Tuesday, July 1, 2025

दिघ्यात नियमबाह्य नळजोडणी

दिघ्यात नियमबाह्य नळजोडणी

नवी मुंबई ( प्रतिनिधी) : झोपडपट्टी परिसरात १९९५ पूर्वीच्या घरांना काही अटी व शर्थीवर अधिकृत नळ जोडणी मिळत आहे; परंतु दिघा परिसरातील ईश्वर नगर येथील प्रभाग क्रमांक १ व २ विभागातील रहिवाशी नियमबाह्य नळ जोडणी करत आहेत. याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत आहे. यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ती वसुली करावी, अशी मागणी क्रांती ज्योती सावित्रीबाई महिला विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणपत डोळस यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.


झोपडपट्टी परिसरातील १९९५ पूर्वीच्या घरांचे पुरावे असतील, तर त्यांना अधिकृतपणे नळ जोडणी मनपाकडून दिली जाते. परंतु दिघा, ईश्वर नगर परिसरातील कमीतकमी ५० टक्के नागरिकांनी आजही अधिकृत नळ जोडणी घेतली नाही. हे नागरिक खासगी नळ जोडणी कारागिरला बोलावून मनपाला न घाबरता नियमबाह्य नळ जोडणी करून देत आहेत. त्यामुळे मनपाला नवी मुंबई स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा चुना लागला असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.


अवैध नळ जोडणी घेणारा रहिवाशी वारेमाप पाणी वापरून बिनधास्तपणे जगत आहे. पण, दुसरीकडे ज्यांनी अधिकृत नळ जोडणी घेतली आहे. त्यांनी त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. तसेच नियमित पाणी देयके भरत आहे. त्यामुळे अवैध नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई करून मागील पूर्णपणे पाणी देयके वसूल करावी, अशीही मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डोळस यांनी केली आहे.


तक्रारींचे आलेले निवेदन पाणी पुरवठा विभागाला पाठवले आहे. तसेच कारवाईच्या सूचना देखील केल्या आहेत. - मनोहर गांगुर्डे, विभाग अधिकारी, दिघा

Comments
Add Comment