ओबीसी आरक्षण सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्र स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पक्षांना ५ आठवडे या प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आणि त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल असे सांगितले.

य़ा प्रकरणी दिनांक २० जुलै २०१७ च्या आदेशानुसार, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती परंतु न्यायालयाने स्पष्ट केले होते की ३६७ संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही, जेथे निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचित करण्यात आली होती.

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप दिवस रखडल्या आहेत, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्यात सत्तांतर झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू केल्यामुळे हा तिढा सुटला. पण राज्यातील ज्या ९२ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती अशा नगरपालिकामध्ये हे आरक्षण लागू होणार नाही, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर सरकारने आरक्षण लागू होण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या दरम्यान कोर्टाने सर्व पक्षाना पाच आठवडे स्थिती जशी आहे तशी ठेवण्याची निर्देश देत, त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल, असे सांगितले आहे.

राऊतांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना एक ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. आज पुन्हा एकदा कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. ईडीच्या आरोपानुसार, गोरेगावातल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊतांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. पुनर्विकासासाठी ही जागा राऊतांच्या कंपनीला दिली होती. मात्र त्याचा काहीच पुनर्विकास झाला नाही, उलट या जागी बांधलेली घरे काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून राऊतांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये जमवले.

त्यानंतर हे पैसे प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते केले. यातले ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप केला आहे.

लाकूड व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत वनमंत्र्यांना भेटणार : निलेश राणे

राजापूर (प्रतिनिधी) : शासनाने लाकूड मालाच्या निर्गतीसाठी लागू केलेल्या ई-टिपी प्रणालीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांना दिली.

शासनाने लाकूड मालाच्या निर्गतीसाठी लागू केलेल्या ई-टिपी प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर कोकणातील लाकूड व्यापारी व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. कोकणातील खासकरून रत्नागिरी जिह्यातील शेतकरी आणि लाकूड व्यापारी वर्गाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी मागणी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनायक दीक्षित व संघटना पदाधिकारी यांनी रविवारी राजापूर तालुका दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन केली.

वन विभागाच्या या जाचक फतव्यामुळे जळाऊ आणि इमारती माल योग्य वेळी बाहेर वाहतूक करणे जिकरीचे झाले असून शेतकरी आणि व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची होणारी आर्थिक कोंडी दूर करावी, अशी मागणी दीक्षित यांनी केली आहे. ही संगणकीय ई-टिपी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मुळात कोकणात दुर्गम भाग आहे, मोबाइल नेटवर्कची वानवा आहे आणि वन विभागाकडे मनुष्य बळ अतिशय कमी आहे. जिल्ह्यात खासगी वन क्षेत्र असल्यामुळे नवीन वाहतूक पास प्रणाली शेतकरी वर्गाच्या मुळावर उठणारी आणि आर्थिक कोंडी करणारी आहे. तरी ही जाचक ई-टिपी प्रणाली त्वरीत रद्द करावी, अशी मागणी दीक्षित यांनी केली आहे.

यावर राणे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी याबाबत आपणाला भेटले आहेत. यासाठी आपण लवकरच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. आमच्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटनेचे नजीर टोले, वसंत पाटील, अंकुश शिवगण, गोपाळ बारस्कर, तानाजी आगटे, मंगेश फोडकर, रवींद्र केंगाळे आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मध्य रेल्वेलाही मिळणार चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेला आता चार वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये लवकरच चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दाखल होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या गाड्या शयनयान प्रकारातील नसतील. या गाड्यांमध्ये केवळ आसन व्यवस्था असेल. राज्यातील जालना, नाशिक, पुणे या मार्गांवर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ चालवण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची बांधणी करण्यात येत आहे. सुमारे ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची तेथे बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ वातानुकूलित डबे असणार आहेत, तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे. पश्चिम रेल्वेवरही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या मार्गावर ही गाडी चालवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रतितास २०० किमी वेगाने धावते. तसेच तुलनेत या एक्स्प्रेसचा खर्चही कमी आहे. भारताबाहेर निर्मिती होणाऱ्या या रेल्वे गाड्यांसाठी जवळपास २९० कोटी रुपये खर्च येतो. मात्र देशात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची निर्मिती ११० ते ११५ कोटी रुपयांमध्ये होत आहे.

खड्डेमुक्त रस्त्यांतून होणार बाप्पाचे आगमन! खड्डे भरण्याचे पालिकेच्या रस्ते विभागाचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाला आठ दिवस शिल्लक असताना आठवड्याभरात रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे निर्देश पालिकेच्या रस्ते विभागाकडून विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना गणपती आगमनाआधी खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची मागणी गणेश मंडळांकडून होत होती. त्याची दखल घेत पालिकेने आठवडाभरात खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्त्यांची पाहणी करण्यासाठी प्रमुख अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले असून त्यांच्या देखरेखीखाली खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सव सुरू होण्याआधी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता एम. एम. पटेल यांनी दिली. दरम्यान खड्डे तातडीने भरायचे काम सुरू असल्याने त्यासाठी काँक्रीट, कोल्डमिक्स आणि पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या रस्त्यांवर खड्ड्यांचे पॅचेस मोठे आहेत त्या ठिकाणी रॅपिड हार्डनिंग काँक्रीट वापरण्यात येत आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने याच दरम्यान जास्तीतजास्त खड्डे भरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शहर आणि पूर्व उपनगरापेक्षा पश्चिम उनगरात जास्तीत जास्त रस्ते आहेत. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता खड्डे भरावे लागणार आहे. रस्ते विभागाने रस्ते अभियंत्यांच्या अंतर्गत पथक तयार केले आहे. या पथकांकडून रस्त्यांची पाहणी सुरू आहे. या दरम्यान खड्ड्यांची माहिती विभाग कार्यालयास कळवली जाते. तर विभाग कार्यालयाकडून ती माहिती संबंधित ठेकेदारास कळवून त्याच्याकडून ते खड्डे भरून घेतले जात आहेत.

सुरक्षेचे गांभीर्य

रायगड जिल्ह्यात शस्त्रासह बोट सापडल्याने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली. आपल्या देशात सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती जाणून न घेता तत्काळ अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरत असल्याने चिंतेचे बाब निर्माण झाली. वृत्तवाहिन्यांवर सातत्याने तीच बातमी दाखविली गेल्याने आणि सोशल मीडियावर तत्काळ हे वृत्त ‘व्हायरल’ झाल्याने चिंतेचे सावट पसरले. कोणत्याही गोष्टीची तळाशी जाऊन सखोल चिकित्सा न करता अफवांवर लगेचच विश्वास ठेवल्याने रायगडच्या बोटीची वस्तुस्थिती काही वेगळीच असताना कपोलकल्पित वृत्त वाऱ्यासारखे पसरले. इतकेच काय एटीएसच्या प्रमुखांनाही रायगडला बोटीच्या ठिकाणी धाव घ्यावी लागली. या धक्क्यातून सावरले जात नाही तोच २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. धमकी देऊन कोणी हल्ला करत नाही आणि हल्ला करणारे कधी धमकी देत नाही. २६/११ च्या घटनेत कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी सागरी मार्गाने हल्ला करत हाहाकार निर्माण केला होता. या घटनेने देशाच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचे निघालेले धिंडवडे जगाला पाहावयास मिळाले. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी कोणत्याही अडथळ्याविना मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’वर पोहोचले. कामा रुग्णालय व परिसरात दहशतीचे तांडव निर्माण केले. गलथान सुरक्षा व्यवस्थेमुळे एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट साळसकर, उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबळे यांसारखी अनेक रत्ने आपल्याला गमवावी लागली. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळपणा आणि देशाच्या सुरक्षेबाबत असलेली अनास्था या घटनेतून जगाला जवळून पाहावयास मिळाली. सुदैवाने रायगडला सापडलेल्या बोटीने चिंतेचे कारण नसल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले असले, तरी यानिमित्ताने निर्माण झालेली धावपळ ही चिंताजनक बाब आहे.

आपणच आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था पोलादी स्वरूपाची निर्माण केली, तर अशा घटनांनी कोणतीही चिंताजनक, धक्कादायक स्वरूपाची भीती निर्माण होणार नाही. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कानाकोपऱ्यांत, गल्लीबोळांत आपण काटेकोरपणे सुरक्षाव्यवस्था निर्माण करू शकत नाही. देशाच्या सीमारेषा मजबूत करण्याचे, सागरी सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे काम केंद्र सरकारचे आहे आणि त्या त्या राज्यांतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रण करण्याचे काम त्या त्या राज्य सरकारचे आहे; परंतु प्रत्येक गोष्ट जवानांवर, पोलिसांवर, नौदलावर, राज्य व केंद्र सरकारवर सोपवून चालणार नाही. आपलाही त्यात सहभाग असणे आवश्यक आहे. कारण कोणतेही कार्य दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीने होणे आवश्यक आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार, जवान, पोलीस, नौदल त्यांचे कार्य प्रामाणिकपणे करत असले तरी विस्तिर्ण भूभाग, वाढती लोकसंख्या पाहता सुरक्षेला मर्यादा पडणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ असा नाही की, सुरक्षेतील ढिसाळपणाचेही समर्थन आपण करतोय. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचे समर्थन कोणी करू शकत नाही आणि करणारही नाही. २६/११च्या घटनेनंतर प्रशासन त्यांच्या पद्धतीने डागडुजीचे, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे कार्य करत आहे; परंतु त्या घटनेनंतर इतक्या वर्षांत आपण काय केले? तकलादू सुरक्षा व्यवस्थेचा कित्येक महिने विषय चघळला. आपले बौद्धिक पाजळत मत मांडले. दर वर्षी मेणबत्त्या पेटवित २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना व मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वसामान्यांना श्रद्धाजंली वाहणे यापलीकडे काय केले? दर वर्षी २६/११ आल्यावर त्या घटनेला उजाळा देणे, सोशल मीडियावर पोस्टर, बॅनर व्हायरल करून श्रद्धाजंली वाहताना त्यातही आपली प्रसिद्धी करण्याचे सोपस्कारही राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील घटकांकडून प्रामाणिकपणे पार पाडले जातात.

मुंबई शहराच्या क्षेत्रफळाच्या तुलनेने लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. एका किलोमीटरचाही विचार केल्यास लोकसंख्या हजारोंच्या संख्येत आहे. तुटपुंज्या पोलिसांची कायदा व सुव्यस्था राखताना निश्चित दमछाक होणारच. सत्ताधाऱ्यांवर अकुंश ठेवण्यासाठी जनसामान्यांमध्ये जागरूकता हवीच; परंतु ही जागरूकता स्वातंत्र्यापासून आजतागायत निर्माण न झाल्याने व केवळ मतदान करण्यापुरतेच आपण लोकशाहीतील योगदान सीमित ठेवल्याने प्रस्थापित राजकीय घटकांवर जनसामान्यांचा प्रभाव दिसत नाही व दिसणारही नाही. २६/११च्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला; परंतु या निर्णयाचे काय झाले, कोठे कोठे कार्यवाहीला सुरुवात झाली, कोठे अडथळे निर्माण झाले याबाबत कोणाला काहीही माहिती नाही. जनता उदासीन असेल, तर राज्यकर्त्यांचेही फावते हा पाठ इतिहासकालापासून आजतागायत गिरवलेला पाहावयास मिळतो. सुरक्षेबाबत प्रत्येकाने आत्मियता व जागरूकता दाखविणे काळाची गरज आहे.

सुरक्षेबाबत प्रशासनाला जनसामान्यांचीही साथ मिळाली, तर या देशावर पुढच्या हजारो वर्षांत २६/११ सारखा हल्ला करण्याची हिमंत कोणी माईचा लाल दाखवू शकणार नाही. देशाचे, राज्याचे, मुंबईचे सोडा, साधे आपण राहत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षेबाबत आपण कितपत जागरूकता दाखवितो? उदासीनच राहतो. राहत असलेल्या ठिकाणी आपण जागरूकता दाखवत नसू, तर देशाच्या, राज्याच्या, मुंबईच्या सुरक्षेबाबत मत मांडण्याचा, पुतना मावशीसम प्रेम दाखविण्याचा आपल्याला काडीमात्र अधिकार नाही. सोसायटीत सुरक्षारक्षक ठेवला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या जीवावर आपण करोडो रुपयांची मालमत्ता सोपवून निर्धास्त वावरत असतो. हीच चूक कालांतराने घोडचूक झाल्याचे आपणास सोसायटी आवारात दुर्घटना घडल्यावर समजते. नेमका तोच प्रकार आज देशाच्या, राज्याच्या व मुंबईच्या सुरक्षेबाबत घडत आहे. या घटना टाळण्यासाठी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची प्रत्येकानेच काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षेबाबत आपण आत्मियता उक्तीतून नाही, तर कृतीतून दाखविल्यास २६/११चा हल्ला तर सोडाच, पण रायगडसारखी कोणत्याही भागात संशयास्पद अवस्थेत बोट सापडल्यास आपणास धावपळ करण्याची अथवा भीतीच्या सावटामध्ये वावरण्याची वेळ कधीच येणार नाही.

“शेअर बाजारातील एका मोठ्या पर्वाचा युगान्त”

सर्वेश सोमण

शेअर बाजार उच्चांकाला असतानाच मागील आठवड्याच्या सलग सुट्ट्या संपत असतानाच १४ ऑगस्टला अत्यंत दु:खद बातमी समोर आली आणि साधारणपणे मागील काही दशकांपासून गुंतवणूक करीत असलेले तसेच नव्याने सुरुवात केलेले आणि करू पाहणारे या सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले. याला कारणही तसेच होते ते म्हणजे बिग बुल, अर्थात राकेश झुनझुनवाला यांचे निधन. राकेश झुनझुनवाला हे नाव शेअर बाजारात असलेल्यांना नवीन नाही. मलादेखील या व्यक्तीची मोहिनी पडली ती साधारण १५ वर्षांपूर्वीच. आजच्या माझ्या लेखातून या अफलातून, अभ्यासू, माणसाला श्रद्धांजली आणि त्रिवार वंदन.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी झाला. राकेश झुनझुनवाला एक भारतीय अब्जाधीश व्यापारी, शेअर व्यापारी, गुंतवणूकदार आणि व्यवसायाने सीए होते. त्यांनी १९८५मध्ये ५ हजारच्या भांडवलासह गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, १९८६ मध्ये त्यांचा पहिला मोठा नफा होता. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची अंदाजे निव्वळ संपत्ती जवळपास ४५ हजार करोड होती, ज्यामुळे ते जगातील ४३८वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांच्या स्वत:च्या मालमत्ता, व्यवस्थापन फर्म तसेच अनेक इतर एंटरप्रायझेसमध्ये भागीदार होते. सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबतच त्यांनी अनेक कंपन्यांचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम केले. ते अकासा या एअर कंपनीचे संस्थापकही होते. आतल्या व्यापारासाठी त्याची चौकशी करण्यात आली आणि २०२१ मध्ये सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोबत सेटलमेंट झाली. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट किंवा भारताचा मोठा बुल म्हणून संबोधले जाते ते त्यांचा अंदाज आणि दीर्घमुदतीचा दृष्टिकोन यामुळेच.

राकेश झुनझुनवाला हे मुंबईत राजस्थानी मारवाडी कुटुंबात वाढले, जिथे त्याचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. राकेश झुनझुनवाला यांना स्टॉक मार्केटमध्ये रस निर्माण झाला, जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या मित्रांसोबत बाजारावर चर्चा करताना पाहिले. त्याच्या वडिलांनी त्यांना मार्केटमध्ये मार्गदर्शन केले. मात्र सुरुवातीला कधीही गुंतवणुकीसाठी पैसे दिले नाहीत व मित्रांकडे पैसे मागण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये ५ हजार भांडवलापासून सुरुवात केली, राकेश झुनझुनवालाचा पहिला मोठा नफा १९८६मध्ये ५ लाखांच्या रूपात आला. ज्यामध्ये त्यांनी “टाटा टी” या कंपनीची खरेदी आणि विक्री केलेली होती. १९८६ ते १९८९ दरम्यान, त्यांनी जवळपास २०-२५ लाख नफा कमावला. त्यानंतर १९९०ला बजेट येणार होते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणारे जवळपास सर्वांनाच या बजेटमधून शेअर बाजारासाठी फार काही नाही असेच वाटत होते. मात्र तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि बजेट सादर करणारे वित्तमंत्री मधु दंडवते हे या बजेट मधून शेअर बाजारासाठी नक्की चांगल्या गोष्टी करतील, असा विश्वास बाळगणारे होते राकेश झुनझुनवाला. बजेट आले आणि त्यानंतर शेअर बाजाराने मोठी तेजी दाखविली. ज्यामध्ये यांनी जवळपास ४ कोटी इतका मोठा नफा कमाविला. २०२२ पर्यंत त्यांची गुंतवणूक जवळपास ४५ हजार कोटी झाली होती. त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत होती. त्यापाठोपाठ ल्युपिन आणि क्रिसिल या कंपन्यांचा नंबर लागतो. त्यांनी त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन फर्म, रेअर एंटरप्रायझेसमध्ये भागीदार म्हणून स्वतःचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित केला.

सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबतच झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रा.लि.चे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लि., प्राज इंडस्ट्रीज लि., प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉन्कॉर्ड बायोटेक लि., इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लि., मिड डे मल्टिमीडिया लि., नागार्जुन कन्स्ट्रक्शन लि., या कंपनीच्या संचालक मंडळावर बसले. व्हाईसरॉय हॉटेल्स लि. आणि टॉप्स सिक्युरिटी लिमिटेड ते भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या संयुक्त राष्ट्रांच्या (I.I.M.U.N.) सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते.

२०२१ मध्ये, त्यांनी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्यासमवेत अकासा ही भारतातील कमी किमतीची विमान कंपनी सह-स्थापना केली. नवीन एअरलाइनकडे २ विमाने आहेत. आणखी ७० विमानांसाठी अतिरिक्त ऑर्डर आहे. याच महिन्यात त्यांच्या विमानांनी उड्डाण केले आहे. या माणसाने जे केले ते खरंच सर्वसामान्यांना अशक्यप्रायच. मग हे या माणसाला कसे बरे साध्य झाले असावे? ज्यावेळी मी वैयक्तिक या गोष्टीचा विचार करतो त्यावेळी लक्षात येते, हे शक्य झाले ते त्यांच्या दीर्घमुदतीच्या दृष्टिकोनामुळेच.

राकेश झुनझुनवाला हा माणूस खरंच याबाबत अफलातून. आपण एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यामध्ये थोडीफार वाढ किंवा घट झाल्यावर आपण लगेच चलबिचल होतो. मात्र या माणसामध्ये जो संयम होता तोच त्यांना सर्वात यशस्वी करून गेला. त्यांची सर्वात जास्त गुंतवणूक असणारी कंपनी टायटन. ज्यामध्ये त्यांनी हा शेअर केवळ ३ रुपये किमतीला असतानाच खरेदी केला होता. त्यानंतर आजपर्यंत या खरेदी केलेल्या शेअरमधील एकही शेअर या माणसाने विकलेला नाही. टायटन ३ रुपये किमतीवरून ३०० रुपये झाला, तरीही हा माणूस शांत आणि संयम ठेवून बसला. त्यानंतर ३००चा ३००० झाला, तरीही यांनी आपला संयम कायम ठेवला. इतका संयम आणि तोदेखील जवळपास २५ ते ३० वर्षे ठेवायचा तो याच माणसाने. या माणसाने अफाट संपत्ती कमाविली आणि त्यामधील काही संपत्ती दानही केली. शेअर बाजारासोबत यांनी इंग्लिश विंग्लिश, कि अॅण्ड का, शामिताभ या चित्रपटांची निर्मितीही केली. यांची तुलना नेहमीच जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक यशस्वी गुंतवणूदार वॉरेन बफेट यांच्यासोबत केली गेली. मात्र दोघेही आपापल्या ठिकाणी ग्रेटच!! या दोघांचा जर अभ्यास केला, तर लक्षात येईल की, वॉरेन बफेट यांनी जी संपत्ती कमावली ती साधारण २२ ते २३ टक्के वार्षिक कंपाऊंड रिटर्नने कमावली, तर राकेश झुनझुनवाला यांनी सरासरी ४८ ते ४९ टक्के वार्षिक कंपाऊंड रिटर्नने कमावली. याबाबत राकेश झुनझुनवाला हे बफेटपेक्षा नक्कीच उजवे ठरले. राकेश झुनझुनवाला यांना जर बफेटइतके आयुष्य मिळाले असते, तर त्यांनी बफेट यांना नक्कीच मागे टाकले असते. पण हे होणे नियतीला मान्य नव्हते. शेअर बाजारावर नितांत प्रेम करणाऱ्या या माणसाने मार्केटला सुट्टी असतानाच अखेरचा श्वास घेतला आणि आर. जे. पर्वाची अखेर झाली.

ते अनेकांचे आयडॉल होते. मी तर म्हणेन तरुण वर्ग हा शेअर बाजाराकडे आकर्षित झाला तो त्यांच्यामुळेच. आपल्याला नेहमीच एक रोल मॉडेल हवा असतो. एक असा चेहरा जो आपल्याला आपलासा आपल्यातला वाटेल आणि मला वाटते भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासात तो मान फक्त राकेश झुनझुनवाला यांचाच राहील.

निर्बंधमुक्त सण, मात्र तरीही जबाबदारी गरजेची

सीमा दाते

गेले दोन वर्षे कोरोनामुळे सगळ्याच सणांवर निर्बंध आले होते. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे नागरिकांना सण साजरे करता येत आहे. मात्र यासाठी नागरिकांनी भान हरपून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सध्या जन्माष्टमी, दहीहंडी उत्साहाने साजरे झाले, तर अवघ्या काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठीही निर्बंधमुक्त मुंबई सज्ज झाली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष पाहायला मिळणार आहे, तर दर वर्षीप्रमाणे यंदा परळ लालबाग पुन्हा दुमदुमणार आहे. याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे सगळ्यांनीच अभिनंदन केले आहे. मात्र तरीही कोरोनाची भीती मात्र गेलेली नाही. गेल्या दोन वर्षांत मुंबईत कोरोनाचा कहर होता. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे नियम आखले होते. यामुळे सगळ्याच सणांवर निर्बंध आणले होते. मात्र आता कोरोना रुग्णसंख्येचा प्रभाव कमी झाल्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सणांवरील निर्बंध काढले आहेत. मात्र आता गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या ही पार गेली आहे. त्यामुळे सण साजरे करताना यंदा निर्बंध नसले तरी भान ठेवूनच साजरे करावे लागणार आहेत.

१९ ऑगस्ट रोजी मुंबईत १०११, तर २० ऑगस्ट रोजी ८४० इतकी कोरोना रुग्णसंख्या होती. ही रुग्णसंख्या एकदम वाढत नसली, तरी हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून सण साजरे करताना जागरूक राहणेही तितकेच गरजेचे आहे. सरकारने सण निर्बंधमुक्त केले, ही चांगलीच बाब आहे. पण सध्या वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आणखीन वाढू नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा सण, उत्सव साजरे करण्यासाठी चांगलीच सवलत मिळाली आहे. यामुळे सण, उत्सव जोरातच साजरे होणार आहेत. मात्र सणांच्या दरम्यान होणारी गर्दी, बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी ही कोरोना वाढण्यासाठी कारणीभूत ठरू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपण स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेने मुंबईत मास्कसक्ती देखील हटविली आहे. मात्र वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता मास्क वापरणे बांधनकारक नसले, तरी आवाहन करण्यात आले आहे. आपण आपली काळजी घेण्यासाठी जबाबदारीने वागणे आणि भान ठेवणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यापैकी ९५ टक्के रुग्ण हे लक्षणविरहित आहे. या रुग्णांमध्ये कोरोनासंबंधीत कोणतीच लक्षणे दिसत नाही, तर केवळ ५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहे.त्यामुळे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होणार आहे म्हणून सरकारने गणेशोत्सव मंडळांना उंच मूर्त्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसाठीही या वर्षी परवानगी दिली आहे तसेच रस्त्यांवर सर्वजनिक ठिकाणी बांधणारे मंडप, त्यासाठी महापालिका आणि इतर विभाग अग्निशमन दल यांना देणारी रक्कमही पालिकेने या वर्षी रद्द केली आहे. त्यामुळे आधीच गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांना जबाबदारी पाळूनच आनंदाने सण, उत्सव साजरे करावे लागणार आहेत. येत्या काही दिवसांत गणपती उत्सवानंतर आगामी काळात दसरा, दिवाळीसारखे मोठे सण येणार आहेत. या काळात लोक एकमेकांना भेटत असतात. इतकेच नाही, तर बाजारातही या सणांमध्ये गर्दी असते. त्यामुळे येत्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी पालिका प्रयत्न करेलच. मात्र नागरिकांनीदेखील सतर्क राहावे लागणार आहे.त्यामुळे सण, उत्सव साजरे करताना नागरिकांना गाफील होऊन चालणार नाही.

सध्या मुंबईत दहीहंडीचा सण जोरदार साजरा झाला. मात्र येणाऱ्या गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये ही गर्दी जास्त होत असते. राज्य सरकारने सण निर्बंधमुक्त केल्यानंतर पालिकेनेही कोणते निर्बंध ठेवले नाहीत. गेल्या दोन वर्षांत सगळ्याच पर्यटन क्षेत्रावरही बंदी होती. गेल्या वर्षात कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, चौपाट्या, हॉटेल, धार्मिक स्थळे, मंदिरे या सगळ्यांसाठी ती नियमावली होती. मात्र आता सर्वच उद्याने, मैदाने चौपाट्या सामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या आणि म्हणूनच पुन्हा एकदा भीती वाढू लागली. त्यातच लोकही आता बिनधास्त झाले आहेत. मात्र असे असताना सध्या मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्यामुळे आता नागरिकांनी देखील सण साजरे करावेच. पण योग्य ती काळजी घेऊनच. यंदा शिंदे आणि फडणवीस सरकारने सणांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्याच नागरिकांचे सण आनंदाने साजरे होणार आहेत. लालबाग-परळमध्ये गेल्या दोन वर्षांत न झालेली लगबग सुरू झालेली आहे. मात्र आता नागरिकांना आपल्या जबाबदारीचे भान जपत सण साजरे करावे लागणार आहेत.

शिंप्यास समंध बाधा

विलास खानोलकर

एका शिंप्यास समंध बाधा होती, याची जाणीव त्याला नव्हती. पण श्री स्वामी त्याबद्दल कसे अनभिज्ञ राहणार? शिंप्याची समंध बाधा घालविण्यापूर्वी श्री स्वामींनी त्याच्याकडून अन्नदानाचे पुण्य करून घेतले. ५० लोकांच्या स्वयंपाकात ५०० माणसे जेवू शकली. त्याच्या या पुण्यशील कृतीमुळे काही प्रमाणात का होईना, समंधबाधित शिंप्याचे प्रारब्ध सौम्य झाले होते. समंधाला नेहमी गती (म्हणजे पुढील अवस्था) हवी असते. तशीच त्या शिंप्यामधील समंधालाही हवी असणारच. प्रसाद भोजनानंतर समंधबाधित शिंपी श्री स्वामींपुढे येऊन बसला. श्री स्वामी हे तर अशा समंधाचे कर्दनकाळ. समंधचा क्रोध श्री स्वामींना पाहताच उफाळून आला. ‘संन्याशास (श्री स्वामींस) असले खेळ कशाला पाहिजेत?’ म्हणून तो मोठमोठ्याने ओरडून नाचू लागला; परंतु श्री स्वामी समर्थांचे दर्शनच इतके प्रभावी होते की, त्यापुढे समंधाची मात्रा चालली नाही.

श्री स्वामी महाराज गरजले, ‘समंधाच्या मुसक्या बांधा’ श्री स्वामी मुखातील वाक्य म्हणजे महामंत्र, हे वाक्य ऐकताच त्या समंधाची स्थिती लुळी-पांगळी झाली. समंध पूर्णतः हतबल झाला. त्याला ती अवस्था सहन होईना. समंध श्री स्वामींची पार्थना करून सारखा पाया पडू लागला. श्री स्वामी तर कृपेचे सागर. त्यांनी समंधावर कृपा करून त्यास मुक्ती दिली. त्यासरशी सबंधबाधित शिंपी समंधातून मुक्त होऊन उठून बसला. समंधमुक्त शिंप्याने त्याचे उर्वरित आयुष्य श्री स्वामी उपासनेत घालविले.

या लीलेचा मथितार्थ इतकाच की, श्री स्वामी समर्थ सेवा कुणामध्येही अदृश्य स्वरूपात असलेली समंध बाधा अथवा पिशाच्चबाधेचे उच्चाटन करून त्या व्यक्तीस मुक्त आनंदी व सुखी करते. श्री स्वामी समर्थांच्या या सामर्थ्याबद्दल श्री गुरूलीलामृतात म्हटले आहे, ‘तंत्र-मंत्र-यंत्र-धूप-अंगारे दोरे। अन्न, वस्त्र फलादिक सर्व उतारे। न लगती पंचाक्षरी भूत काढणारे। द्रव्य देणारे फसवूनि ।।१३३।। अंगात आणणे बोलविणे।, हे काहीच न लगे करणे। केवळ दत्तात्रेय स्वामिदर्शने। पिशाच्यादि पावती सुगतीस ।।१३४।।‘ (श्री गुरूलीलामृत अ. ४८ श्लो. १३३,१३४)

ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकरांनी श्रीगुरू लीलामृतात केलेले वर्णन सद्यस्थितीतही लागू पडणारे आहे. ज्यांचे समंध, भूत, पिशाच्च, प्रारब्ध आदीबाबत घोर अज्ञान आहे. भोंदू, साधू, बुवा आदी अशा साध्या-भोळ्या, गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. मंत्र-तंत्र-यंत्र-धूप-अंगारे-धुपारे आदींचा वापर करून लुटतात. हे आपण ऐकतो, पाहतो, वाचतो पण बोध काय घेतो? श्री स्वामी समर्थंना अपेक्षित असलेली अंधश्रद्धा वाढू न देणे, हीसुद्धा श्री स्वामी समर्थ उपासनाच आहे.

सावित्री – गांधारी पुलावर पथदिव्यांचा अभाव

महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २०१६ रोजी झालेल्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी लोकार्पणप्रसंगी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षिततेच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांपासून सदरील पुलावरील पथदिवे बंद असून त्याकडे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लार्सन टुब्रो कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये नव्या गांधारी व सावित्री नदीवरील पुलावर पथदिवे आजपावेतो उभे करण्यात आलेले नाही. २ ऑगस्ट २०१६ रोजी सावित्री पूल दुर्घटनेनंतर केवळ १८० दिवसांमध्ये त्याच ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करून तो जनतेला लोकार्पण करताना रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा अपघात असल्याने यापासून बोध म्हणून नदीवरील पुलावर पथदिवे व कॅटआइज लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर संबंधित पुलांवर पहिल्या दोन वर्षांकरिता हे पथदिवे सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून या पथदिव्यांची बिले वेळेवर भरली न गेल्याने दोन ते तीनवेळा महावितरण विभागाने येथील कनेक्शन तोडले होते. गेल्या पाच वर्षात पुलावरील पथदिव्यांच्या बाबतीत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आगामी गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भाविकांचा वाढता राबता पाहता सदरील पुलावर पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.