बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा चर्चेतून मार्ग निघू शकतो : निलेश राणे

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे बारसू गावात पोहोचले होते. मात्र, रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी निलेश राणे यांनी आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

माजी खासदार निलेश राणे ग्रामस्थांना म्हणाले, यावेळी मी आहे, आपण बसून बोलू. चर्चा करू, हा राज्य आणि केंद्र सरकारने प्रकल्प आणला आहे. हा निलेश राणेचा प्रकल्प नाही. सरकारशी बोलावे लागेल. आता अधिवेशने सुरु आहेत. सरकारशी बोलून मार्ग काढू अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली.

नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तिकडे विनाशकारी ठरते, मग आमच्या गावात ती चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलकांमधील महिलांनी केला. यावेळी नितेश राणे यांनी तुम्ही जागा ठरवा आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, ते सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, ते ठिकाण सांगणार आहेत, असे म्हटले.

खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले आहे. अनेकांनी सरकारच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळे आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानकं तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेले म्हणून आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबईतील मीटर रीडिंग एजन्सीजवर कारवाईचा बडगा

मुंबई (वार्ताहर) : मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मन:स्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेत महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी राबविलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून एप्रिल ते जून २०२२ या ३ महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल ३ (८२५ द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरु करीत राज्यातील ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलींगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज या एजन्सींजना देण्यात आली आहे. अचुक मीटर रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलासोबतच वीज वितरण हानीतही घट होत असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट वीज ग्राहकांना होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’च्या संख्येत वाढ

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत ५२ ने वाढ झाल्याने रुग्णांची संख्या ४०२ झाली. स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, कोरोनासह स्वाइन फ्लूचा मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४०२ वर, तर मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

मनीष सिसोदियांसह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस, देशाबाहेर जाण्यास बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात ‘सीबीआय’ने रविवारी दिल्लीचे उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित उर्वरित आरोपींविरुद्धही ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून कोणीही देश सोडून जाऊ नये. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सिसोदियांसह अन्य १३ जणांविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाच्या चौकशीप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या सरकारी निवासस्थानी सीबीआयने धाड टाकली होती. जवळपास १४ तास चाललेल्या या कारवाईत सिसोदियांचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी काही महत्वाचे दस्तावेजही आपल्यासोबत नेले होते.

‘अंतिम पंघाल बनली भारताची पहिली ‘गोल्डन गर्ल’

बल्गेरिया : भारताच्या अंतिम पंघालने बल्गेरियातील २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. हरियाणातील हिसारची अंतिम पांघलने फक्त सुवर्ण पदक जिंकले नाही तर २० वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तूपटू देखील बनली.

अंतिम पांघलची आई कृष्णा कुमारी यांनी अंतिमच्या नावामागची गोष्ट सांगितली. कृष्णा कुमारी म्हणाल्या की, ‘आम्हाला एकूण चार मुली आहेत. त्यामुळे आम्ही या शेवटच्या मुलीचे नाव अंतिम ठेवले कारण आम्हाला अजून मुली नको होत्या. ही शेवटची मुलगी म्हणून तिचे नाव अंतिम ठेवले.’

अंतिमच्या जन्मानंतर कुटुंबीय निराश असले तरी खेळाप्रति तिचे वेड पाहून त्यांचे विचार बदलले. अंतिमचे पिता रामनिवास सांगतात, ‘मुलगी कुस्तीबाबत अतिशय गंभीर होती. त्यामुळे आम्हाला गाव सोडून हिसारला स्थायिक व्हावे लागले. अंतिमला शुद्ध दूध मिळावे म्हणून घरी तीन म्हशी आणि एक गाय विकत घेतली. पैशांची चणचण भासताच ट्रॅक्टरसुद्धा विकला.’ प्रशिक्षक प्रदीप सिहाग यांनी सांगितले, ‘अंतिम आधीपासूनच खूप ऊर्जावान आहे. तिने राष्ट्रकुल ट्रायलमध्ये विनेश फोगाटसारख्या मल्लालाही चकित केले होते.’

रेल्वेवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या कोणत्या मार्गांवर

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी, २१ ऑगस्ट रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आहे. विकेंडला लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे बदललेले वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर

मध्य रेल्वेने शनिवार व रविवार रात्री विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर २० ऑगस्टच्या रात्री ११.३० ते २१ऑगस्टच्या पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १२.४० ते ५.४० पर्यंत डाउन जलद मार्गावर ब्लॉक आहे.

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर

सीएसएमटी टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा व गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटींसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव या दरम्यानच्या जलद मार्गावर आणि बोरिवली ते कांदिवली धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत डाउन मार्गावरील जलद लोकल या अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तर, डाउन मार्गावरील एक्स्प्रेस, मेल गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

नाही चिरा नाही पणती…!

विभावरी बिडवे

भारतीयांसाठी १९४७ नंतरचा कोणताही १६ ऑगस्टचा दिवस तसा दुय्यमच! कारण त्याचं दिवसमाहात्म्य काही नाही. पण तरी स्वातंत्र्याच्या आनंदात, देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, हुतात्म्यांच्या पावन स्मृतीत, तरीदेखील आशादायक आणि सकारात्मक विचाराने उजाडणारी ती सकाळ. ‘जरा याद करो कुर्बानी’ ऐकत ऐकत एखाद्या आपल्या स्वतःच्या कोशात रमलेल्या माणसालाही काही करायची उमेद येईल, अशी एखादी सकाळ. मग देशासाठी एखाद्या आयुष्य वाहून दिलेल्या व्यक्तीसाठी, तर हा दिवस किती सकारात्मक असेल? पण स्वातंत्र्यानंतर ४४ वर्षांनी स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी एका कार्यालयात काही माणसं येतात आणि विचारतात, “प्रमोद दीक्षित आहेत का?” इतर कार्यकर्त्यांबरोबर कार्यमग्न असणारी ती व्यक्ती अस्खलित आसामी भाषेत म्हणते, “हो, मीच प्रमोद दीक्षित.” आणि निमिषाचाही अवधी न जाता रिव्हॉल्वर रिकामं होईपर्यंत गोळ्या मारल्या जातात आणि पुढच्या क्षणाला एक निष्काम कर्मयोगी धारातीर्थी पडतो. तसं तर त्याला धारातीर्थी पडणंही कोणी म्हणत नाही आणि त्याचं निष्काम कर्मही असं की ते कधीच समोर येत नाही.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, असं म्हणायचीही गरज नव्हती. त्या काळात कोणाला तरी दूरदृष्टीने वाटलं, स्वातंत्र्य मिळतंय पण ते अबाधित राहण्यासाठी मतभेद, कलह आणि विविधता विसरून एकत्र येणं आणि राहणं आवश्यक ठरेल. स्वातंत्र्यानंतर एका प्रबळ आणि पुनरुत्थानशील राष्ट्रनिर्माणासाठी ही सर्वात महत्त्वाची गरज. हे केवळ वाटलंच नाही, तर त्यासाठी हळूहळू निर्माण होत गेलं एक मोठं संघटन! एकमेकांना जोडत गेले निष्ठेने आपलं आयुष्य अर्पून द्यायला तयार शेकडो कार्यकर्ते. पण कार्यकर्ता हा शब्द आपपर भाव जपतो.

समाजाच्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने काम करणारा तो स्वयंसेवक आणि असे स्वयंसेवक ज्या संघटनेमध्ये निर्माण होतात आणि देशाप्रती आणि एकमेकांसाठी सात्त्विक प्रेमाने जोडलेले राहतात ती संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांच्या पेटवलेल्या मशाली फक्त १५ ऑगस्टपुरत्या मर्यादित नाहीत. धगही तितकीच, मात्र त्याला दिवसमाहात्म्य नाही! आपण सामान्य लोक एक दिवस राष्ट्रोत्सव साजरा करतो आणि ह्या १६ ऑगस्टला दुय्यम समजतो.

तर प्रमोद दीक्षित! ५ जून १९४९ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जन्म! पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. झाले. आणीबाणीमध्ये शशिकांत पंडित हे नाव घेऊन भूमिगत राहिले. कोकण, मराठवाडा इथल्या कामानंतर १९७८ साली संघ प्रचारक म्हणजे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून आसाममध्ये नियुक्त झाले. आपल्या घरापासून दूर, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. सगळ्या सुखांकडे पाठ फिरवून शेकडो मैल दूर आसाममधल्या नलबाडी येथे एका शाळेत मुलांना शिकवण्याचं काम सुरू केले.

१९८३ मध्ये गुवाहाटी महानगर प्रचारक म्हणून जबाबदारी आली. त्यादरम्यान व्यावसायिक रक्तदात्यांनी त्यांचा दर वाढविण्याची मागणी करून संप पुकारला. सर्वच दवाखाने, हॉस्पिटल्समध्ये रक्ताची चणचण भासू लागली. वैद्यकीय महाविद्यालयांमधली ऑपरेशन्स बंद झाली. काही विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करणे सुरू केले. स्वतः प्रमोदजींनी पण रक्तदान केले. मात्र हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही, ह्या उद्देशाने प्रमोदजींनी स्वयंसेवकांची बैठक घेऊन एक अतिशय विस्तृत अशी रक्तगट सूची बनविली. या कामात डॉक्टर्सना जोडून घेऊन रक्तगट चाचणी शिबिरेही आयोजित केली. बरोबरीने या कामात सामान्य लोकांनाही सामावून घेऊन ती यादी अजून विस्तृत केली. वैद्यकीय महाविद्यालयामधून रक्ताची मागणी आली की, अशा रक्त यादीतील व्यक्तीला सूचित करून ती पूर्ण केली जाऊ लागली. या कामाला पुढे व्यापक स्वरूप आल्यानंतर ‘डॉ. हेगडेवार स्मारक रक्तानिधी’ ही नोंदणीकृत संस्था निर्माण केली. पूर्ण आसाममध्ये या संस्थेचं काम सुरू झालं. जवळपास कधीही, कुठेही रक्ताची गरज पडली, तर पहिला फोन हा संघ कार्यालयात यायचा, असं त्यांचे सहकारी सांगतात. स्वतः प्रमोदजींनी सलग ८ वर्षे दर तीन महिन्यांनी असं २५ हून अधिक वेळा रक्तदान केलं. त्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कारही दिला गेला होता. एकूणच समाजाच्या वेळोवेळी लागणाऱ्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने हे काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्याची व्याप्ती वाढली.

व्याप्ती! ही गोष्ट साधी नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रमोदजींच्या या कामाची व्याप्ती (किंबहुना संघाची व्याप्तीसुद्धा) कशी वाढली असेल याचं मला कुतूहल वाटतं. त्याचं उत्तरही खरंतर संघाच्या मूळ उद्देशातच असावं. ते म्हणजे माणसं जोडणं! प्रमोदजींचे तेव्हाचे सहकारी सांगतात, ‘अतिशय लाघवी माणूस! माणसे जोडण्यात हातखंडा. अगदी रेल्वे, दुकानातसुद्धा लोकांशी गप्पा मारून घनिष्टता वाढवत असत. नलबाडीला असताना एका कम्युनिस्ट नेत्याची ओळख झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या घराचं जेवणाचं निमंत्रणही स्वीकारलं. गुवाहाटीला वैद्यकीय महाविद्यालयात रोग्यांशी गप्पा मारणे, त्यांची विचारपूस करणे हा त्यांचा नित्यक्रम.

बरपेटा येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती होती, पण दुर्दैवाने ती शेवटची ठरली. ४२व्या वर्षी बरपेट्याच्या ‘केशवधाम’ संघ कार्यालयात उल्फा अतिरेक्यांकडून मृत्यू! उल्फा – युनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) हे एक नाव. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अशा कितीतरी उग्रवादी आणि आतंकवादी संघटना देशाला आव्हान देत उदयास आल्या. स्वातंत्र्यानंतर अशा फुटीरतावादी संघटनांपासून असो वा अंतर्गत कलहापासून देशाचं रक्षण करणं हे सध्याचं आव्हान! ते कदाचित सीमेवरच्या जवनांसारखं, पोलिसांसारखं प्रत्यक्ष नसेल. पण राष्ट्रबांधणीचं काम! घरदार सोडून कुठेही दूरवर पूर्णवेळ समर्पित भावनेने संघ नेमून देईल ते काम प्रमोदजींसारखे अनेक प्रचारक करत आहेत. स्वातंत्र्यासाठी जे लढले ते तर अजरामर झालेच, जे सीमेवर लढत आहेत. त्यांच्याप्रति आपण मनात कृतज्ञतेचे भाव ठेवून आहोतच. पण असेही काही लढताहेत. वस्तुतः शाळेत शिकवणं, रक्तदानासाठी कार्य करणं, ही काही कोणती लढाई नाही. पण एखाद्या फुटीरतावादी संघटनेला का बरं असा शाळेत शिकवणारा, समाजातील उणिवा भरून काढणारा प्रचारक शत्रू वाटावा?! ज्याने आसाममधील बांधवांसाठीच रक्तदानासारखा महान यज्ञ चालविला, त्याचे रक्त शेवटी त्याच भूमीत सांडून वाया का जावं?! का त्याची हत्या व्हावी?!

याचं अगदी सध्या तर्काने उत्तर सामान्य माणसालाही मिळू शकतं. संघाचं समन्वयाचं, देशांतील विविधतेला एका धारेत आणण्याचं, राष्ट्रभक्तीचं, एकमेकांविषयी सात्त्विक प्रेमच शिकवणारं काम, हे राष्ट्रविघातक शक्तींसाठी निश्चितच विरुद्ध विचारांचं आणि देशाला तोडण्याच्या त्यांच्या कामात विघ्न आणणारं आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन हे काम संपुष्टात आणण्यासाठी आजपर्यंत अशा शेकडो प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. मग त्या आसाममधील असोत किंवा केरळमधील. जून २००५ मध्ये गुवाहाटी विभाग कार्यवाह शुक्लेश्वर मेढी यांची नलबाडी येथेच अशीच रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसाढवळ्या हत्या केली गेली. मुरली मनोहर, ओमप्रकाश चतुर्वेदी, प्रफुल्ला गोगोई, पन्नाल ओस्वाल, जयंत दत्ता, बिरेन पुखन, प्रसंथ गोगोई, मधू मंगल शर्मा हे फक्त आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांकडून हुतात्मा झालेले काही संघ स्वयंसेवक. याबरोबरच पूर्वांचलातील इतर राज्ये, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर येथील यादीही मोठी आहे.

देशाचे तुकडे आता केवळ युद्ध लढून होणार नाहीत आणि ते होण्यापासून वाचविणे हेही केवळ युद्ध लढून होणार नाही. फक्त आसामचाच विचार केला, तर उल्फाव्यतिरिक्त NDFB (The National Democratic Front of Bodoland), KLNLF (The Karbi Longri N.C. Hills Liberation Front), UPDS (The United People’s Democratic Solidarity), DHD (The Dima Halam Daoga), KLO (Kamtapur Liberation Organisation) अशा संघटना फुटीरतेचा झेंडा घेऊन उभ्या आहेत. बांगलादेश आणि भूतानच्या सीमांमुळे आसाम विषय नाजूक आहे.

तो ऑगस्ट १९९१ होता. आमचं दहावीचं वर्ष नुकतंच सुरू झालं होतं. तेव्हा प्रमोदजींची पुतणी असलेली माझी एक मैत्रीण म्हणाली, “काकांची हत्या झाली.” फार विचार करण्याइतक्या जाणिवा नव्हत्या तेव्हा. आज इतकी वर्षं झाली तेव्हा त्याचं महत्त्व लक्षात आलं. प्रमोदजींचे मारेकरी ना पकडले गेले, ना शिक्षा! तेव्हाच्या आसाम गणपरिषदेच्या सरकारची अनास्था, उल्फा उग्रवाद्यांबद्दल सहानुभूती अशी अनेक कारणे. पण ना सरकारला कोणी जबाबदार धरले, ना मीडियाने त्याविषयी आवाज उठवला, ना सर्वसामान्यांपर्यंत ही बातमी पोहोचली, ना मेणबत्त्या हातात घेऊन कोणी निषेध केला! दिवंगत प्रमोद दीक्षितांच्या अस्थी आसाममधील तत्कालीन ज्येष्ठ प्रचारक (स्व.) मधुकरजी लिमये पुण्याला घेऊन आले. प्रमोदजींचे सहकारी प्रचारक त्यांच्या कुटुंबाला प्रमोदजी तेथे असताना सुरू झालेले ‘शंकरदेव शिशू निकेतन’ व्यवस्थित चालू असल्याचे पत्राद्वारे कळवितात. बरपेटा येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजून एक रक्तदान केंद्र सुरू केले गेले. त्यांच्या कार्याचा दीप तेवत ठेवण्यासाठी आणि त्यांची स्मृती जपण्यासाठी स्वयंसेवकांकडून त्यांना वाहिलेली ही सर्वोत्तम आदरांजली!

नाटेठोम

डॉ. विजया वाड

“बाबा, तू घरीच?” तेजूनं आश्चर्यानं विचारलं.
“जवळजवळ चोवीस तास!”
“काय सांगतोस?”
“मी अख्खा दिवस लॅपटॉप नि आयपॅडवरून चॅनल चालवणार आहे तेजू.”
“काय सांगतोस?”
“माझा एंटरटेन्मेंट चॅनल असल्यानं ते शक्य आहे.”
“जुने प्रोग्रॅम्स रन करणार?”
“हो. भरपूर स्टॉक आहे.”
“वाऊ.” तेजूने आनंदाने उडीच मारली.
“मालूमावशी कुठाय रे?”
“ती गावी गेली. राष्ट्रव्यापी कर्फ्यू लागणार आजपासून म्हणून रात्रीच मी तिला वसईला तिच्या मुलाबाळात पोहोचवून आलो. आज काही गाडी बाहेर काढता यायची नाही.”
“ओह! हाऊ स्वीट! बाबा, यू आर सोss स्वीट!”
तेजू बाबांच्या गळ्यात पडली नि तिनं त्याच्या गालाचा
मुका घेतला.
“स्वीट काय त्याच्यात?”
“नोकर-चाकराचा इतका विचार करतोस!”
“आपली ड्युटीच आहे ती तेजू. किती पैसा मिळवला हे नाही गं महत्त्वाचं. किती माणूसपण जपलं हे महत्त्वाचंय.”
“यू आर राईट बाबा. आय विल फॉलो धिस फिलॉसॉफी.”
“खूप छान.”
तेजू बाथरूमपाशी गेली, तर आई सुन्नात होऊन बाहेर येत होती. केसांना टॉवेल बांधला होता. पण इतकी लालुस आणि तरतरीत दिसत होती की तेजू जामच खूश झाली.
“तू भी घरमें?”
“मग? चित्रीकरणाला सुट्टी आहे.”
“काय सांगतेस?”
“खरं सांगत्येय, सुट्टी आहे चित्रीकरणाला.”
“मग मालिकेचं काय होणार?”
“कोरोनाचं संकट टळलं की पुन्हा चालू होईल चित्रीकरण. तेजू नथिंग टू वरी.”
तेजूला आठवलं.
सकाळी नऊ ते रात्री नऊ आईची चित्रीकरणाची वेळ असे. फिल्मसिटीत असलं की तिला अर्धा तास आधी निघावं लागे. पण नालासोपारा गाठायचं असलं की, दीड तास एका प्रवासाला लागे. म्हणजे नऊची शिफ्ट आली, तर साडेसातला घराबाहेर पडावे नि रात्री साडेदहाला घराकडे परतावे इतके टाइट शेड्यूल असे.
आली की इतकी थके, इतकी थके की तिच्यात बोलायचीही ताकद नसे. शिवाय सारे अंतर, जवळ असो की लांब… स्वत: ड्राइव्ह करी. ड्रायव्हिंग वॉज अॅण्ड इज हर पॅशन.
“माझा एपिसोड बघितलास?” ती आल्यावर
तेजूला विचारी.
“म्हंजे काय अय्युडा!”
“कसा झाला?”
“यू वेअर द बेस्ट.”
“खरंच?”
“तुझी शपथ!”
असं बोलणं चाले. तेजूची आई स्क्रीनवर इतकी सुंदर दिसे की सारं पब्लिक तिच्यावर प्रेम करी.
“यवढी मोठी पंधरा वर्षांची मुलगीय त्यांना असं वाटतं का तरी? आणि एमेस्सी गोल्ड मेडलिस्ट आहेत. किती हुश्शार! पण किती डाऊन टू अर्थ!”
आपल्या आईबद्दल इतके चांगले उद्गार कोणाला आवडणार नाहीत? तेजूचे कानही तेजतर्रार होत. चेहेराभर आनंद पसरे.
आपल्या आई-वडिलांचा तिला भारी अभिमान वाटे.
शाळेत ती कधी याबद्दल बोलली नाही, तरी साऱ्यांनाच तिच्या आई-बाबांच्या लोकप्रियतेची कल्पना होती.
पण फार एकटे वाटे. हा केवळ तिचा अनुभव होता. दहा ते पाच जॉब करणाऱ्यांच्या आई नि बाबांचे काही तास तरी मुलांच्या वाट्याला येतात ना!
तेजू मात्र टीव्ही पाहत वेळ घालवी. ट्यूशन टीचरसोबतच गृहपाठ पूर्ण करी आणि मालूमावशीला काही तरी छान कर, नवे कर असा लकडा लावी.
“आई, किती दिवस कोरोनाचं संकट आहे गं?” तिनं आईला विचारलं.
“आता फाइट करतोय ना आपण?”
“पण अॅण्टीडोटला इतका वेळ का लागतोय?”
“तेजू बेटा, अॅण्टीडोट शोधणं, विकसित करणं, त्यानंतर तो प्राणिमात्रांवर ट्राय करणं, त्याचा यश-अपयशाचा आलेख निरसणं या सोप्या गोष्टी आहेत का बेटा? पण आय अॅम शुअर, भारतीय शास्त्रज्ञ या सर्व चाचण्या यशस्वीरीतीने पार पाडतील.”
“खरंय आई. मला तर वाटतं, कोणत्याही बुद्धिमान माणसाला भारताबाहेर जाऊ देऊ नये. इतर देशांचा विकास आम्ही करण्यापेक्षा आमच्या देशाचा विकासच आम्ही करू ना!”
“युवर थॉट इज व्हेरी गुड. तू तो नक्की अमलात आण. इतर देशात प्रगत शिक्षण अवश्य घे, पण त्याचा उपयोग स्वदेशासाठी कर. आय अॅम सो प्राऊड ऑफ यू तेजू.”
आईने मायेने जवळ घेतले लेकीला. आंजारले, गोंजारले. त्या स्पर्शातली माया तेजूला इतकी हवी हवीशी वाटली की, ती कोरोनाचे दु:ख विसरली.
“असा असावा काळही सुंदर
असे असावे भरलेले घर!
आई-बाबा तेजू यांचा,
मेळ असावा असाच सुंदर…!” तिला वाटले.
फक्त हे होण्या “कोरोना” कारणीभूत नसावा, असे मात्र तेजूला खूप मनापासून वाटत राहिले. तेवढ्यात तेजूचा बाबा आला.
“बाबा, ये ना, गप्पा ठोकायला.”
“हाजिर हूँ मॅडम ! पण माझ्या मनात आलं तू, मी नि आई… तिघं मिळून पत्ते खेळूया.”
“काय खेळूया डिअर बाबा?”
“पाच तीन दोन?”
“नको. अरे तू नि आई दोघं सदा कामात असता, तर घर ओकेबोके असते. “नॉट अॅट होम” हीच स्थिती सदा असते.
“काय करणार तेजू?”
“म्हणून तर सांगते, आज तिघं नाटेठोम खेळूया.”
“येस्स्स!” आई-बाबा रंगले. दार घट्ट बंद! नि पत्त्यांचा डाव रंगला… नॉट अॅट होम! अेटले? नोट ठोम!

सत्ता आणि मालमत्ताही देवाचीच…

अनुराधा परब

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतवर्षामध्ये आजही विविध प्रांतांमध्ये राजवंश अस्तित्वात आहेत.  खरंतर ते रूढार्थाने कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचे सत्ताधीश नाहीत.  समाज आणि लोकमानसामध्ये त्या राजवंशातील आजच्या पिढ्यांविषयी पूर्वीइतकाच सन्मान, आदरभावना आहे.  स्थानिक पातळीवर होणाऱ्या वेगवेगळ्या उत्सव, समारंभांमध्ये यांना मानाचे स्थानही आहे. ‘तरीही उरे काही उणे’ अशी भावना कायम असल्याचे असे हे सोहळे पाहताना वाटू शकते. त्याचे कारण राजेशाही सोहळ्यांची सर त्याला येत नाही म्हणून. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र या सगळ्याला अपवाद ठरतो. सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे लखम सावंतांचा राजवंश आणि इनामदार देवस्थानांचा रुबाब आजही श्रीमंती थाटाचा आहे.  दक्षिण कोकणात देवालाच गावं इनाम मिळालेली असल्यामुळे इथे सत्ता देवाची चालते. पर्यायाने या देवस्थानांमधील दैनंदिन कार्यक्रमातील षोडशोपचार पूजाअर्चा,  विधी ते वर्षातील विविध उत्सवांचे स्वरूप हे राजवर्खीच असते.

सिंधुदुर्गामध्ये साळशी,  किंजवडे, कोटकामते, आचरा अशी काही इनामदार देवस्थाने आहेत आणि त्यांचा कारभार हा देवाच्या संमतीनेच चालतो. इथल्या प्रथा – परंपरा, उत्सव यावर संस्थानिक दर्जाचा ठसा आहे. साधारणपणे समूहाच्या, देवस्थानाच्या वहिवाटीसाठी तर कधी देखभाल खर्चासाठी इथपासून ते शौर्य गाजवलेल्या किंवा बुद्धिचातुर्य दाखवलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी राज्यकर्त्यांनी दिलेले उत्पन्नाचे नेमस्त साधन म्हणजे इनाम किंवा वतन. या इनामामध्ये चाकरी, अधिकार, हक्क, नेमणूक यांच्या जोडीने आखून दिलेली कर्तव्ये करणे अपेक्षित असते. उत्पन्नाच्या शाश्वतीची ही हमी वंशपरंपरागत कायम राहण्यासंबंधीचा दस्तऐवज कधी ताम्रपत्र, शिलालेख, सनद इत्यादी माध्यमांतून सोपविलेला असतो. काही ठिकाणी ग्रामसंस्थांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्यकर्त्यांनी वतने लिहून दिल्याच्या नोंदी सापडतात. इनाम म्हणून अलंकार, जडजवाहिरे, मुद्रा दिल्याच्या गोष्टी इतिहासाच्या पानोपानी सापडतील. मात्र अशा प्रकारे गावं इनाम देण्याची पद्धत काही अभ्यासकांच्या मते इसवी सनाच्या सुरुवातीपासून असावी.  चालुक्य  –  राष्ट्रकुटांच्या काळापासून गावातील शासनव्यवस्थेसाठी काही कुळांकडे अधिकार देण्याची प्रथा रूढ झाली असावी. कायदेशीररीत्या जमीन इनाम देऊन ग्रामव्यवस्थेचा गाडा दक्षतेने चालविण्यासाठीची ही सोय होती.  यादव काळामध्ये तर याला प्रस्थापित रूप आले. मध्ययुगात राजसत्ता बदलल्या तरी ग्रामसंस्कृतीमध्ये इनाम मिळालेल्या गावांच्या स्थानिक नैमित्तिक कामात, लोकव्यवहारामध्ये फारसा बदल घडला नाही. मराठेशाहीमध्ये वेतनव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. महसूल वसुलीकरिता त्यांनी विविध पदांची निर्मिती केली.  स्वराज्यनिष्ठांना अभय आणि शत्रूंशी हितसंबंध ठेवणाऱ्या वतनदारांकडील वतनांवर कठोर निर्बंध घातले गेले.

सतराव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी कुडाळच्या लखम सावंताच्या विनंतीवरून तहाच्या द्वारे (सन १६६३) कोकणप्रांत ताब्यात घेतल्याची नोंद सापडते.  शिवराज्य स्थापल्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी केलेल्या आरमाराच्या कारवायांच्या माध्यमातून या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता आली. उपलब्ध कागदपत्रांनुसार, सिद्धेश्वर व पावणाई ही साळशीची कुलदैवते आहेत. सोळाव्या शतकापर्यंत साळशी हे लहानसे गाव होते. स्थानिक धुरी हे तेथील वतनदार होते.  सतराव्या शतकात कोल्हापूरच्या शंभू महाराजांनी हे गाव कुलदेवता असलेल्या पावणाईला सनद देऊन इनाम दिले. त्यानंतर अमात्यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी बहाल केल्यानंतर हा भाग अमात्यांच्या आधिपत्याखाली आला. भगवंतराव अमात्यांनीही साळशीच्या सिद्धेश्वर आणि पावणाईला सनद दिली. देवस्थानांना, देवाला दिलेल्या संस्थानांची इनामदारी ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतरही कायम राहिली.

आचरा हे गाव रामेश्वर आणि महत्त्वाचे व्यापारी बंदर अशा दोन कारणांमुळे पंचक्रोशीमध्ये विशेषत्वाने सुपरिचित आहे. कोल्हापूर संस्थानाधिपतींनी अर्थात दुसऱ्या शंभुराजांनी रामेश्वराची महती जाणून देवालाच आचरे गाव सन १७२० साली विशेष सनदेमार्फत, तर कालांतराने जवळचेच मजरे गाऊडवाडी गावही कायमस्वरूपी इनाम दिल्याची नोंद सापडते.  ही दोन्ही गावे कायदेशीररीत्या रामेश्वराला दिलेली इनामे आहेत. दानपत्रामध्ये मंदिराचा उल्लेख श्री देवस्थान महास्थान असा करण्यात आलेला आहे. हे इनाम उत्तरोत्तर चालत राहील, अशी नोंदही त्यात करण्यात आलेली आहे. या दानपत्रामध्ये (जे सध्या उपलब्ध नाही, मात्र ब्रिटिशांनी हेच दानपत्र सनदीच्या स्वरूपात नोंदवून ठेवल्याचे कागदपत्र संशोधनादरम्यान पाहण्यासाठी उपलब्ध झाले.) देवाला  इनामदार हा किताब देण्यात आला आहे. रामेश्वर अर्थात शिव हा देवच इथला सत्ताधीश असून त्यायोगे आचरा देवस्थानाला संस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपल्या शौर्याने कोकण प्रांती वचक ठेवलेला होता.कामते गावात आंग्रेंची सत्ता होती. या गावात असलेल्या किल्ल्यावरून गावाला कोटकामते नाव पडले. येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी भगवती दिलेल्या केलेल्या नवसपूर्तीनिमित्ताने शके सोळाशे सत्तेचाळीसमध्ये देवी भगवतीचे मंदिर बांधल्याचा शिलालेख मंदिरामध्ये आजही पाहायला मिळतो. या शिलालेखानुसार कामते गाव हा आंग्रे यांनी देवीला इनाम दिल्याचे लक्षात येते. गावात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजाचे काही अवशेष आज शिल्लक आहेत. प्रमुख कब्जेदार म्हणून इनाम संस्थानातील गावांतील देवस्थानांचा शिक्का गावातल्या तेथील जमिनीच्या सात बारावर असतो. किंजवडे गावातील स्थानेश्वराला कोल्हापूरच्या छत्रपती शंभू महाराजांनी संपूर्ण गाव वहिवाटीसाठी इनाम दिले आहे. तिथेही अशाच प्रकारे इनामदार संस्थान देवाच्या, स्थानिक जमीन आणि सत्ता ही स्थानेश्वराच्याच नावे आजही अस्तित्वात आहे. इनाम देण्यात आलेले देवच इथले सत्ताधिकारी असल्याने त्यांच्या मालमत्ता विक्रीचा अधिकार अन्य कुणालाही नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने इनाम गावांतील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारावर कायदेशीररीत्या आता निर्बंध आलेले आहेत.

संशोधक म्हणून लक्षात आलेला महत्त्वाचा भाग म्हणजे इनामदारी मिळून अस्तित्वात आलेली संस्थाने – गावे ही सागरी व्यापाराशी संबंधित आहेत. सागरी मार्गाने होणारा हा व्यापार पुढे घाटमार्गे जात असल्याने वरील सर्व इनाम गावे, त्यांचे महसूल तसेच स्थानिक देवतांचे महात्म्य यांचा परस्पर संबंध धर्म आणि अर्थ असा स्पष्टपणे दाखवता येतो. त्यामुळेच असे विधान करता येते की, ज्याप्रमाणे व्यापारी मार्गांवर लेणी निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे इनामदार संस्थानेही व्यापारी मार्गांवरच वसविण्यात आली; किंबहुना म्हणूनच व्यापारी मार्गावरीलही स्थळे महात्म्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक, राजकीय आणि व्यापारदृष्ट्या कायम महत्त्वाची राहिलेली आहेत.