राजापूर (प्रतिनिधी) : शासनाने लाकूड मालाच्या निर्गतीसाठी लागू केलेल्या ई-टिपी प्रणालीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांना दिली.
शासनाने लाकूड मालाच्या निर्गतीसाठी लागू केलेल्या ई-टिपी प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर कोकणातील लाकूड व्यापारी व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. कोकणातील खासकरून रत्नागिरी जिह्यातील शेतकरी आणि लाकूड व्यापारी वर्गाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी मागणी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनायक दीक्षित व संघटना पदाधिकारी यांनी रविवारी राजापूर तालुका दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन केली.
वन विभागाच्या या जाचक फतव्यामुळे जळाऊ आणि इमारती माल योग्य वेळी बाहेर वाहतूक करणे जिकरीचे झाले असून शेतकरी आणि व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची होणारी आर्थिक कोंडी दूर करावी, अशी मागणी दीक्षित यांनी केली आहे. ही संगणकीय ई-टिपी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मुळात कोकणात दुर्गम भाग आहे, मोबाइल नेटवर्कची वानवा आहे आणि वन विभागाकडे मनुष्य बळ अतिशय कमी आहे. जिल्ह्यात खासगी वन क्षेत्र असल्यामुळे नवीन वाहतूक पास प्रणाली शेतकरी वर्गाच्या मुळावर उठणारी आणि आर्थिक कोंडी करणारी आहे. तरी ही जाचक ई-टिपी प्रणाली त्वरीत रद्द करावी, अशी मागणी दीक्षित यांनी केली आहे.
यावर राणे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी याबाबत आपणाला भेटले आहेत. यासाठी आपण लवकरच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. आमच्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राजापूर तालुका लाकूड व्यापारी संघटनेचे नजीर टोले, वसंत पाटील, अंकुश शिवगण, गोपाळ बारस्कर, तानाजी आगटे, मंगेश फोडकर, रवींद्र केंगाळे आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.