रायगड जिल्ह्यात शस्त्रासह बोट सापडल्याने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली. आपल्या देशात सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती जाणून न घेता तत्काळ अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरत असल्याने चिंतेचे बाब निर्माण झाली. वृत्तवाहिन्यांवर सातत्याने तीच बातमी दाखविली गेल्याने आणि सोशल मीडियावर तत्काळ हे वृत्त ‘व्हायरल’ झाल्याने चिंतेचे सावट पसरले. कोणत्याही गोष्टीची तळाशी जाऊन सखोल चिकित्सा न करता अफवांवर लगेचच विश्वास ठेवल्याने रायगडच्या बोटीची वस्तुस्थिती काही वेगळीच असताना कपोलकल्पित वृत्त वाऱ्यासारखे पसरले. इतकेच काय एटीएसच्या प्रमुखांनाही रायगडला बोटीच्या ठिकाणी धाव घ्यावी लागली. या धक्क्यातून सावरले जात नाही तोच २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. धमकी देऊन कोणी हल्ला करत नाही आणि हल्ला करणारे कधी धमकी देत नाही. २६/११ च्या घटनेत कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी सागरी मार्गाने हल्ला करत हाहाकार निर्माण केला होता. या घटनेने देशाच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचे निघालेले धिंडवडे जगाला पाहावयास मिळाले. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी कोणत्याही अडथळ्याविना मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’वर पोहोचले. कामा रुग्णालय व परिसरात दहशतीचे तांडव निर्माण केले. गलथान सुरक्षा व्यवस्थेमुळे एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट साळसकर, उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबळे यांसारखी अनेक रत्ने आपल्याला गमवावी लागली. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळपणा आणि देशाच्या सुरक्षेबाबत असलेली अनास्था या घटनेतून जगाला जवळून पाहावयास मिळाली. सुदैवाने रायगडला सापडलेल्या बोटीने चिंतेचे कारण नसल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले असले, तरी यानिमित्ताने निर्माण झालेली धावपळ ही चिंताजनक बाब आहे.
आपणच आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था पोलादी स्वरूपाची निर्माण केली, तर अशा घटनांनी कोणतीही चिंताजनक, धक्कादायक स्वरूपाची भीती निर्माण होणार नाही. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कानाकोपऱ्यांत, गल्लीबोळांत आपण काटेकोरपणे सुरक्षाव्यवस्था निर्माण करू शकत नाही. देशाच्या सीमारेषा मजबूत करण्याचे, सागरी सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे काम केंद्र सरकारचे आहे आणि त्या त्या राज्यांतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रण करण्याचे काम त्या त्या राज्य सरकारचे आहे; परंतु प्रत्येक गोष्ट जवानांवर, पोलिसांवर, नौदलावर, राज्य व केंद्र सरकारवर सोपवून चालणार नाही. आपलाही त्यात सहभाग असणे आवश्यक आहे. कारण कोणतेही कार्य दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीने होणे आवश्यक आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकार, जवान, पोलीस, नौदल त्यांचे कार्य प्रामाणिकपणे करत असले तरी विस्तिर्ण भूभाग, वाढती लोकसंख्या पाहता सुरक्षेला मर्यादा पडणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ असा नाही की, सुरक्षेतील ढिसाळपणाचेही समर्थन आपण करतोय. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचे समर्थन कोणी करू शकत नाही आणि करणारही नाही. २६/११च्या घटनेनंतर प्रशासन त्यांच्या पद्धतीने डागडुजीचे, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे कार्य करत आहे; परंतु त्या घटनेनंतर इतक्या वर्षांत आपण काय केले? तकलादू सुरक्षा व्यवस्थेचा कित्येक महिने विषय चघळला. आपले बौद्धिक पाजळत मत मांडले. दर वर्षी मेणबत्त्या पेटवित २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना व मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वसामान्यांना श्रद्धाजंली वाहणे यापलीकडे काय केले? दर वर्षी २६/११ आल्यावर त्या घटनेला उजाळा देणे, सोशल मीडियावर पोस्टर, बॅनर व्हायरल करून श्रद्धाजंली वाहताना त्यातही आपली प्रसिद्धी करण्याचे सोपस्कारही राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील घटकांकडून प्रामाणिकपणे पार पाडले जातात.
मुंबई शहराच्या क्षेत्रफळाच्या तुलनेने लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. एका किलोमीटरचाही विचार केल्यास लोकसंख्या हजारोंच्या संख्येत आहे. तुटपुंज्या पोलिसांची कायदा व सुव्यस्था राखताना निश्चित दमछाक होणारच. सत्ताधाऱ्यांवर अकुंश ठेवण्यासाठी जनसामान्यांमध्ये जागरूकता हवीच; परंतु ही जागरूकता स्वातंत्र्यापासून आजतागायत निर्माण न झाल्याने व केवळ मतदान करण्यापुरतेच आपण लोकशाहीतील योगदान सीमित ठेवल्याने प्रस्थापित राजकीय घटकांवर जनसामान्यांचा प्रभाव दिसत नाही व दिसणारही नाही. २६/११च्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला; परंतु या निर्णयाचे काय झाले, कोठे कोठे कार्यवाहीला सुरुवात झाली, कोठे अडथळे निर्माण झाले याबाबत कोणाला काहीही माहिती नाही. जनता उदासीन असेल, तर राज्यकर्त्यांचेही फावते हा पाठ इतिहासकालापासून आजतागायत गिरवलेला पाहावयास मिळतो. सुरक्षेबाबत प्रत्येकाने आत्मियता व जागरूकता दाखविणे काळाची गरज आहे.
सुरक्षेबाबत प्रशासनाला जनसामान्यांचीही साथ मिळाली, तर या देशावर पुढच्या हजारो वर्षांत २६/११ सारखा हल्ला करण्याची हिमंत कोणी माईचा लाल दाखवू शकणार नाही. देशाचे, राज्याचे, मुंबईचे सोडा, साधे आपण राहत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षेबाबत आपण कितपत जागरूकता दाखवितो? उदासीनच राहतो. राहत असलेल्या ठिकाणी आपण जागरूकता दाखवत नसू, तर देशाच्या, राज्याच्या, मुंबईच्या सुरक्षेबाबत मत मांडण्याचा, पुतना मावशीसम प्रेम दाखविण्याचा आपल्याला काडीमात्र अधिकार नाही. सोसायटीत सुरक्षारक्षक ठेवला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या जीवावर आपण करोडो रुपयांची मालमत्ता सोपवून निर्धास्त वावरत असतो. हीच चूक कालांतराने घोडचूक झाल्याचे आपणास सोसायटी आवारात दुर्घटना घडल्यावर समजते. नेमका तोच प्रकार आज देशाच्या, राज्याच्या व मुंबईच्या सुरक्षेबाबत घडत आहे. या घटना टाळण्यासाठी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची प्रत्येकानेच काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षेबाबत आपण आत्मियता उक्तीतून नाही, तर कृतीतून दाखविल्यास २६/११चा हल्ला तर सोडाच, पण रायगडसारखी कोणत्याही भागात संशयास्पद अवस्थेत बोट सापडल्यास आपणास धावपळ करण्याची अथवा भीतीच्या सावटामध्ये वावरण्याची वेळ कधीच येणार नाही.