवर अधिकृत नळ जोडणी मिळत आहे; परंतु दिघा परिसरातील ईश्वर नगर येथील प्रभाग क्रमांक १ व २ विभागातील रहिवाशी नियमबाह्य नळ जोडणी करत आहेत. याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत आहे. यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ती वसुली करावी, अशी मागणी क्रांती ज्योती सावित्रीबाई महिला विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणपत डोळस यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

झोपडपट्टी परिसरातील १९९५ पूर्वीच्या घरांचे पुरावे असतील, तर त्यांना अधिकृतपणे नळ जोडणी मनपाकडून दिली जाते. परंतु दिघा, ईश्वर नगर परिसरातील कमीतकमी ५० टक्के नागरिकांनी आजही अधिकृत नळ जोडणी घेतली नाही. हे नागरिक खासगी नळ जोडणी कारागिरला बोलावून मनपाला न घाबरता नियमबाह्य नळ जोडणी करून देत आहेत. त्यामुळे मनपाला नवी मुंबई स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा चुना लागला असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.

अवैध नळ जोडणी घेणारा रहिवाशी वारेमाप पाणी वापरून बिनधास्तपणे जगत आहे. पण, दुसरीकडे ज्यांनी अधिकृत नळ जोडणी घेतली आहे. त्यांनी त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. तसेच नियमित पाणी देयके भरत आहे. त्यामुळे अवैध नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई करून मागील पूर्णपणे पाणी देयके वसूल करावी, अशीही मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डोळस यांनी केली आहे.

तक्रारींचे आलेले निवेदन पाणी पुरवठा विभागाला पाठवले आहे. तसेच कारवाईच्या सूचना देखील केल्या आहेत. – मनोहर गांगुर्डे, विभाग अधिकारी, दिघा

फटाके विक्रेत्यांकडे लायसन्स नसल्याने पालिकेने बजावली नोटीस

सोनू शिंदे

उल्हासनगर : दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच उल्हासनगरात वर्दळीच्या बाजारपेठेत फटाके विक्रेत्यांकडे लायसन्सच नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे. लायसन्स नसलेल्या या दुकानांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या दुकानाचे लायसन्स,आग प्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही, याचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, उपअधिकारी कुशवाह यांनी कॅम्प नंबर २ मधील वर्दळीच्या नेहरू चौकात असलेल्या ३ आणि कॅम्प नंबर ४ भाजी मार्केटमध्ये असणाऱ्या एका फटाके विक्री करणाऱ्या दुकानाचे सर्वेक्षण केले. तेव्हा त्याच्याकडे लायसन्स नसल्याची बाब उघडकीस आली असून एकाकडे आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ४ फटाके विक्रीच्या दुकानांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.

लायसन्स आणि आग प्रतिबंधक यंत्रणा नसणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असून तो खपवून घेतला जाणार नाही. लायसन्स तत्काळ काढले नाही तर ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार, असा इशारा देखील नाईकवाडे यांनी दिला आहे.

विजेत्या संघाला १२ कोटी

दुबई (वृत्तसंस्था) : टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उप विजेत्या संघाली किती रुपयांचे बक्षीस मिळणार, याबाबत आयसीसीने घोषणा केली आहे. विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स मिळणार आहेत.

सुपर १२ मधील विजेत्या संघांना बोनस मिळणार आहे. सुपर १२च्या प्रत्येक ३० सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स दिले जातील. तर या टप्प्यात नॉकआउट होणाऱ्या संघांना ७० हजार डॉलर्स मिळतील. राउंड १ मध्ये बांगलादेश, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका देश आहेत. तर आफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्टइंडिज हे संघ सुपर १२ मध्ये आहेत.

टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे.

बळीराजाचे कष्ट पाण्यात; परतीच्या पावसाचा धुमाकूळ

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांना मोठा दणका बसला आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस मेघ गजनासह पडत असल्याने कापणीला आलेले भातपीक पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचा सुखाचा घास हिरावला आहे.

पावसामुळे झोपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांना मात्र गहिवरून येत आहे. त्यामुळे या भाताची कापणी करावी कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वषर्भर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पीकवावी की नाही. असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे. कापणीला आलेले भात जमीदोस्त झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मजुरीच्या वाढत्या दरामूळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची भात कापणी लवकरात लवकर करण्याकडे कल आहे. पण मजूर मिळेनासे झाले असून उपलब्ध असलेल्यांचा मजूरीचा भावही चांगलाच वधारला असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाचा वाढलेला धोका पाहता मजूरी वाढीसाठी अडून बसलेल्या मजुरांना विनंत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका

मुख्यमंत्र्यांचा पायगुण!

कुडाळ (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत परतून काही तास उलटत नाहीत तोच माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री शनिवारी सिंधुदुर्गात येऊन गेले. म्हणूनच हा धक्का दिला आहे. ही तर सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेक लोकांचा विश्वास नाही, हे दाखवण्यासाठी कुडाळमधील तीन पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे १०, तर भाजपचे संख्याबळ ८ आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ ८ वरून ११, तर शिवसेनेचे संख्याबळ १० वरून ७ वर घसरले आहे.

शिवसेना कधी संपेल कळणारही नाही

शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही. सुरुंग लावला आहे. अनेकजण कुंपणावर आहेत. शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही. ती वेळ लांब नाही. आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे, असा दावाही त्यांनी केला.

नवाब मलिक, तोंड उघडायला लावू नका

निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात. ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज विकतो, हेच तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग्ज अॅडिक्टला साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

संवादासारखं राहिलं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात संवाद झाला नाही. त्यावरही त्यांनी मिष्किल भाष्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्यासारखं काही नाहीच नव्हतं. नारायण राणे मनात ठेवून काही वागत नाहीत. उद्धव ठाकरे कुजक्या मनाचे आहेत. त्याला आमचे साहेब काय करणार? असा सवालही माजी खासदार निलेश यांनी केला आहे.