नाशिक (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना आता ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी स्पष्ट भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याने यावर्षी गणेशोत्सवावरील जाहिरातींवर महापालिका कर आकारणीदेखील करणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी बरोबरच कराचा भरणा देखील करावा लागणार आहे.
कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्य संचारले आहे. गणेश मंडळांना मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, नाशिक महापालिकेने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर मनपाकडून कर आकारणी केली जाणार आहे.
२०२१ आणि त्यामागील वर्ष अशा दोन वर्षांत सर्वच सण, उत्सवांवर कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी मर्यादित स्वरूपात आणि नियमांचे पालन करूनच उत्सव साजरे करावे लागले. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यंदा गणेशाचे आगमन ३१ ऑगस्टला घरोघरी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेली शासनमान्य सुधारित नियमावली अमलात आणण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुषंगाने गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
गणेश मंडळांना मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार असून मंडप, आरास, देखावा उभारण्यासाठी महापालिकेसह पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या मंडपाला परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर रेल्वेस्थानक, बसस्थानक, ऑटो रिक्षा स्टॅण्ड, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी मंडप टाकता येणार नाही. उत्सवासाठी कमान उभारताना निकष ठरवून देण्यात आले असून, मंडळांना आता दोनच कमानी उभारता येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तयारी करावी लागणार आहे.