Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनाही चिरा नाही पणती...!

नाही चिरा नाही पणती…!

विभावरी बिडवे

भारतीयांसाठी १९४७ नंतरचा कोणताही १६ ऑगस्टचा दिवस तसा दुय्यमच! कारण त्याचं दिवसमाहात्म्य काही नाही. पण तरी स्वातंत्र्याच्या आनंदात, देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, हुतात्म्यांच्या पावन स्मृतीत, तरीदेखील आशादायक आणि सकारात्मक विचाराने उजाडणारी ती सकाळ. ‘जरा याद करो कुर्बानी’ ऐकत ऐकत एखाद्या आपल्या स्वतःच्या कोशात रमलेल्या माणसालाही काही करायची उमेद येईल, अशी एखादी सकाळ. मग देशासाठी एखाद्या आयुष्य वाहून दिलेल्या व्यक्तीसाठी, तर हा दिवस किती सकारात्मक असेल? पण स्वातंत्र्यानंतर ४४ वर्षांनी स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी एका कार्यालयात काही माणसं येतात आणि विचारतात, “प्रमोद दीक्षित आहेत का?” इतर कार्यकर्त्यांबरोबर कार्यमग्न असणारी ती व्यक्ती अस्खलित आसामी भाषेत म्हणते, “हो, मीच प्रमोद दीक्षित.” आणि निमिषाचाही अवधी न जाता रिव्हॉल्वर रिकामं होईपर्यंत गोळ्या मारल्या जातात आणि पुढच्या क्षणाला एक निष्काम कर्मयोगी धारातीर्थी पडतो. तसं तर त्याला धारातीर्थी पडणंही कोणी म्हणत नाही आणि त्याचं निष्काम कर्मही असं की ते कधीच समोर येत नाही.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, असं म्हणायचीही गरज नव्हती. त्या काळात कोणाला तरी दूरदृष्टीने वाटलं, स्वातंत्र्य मिळतंय पण ते अबाधित राहण्यासाठी मतभेद, कलह आणि विविधता विसरून एकत्र येणं आणि राहणं आवश्यक ठरेल. स्वातंत्र्यानंतर एका प्रबळ आणि पुनरुत्थानशील राष्ट्रनिर्माणासाठी ही सर्वात महत्त्वाची गरज. हे केवळ वाटलंच नाही, तर त्यासाठी हळूहळू निर्माण होत गेलं एक मोठं संघटन! एकमेकांना जोडत गेले निष्ठेने आपलं आयुष्य अर्पून द्यायला तयार शेकडो कार्यकर्ते. पण कार्यकर्ता हा शब्द आपपर भाव जपतो.

समाजाच्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने काम करणारा तो स्वयंसेवक आणि असे स्वयंसेवक ज्या संघटनेमध्ये निर्माण होतात आणि देशाप्रती आणि एकमेकांसाठी सात्त्विक प्रेमाने जोडलेले राहतात ती संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांच्या पेटवलेल्या मशाली फक्त १५ ऑगस्टपुरत्या मर्यादित नाहीत. धगही तितकीच, मात्र त्याला दिवसमाहात्म्य नाही! आपण सामान्य लोक एक दिवस राष्ट्रोत्सव साजरा करतो आणि ह्या १६ ऑगस्टला दुय्यम समजतो.

तर प्रमोद दीक्षित! ५ जून १९४९ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जन्म! पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. झाले. आणीबाणीमध्ये शशिकांत पंडित हे नाव घेऊन भूमिगत राहिले. कोकण, मराठवाडा इथल्या कामानंतर १९७८ साली संघ प्रचारक म्हणजे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून आसाममध्ये नियुक्त झाले. आपल्या घरापासून दूर, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. सगळ्या सुखांकडे पाठ फिरवून शेकडो मैल दूर आसाममधल्या नलबाडी येथे एका शाळेत मुलांना शिकवण्याचं काम सुरू केले.

१९८३ मध्ये गुवाहाटी महानगर प्रचारक म्हणून जबाबदारी आली. त्यादरम्यान व्यावसायिक रक्तदात्यांनी त्यांचा दर वाढविण्याची मागणी करून संप पुकारला. सर्वच दवाखाने, हॉस्पिटल्समध्ये रक्ताची चणचण भासू लागली. वैद्यकीय महाविद्यालयांमधली ऑपरेशन्स बंद झाली. काही विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करणे सुरू केले. स्वतः प्रमोदजींनी पण रक्तदान केले. मात्र हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही, ह्या उद्देशाने प्रमोदजींनी स्वयंसेवकांची बैठक घेऊन एक अतिशय विस्तृत अशी रक्तगट सूची बनविली. या कामात डॉक्टर्सना जोडून घेऊन रक्तगट चाचणी शिबिरेही आयोजित केली. बरोबरीने या कामात सामान्य लोकांनाही सामावून घेऊन ती यादी अजून विस्तृत केली. वैद्यकीय महाविद्यालयामधून रक्ताची मागणी आली की, अशा रक्त यादीतील व्यक्तीला सूचित करून ती पूर्ण केली जाऊ लागली. या कामाला पुढे व्यापक स्वरूप आल्यानंतर ‘डॉ. हेगडेवार स्मारक रक्तानिधी’ ही नोंदणीकृत संस्था निर्माण केली. पूर्ण आसाममध्ये या संस्थेचं काम सुरू झालं. जवळपास कधीही, कुठेही रक्ताची गरज पडली, तर पहिला फोन हा संघ कार्यालयात यायचा, असं त्यांचे सहकारी सांगतात. स्वतः प्रमोदजींनी सलग ८ वर्षे दर तीन महिन्यांनी असं २५ हून अधिक वेळा रक्तदान केलं. त्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कारही दिला गेला होता. एकूणच समाजाच्या वेळोवेळी लागणाऱ्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने हे काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्याची व्याप्ती वाढली.

व्याप्ती! ही गोष्ट साधी नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रमोदजींच्या या कामाची व्याप्ती (किंबहुना संघाची व्याप्तीसुद्धा) कशी वाढली असेल याचं मला कुतूहल वाटतं. त्याचं उत्तरही खरंतर संघाच्या मूळ उद्देशातच असावं. ते म्हणजे माणसं जोडणं! प्रमोदजींचे तेव्हाचे सहकारी सांगतात, ‘अतिशय लाघवी माणूस! माणसे जोडण्यात हातखंडा. अगदी रेल्वे, दुकानातसुद्धा लोकांशी गप्पा मारून घनिष्टता वाढवत असत. नलबाडीला असताना एका कम्युनिस्ट नेत्याची ओळख झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या घराचं जेवणाचं निमंत्रणही स्वीकारलं. गुवाहाटीला वैद्यकीय महाविद्यालयात रोग्यांशी गप्पा मारणे, त्यांची विचारपूस करणे हा त्यांचा नित्यक्रम.

बरपेटा येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती होती, पण दुर्दैवाने ती शेवटची ठरली. ४२व्या वर्षी बरपेट्याच्या ‘केशवधाम’ संघ कार्यालयात उल्फा अतिरेक्यांकडून मृत्यू! उल्फा – युनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) हे एक नाव. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अशा कितीतरी उग्रवादी आणि आतंकवादी संघटना देशाला आव्हान देत उदयास आल्या. स्वातंत्र्यानंतर अशा फुटीरतावादी संघटनांपासून असो वा अंतर्गत कलहापासून देशाचं रक्षण करणं हे सध्याचं आव्हान! ते कदाचित सीमेवरच्या जवनांसारखं, पोलिसांसारखं प्रत्यक्ष नसेल. पण राष्ट्रबांधणीचं काम! घरदार सोडून कुठेही दूरवर पूर्णवेळ समर्पित भावनेने संघ नेमून देईल ते काम प्रमोदजींसारखे अनेक प्रचारक करत आहेत. स्वातंत्र्यासाठी जे लढले ते तर अजरामर झालेच, जे सीमेवर लढत आहेत. त्यांच्याप्रति आपण मनात कृतज्ञतेचे भाव ठेवून आहोतच. पण असेही काही लढताहेत. वस्तुतः शाळेत शिकवणं, रक्तदानासाठी कार्य करणं, ही काही कोणती लढाई नाही. पण एखाद्या फुटीरतावादी संघटनेला का बरं असा शाळेत शिकवणारा, समाजातील उणिवा भरून काढणारा प्रचारक शत्रू वाटावा?! ज्याने आसाममधील बांधवांसाठीच रक्तदानासारखा महान यज्ञ चालविला, त्याचे रक्त शेवटी त्याच भूमीत सांडून वाया का जावं?! का त्याची हत्या व्हावी?!

याचं अगदी सध्या तर्काने उत्तर सामान्य माणसालाही मिळू शकतं. संघाचं समन्वयाचं, देशांतील विविधतेला एका धारेत आणण्याचं, राष्ट्रभक्तीचं, एकमेकांविषयी सात्त्विक प्रेमच शिकवणारं काम, हे राष्ट्रविघातक शक्तींसाठी निश्चितच विरुद्ध विचारांचं आणि देशाला तोडण्याच्या त्यांच्या कामात विघ्न आणणारं आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन हे काम संपुष्टात आणण्यासाठी आजपर्यंत अशा शेकडो प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. मग त्या आसाममधील असोत किंवा केरळमधील. जून २००५ मध्ये गुवाहाटी विभाग कार्यवाह शुक्लेश्वर मेढी यांची नलबाडी येथेच अशीच रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसाढवळ्या हत्या केली गेली. मुरली मनोहर, ओमप्रकाश चतुर्वेदी, प्रफुल्ला गोगोई, पन्नाल ओस्वाल, जयंत दत्ता, बिरेन पुखन, प्रसंथ गोगोई, मधू मंगल शर्मा हे फक्त आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांकडून हुतात्मा झालेले काही संघ स्वयंसेवक. याबरोबरच पूर्वांचलातील इतर राज्ये, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर येथील यादीही मोठी आहे.

देशाचे तुकडे आता केवळ युद्ध लढून होणार नाहीत आणि ते होण्यापासून वाचविणे हेही केवळ युद्ध लढून होणार नाही. फक्त आसामचाच विचार केला, तर उल्फाव्यतिरिक्त NDFB (The National Democratic Front of Bodoland), KLNLF (The Karbi Longri N.C. Hills Liberation Front), UPDS (The United People’s Democratic Solidarity), DHD (The Dima Halam Daoga), KLO (Kamtapur Liberation Organisation) अशा संघटना फुटीरतेचा झेंडा घेऊन उभ्या आहेत. बांगलादेश आणि भूतानच्या सीमांमुळे आसाम विषय नाजूक आहे.

तो ऑगस्ट १९९१ होता. आमचं दहावीचं वर्ष नुकतंच सुरू झालं होतं. तेव्हा प्रमोदजींची पुतणी असलेली माझी एक मैत्रीण म्हणाली, “काकांची हत्या झाली.” फार विचार करण्याइतक्या जाणिवा नव्हत्या तेव्हा. आज इतकी वर्षं झाली तेव्हा त्याचं महत्त्व लक्षात आलं. प्रमोदजींचे मारेकरी ना पकडले गेले, ना शिक्षा! तेव्हाच्या आसाम गणपरिषदेच्या सरकारची अनास्था, उल्फा उग्रवाद्यांबद्दल सहानुभूती अशी अनेक कारणे. पण ना सरकारला कोणी जबाबदार धरले, ना मीडियाने त्याविषयी आवाज उठवला, ना सर्वसामान्यांपर्यंत ही बातमी पोहोचली, ना मेणबत्त्या हातात घेऊन कोणी निषेध केला! दिवंगत प्रमोद दीक्षितांच्या अस्थी आसाममधील तत्कालीन ज्येष्ठ प्रचारक (स्व.) मधुकरजी लिमये पुण्याला घेऊन आले. प्रमोदजींचे सहकारी प्रचारक त्यांच्या कुटुंबाला प्रमोदजी तेथे असताना सुरू झालेले ‘शंकरदेव शिशू निकेतन’ व्यवस्थित चालू असल्याचे पत्राद्वारे कळवितात. बरपेटा येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजून एक रक्तदान केंद्र सुरू केले गेले. त्यांच्या कार्याचा दीप तेवत ठेवण्यासाठी आणि त्यांची स्मृती जपण्यासाठी स्वयंसेवकांकडून त्यांना वाहिलेली ही सर्वोत्तम आदरांजली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -