दैनंदिन राशीभविष्य…
पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त!
पालघर (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीत सापडलेल्या हत्याराने सर्व सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्यामुळे १२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला पालघर जिल्हासुद्धा सावध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे डहाणू येथे असलेल्या तटरक्षक दलाकडूनही सतर्कता बाळगण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पालघर जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीमध्ये हत्यारे सापडली होती. त्यामुळे समुद्र किनारपट्टी ठिकाणी कुठलाही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये याकरिता सावधानतेच्या सूचना पालघर पोलिसांकडून जिल्ह्यातील आठ सागरी पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. तर रायगड मधल्या या घटनेनंतर सर्व ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीत बंदोबस्त ठेवून (एसओपी) कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. सुमारे शंभर ते दीडशे पोलीस समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवून असल्याचेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता मच्छीमार सोसायटी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना समुद्रात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) कार्यान्वित करण्यात आल्या असून मच्छीमार वस्त्यांमध्ये असलेली लहान मोठे गट जे समुद्रावर देखरेख ठेवण्याची काम करतात त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर पडणारे मार्ग म्हणजे जेटी बंदर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी टॉवर्स आहेत. तिथे टेहळणी पथके लक्ष ठेवून आहेत. स्थानिक पातळीवर संपर्क साधण्यात येत असून तटरक्षक दलाशी ही संपर्क साधण्यात आला आहे, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले फोर्स वनच्या धरतीवर जलद प्रतिक्रिया पथक तयार असून काही प्रसंग घडल्यावर त्याला सडेतोड जवाब देण्यासाठी टीम तयार ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे उपलब्ध असून त्यांना अतिमहत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
अशा घटना राज्यात कुठेही घडल्यावर मच्छीमार सतर्कता बाळगतात व कुठेही संशयास्पद हालचाल दिसल्यावर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबतची खबर पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. – राजन मेहेर, चेअरमन सातपाटी मच्छीमार सोसायटी
मुंबई किनारे आणि आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही विशेष लक्ष दिले आहे. सागर रक्षक दलाचे जवान यांना सतर्क केले आहे. त्यांची नजर असणार आहे. कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती संशयास्पद वाटली तर ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मीरा-भायंदर पोलीस मुख्यालय.
नाशिकमध्ये गणेशोत्सव मंडळांना आता ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार
नाशिक (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना आता ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी स्पष्ट भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याने यावर्षी गणेशोत्सवावरील जाहिरातींवर महापालिका कर आकारणीदेखील करणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी बरोबरच कराचा भरणा देखील करावा लागणार आहे.
कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्य संचारले आहे. गणेश मंडळांना मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, नाशिक महापालिकेने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर मनपाकडून कर आकारणी केली जाणार आहे.
२०२१ आणि त्यामागील वर्ष अशा दोन वर्षांत सर्वच सण, उत्सवांवर कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी मर्यादित स्वरूपात आणि नियमांचे पालन करूनच उत्सव साजरे करावे लागले. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यंदा गणेशाचे आगमन ३१ ऑगस्टला घरोघरी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेली शासनमान्य सुधारित नियमावली अमलात आणण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुषंगाने गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
गणेश मंडळांना मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार असून मंडप, आरास, देखावा उभारण्यासाठी महापालिकेसह पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या मंडपाला परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर रेल्वेस्थानक, बसस्थानक, ऑटो रिक्षा स्टॅण्ड, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी मंडप टाकता येणार नाही. उत्सवासाठी कमान उभारताना निकष ठरवून देण्यात आले असून, मंडळांना आता दोनच कमानी उभारता येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तयारी करावी लागणार आहे.
राज्यातील मच्छीमार बांधवांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत : रमेश पाटील
कल्याण (वार्ताहर) : महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी एन.एफ.डी.बी.च्या बैठकीत आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय मात्सिकी विकास मंडळ, नवी दिल्ली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा एन.एफ.डी.बी.चे अध्यक्ष व केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला तसेच केंद्रीय मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बलियान व डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नवी दिल्ली येथे संपन्न झाली.
केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या राष्ट्रीय मात्सिकी विकास मंडळाच्या बैठकीसाठी विविध राज्यातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये देशभरातील मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्यावतीने एन.एफ.डी.बी.चे गव्हर्नर कौन्सिल सदस्य व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी महाराष्ट्रातील तसेच कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांवर केंद्रीय मंत्री महोदयांचे व सर्व सदस्यांचे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत अत्याधुनिक फिश केज कल्चर करण्याकरिता शासनाने किनारपट्टीवर भाडेतत्त्वाने जागा उपलब्ध करून द्यावी, किनारपट्टीवरील प्रत्येक गावात सुकी मच्छी सुकवण्यासाठी मच्छीमार बांधवांना ओठे बांधून द्यावे व त्यामध्ये केंद्र शासनाने ९० टक्के सबसिडी द्यावी, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व वारंवार येणाऱ्या नैसर्गिक चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या मच्छीमार बांधवांना प्रलंबित असलेला डिझेल परतावा लवकरात लवकर देण्यात यावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तसेच एल.ई.डी. द्वारे करण्यात येणारी मासेमारी बंद करावी, शेतकऱ्यांना नाबार्डद्वारे आर्थिक साहाय्य केले जाते त्याचधर्तीवर मच्छीमार बांधवांना देखील आर्थिक सहाय्य करावे, दरवर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या फूड फेस्टिवल करिता केंद्र शासनाने व राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के मदत करावी, अशा विविध मागण्या आमदार रमेश पाटील यांनी यावेळी केल्या असून केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवल्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून ड्रोन, पॅराग्लायडरला बंदी!
पालघर (प्रतिनिधी) : तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकल्पाच्या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, हँडग्लायडर तसेच तत्सम हवाई साधनांचा वापर करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नूकताच हा आदेश जारी केला असून भंग केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तारापूर अणुशक्ती केंद्र हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने निश्चित केलेल्या कार्यप्रणालीनुसार, या भागामध्ये ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, पॅराग्लाइडर, पॅरामोटर्स, हँडग्लायडर्स यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे पालघरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी याबाबतचे आदेश जारी केले. १८ ऑगस्ट सकाळी १ वाजल्यापासून ते १५ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हे मनाई आदेश लागू आहेत. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने अणुऊर्जा प्रकल्पालगतचे ऑफलाइन झोन जाहीर असल्याने ड्रोन व इतर हवाई साधने वापरण्यास मनाईचा आदेश पारित करून घेण्याबाबत पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी कळवले होते.
सोलापूरच्या किरण नवगिरेची भारतीय संघात निवड
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी २० संघांची घोषणा करण्यात आली. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरेची भारतीय संघात निवड झाली आहे.
किरण नवगिरेने श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिक्षण घेतले. दरम्यान, विविध क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन यशाचा पाया रचण्यास सुरुवात केली. तिने भालाफेक, बेसबॉल, सॉफ्टबॉल अथेलिटिक्स इत्यादी खेळात पदके जिंकून महाविद्यालय व पुणे विद्यापिठाला अनेक पदके आणि पुरस्कार मिळवून दिले. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. तिने नागालँड आणि अरुणाचल प्रदेश संघाचेही प्रतिनिधित्व केले.
आपल्या खेळात सातत्य ठेवत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाचे दार ठोठावले. अखेर इंग्लंडविरुद्ध आगामी टी-२० मालिकेत तिची भारतीय महिला संघात निवड झाली. अनघा देशपांडेनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापूरची दुसरी खेळाडू आहे. किरणची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारताचा टी-२० संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, राधा यादव, शबिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, किरण नवगिरे.
इंग्लंड दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, शब्बिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यस्तिका भाटिया (विकेटकिपर), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, हरलीन देओल.
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिदुर्गम भागाची केली पाहणी
कुडूस (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटातील पाचघरसह अतिदुर्गम भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करून येथील ग्रामस्थांकडून रस्ते, पणी, शिक्षण व आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर मांडून भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पाचघर या गावाजवळ गर्भवती महिलेला स्थानिक परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जात असताना चिखलात रुतलेल्या जीपगाडीला धक्के मारून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते. सदरचा व्हीडीओ समाज माध्यमात प्रसिद्ध झाल्याने ही घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा करण्यात आला होता.
पाचघर गावांसह तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्ते, शिक्षण, पाणी व आरोग्यविषयक समस्यांची सोडवणूक प्राधान्य क्रमांकाने करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी यावेळी प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यादरम्यान आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची शासनस्तरावर गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून तातडीने समस्यांचे निवारण केले जाईल, असे यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पाहणी दरम्यान उपस्थीत ग्रामस्थांना सांगितले. या पाहणी दौऱ्यात पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील, जि.प. सदस्या रोहिणी शेलार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये; गिरीष महाजन
मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचे कर्ज दिले जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतला. खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल. असे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वसईतील पर्यटनस्थळे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित!
विरार (प्रतिनिधी) : मान्सून काळात वसईतील अभयारण्य, धबधबे, धरण व तलाव परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जीविताची काळजी घेण्याच्या अनुषंगाने येथील पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात पोलिसांनी पुन्हा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार वसई पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुरुची बाग, रानगाव बीच, ब्रह्म पाडा व भुईगाव बीच; तर वालीव पोलीस ठाणे अंतर्गत चिंचोटी धबधबा, देवकुंडी कामण व राजवली खदान परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ वसई कार्यक्षेत्रातील अभयारण्य, धबधबे, समुद्रकिनारे आणि तलावांवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पालघर, रायगड व ठाणे येथून अनेक पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठीच्या वाटा अरुंद असल्याने पर्यटकांच्या जीविताची व वित्तहानीची शक्यता असते. याशिवाय पर्यटनस्थळी टिंगळटवाळीसारख्या घटना घडत असतात. काही वेळा महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. मद्यपान पर्यटक करून पाण्यात उतरत असल्याने जीविताला धोका उदभवतो.
सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालवून वाहतुकीला पर्यायाने अन्य पर्यटकांची कोंडी केली जाते. पर्यटनाच्या नावाखाली वायू, ध्वनी, जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ वसई कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अभयारण्य, धबधबे, समुद्रकिनारे आणि तलाव परिसरात हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश २० ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत.
या आधी १४ ते २८ जुलै या कालावधीत माणिकपूर, तुळींज, वालीव व आचोळे पोलीस ठाण्याअंतर्गतही अशा प्रकारचे आदेश लागू करण्यात आले होते. दरम्यान; या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.
आरोपीच्या टोळीला मदत करणारा पोलीस निरीक्षक निलंबित
अहमदनगर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेत धर्मांतर करुन तिच्याशी निकाह करीत अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीसह त्याच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप मदत करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशीअंती संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या अहवालावर पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी ही कारवाई केली आहे.
तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह केला होता. तसेच तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आहे. आरोपींविरुद्ध इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असताना पोलिस निरीक्षक संजय सानप हे त्यांना मदत करत असल्याचा आरोप फिर्यादीकडून पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आला होता. चौकशीअंती पो.नि. सानप यांना निलंबित करण्यात आले आहे.