कुडूस (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटातील पाचघरसह अतिदुर्गम भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करून येथील ग्रामस्थांकडून रस्ते, पणी, शिक्षण व आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर मांडून भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पाचघर या गावाजवळ गर्भवती महिलेला स्थानिक परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जात असताना चिखलात रुतलेल्या जीपगाडीला धक्के मारून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते. सदरचा व्हीडीओ समाज माध्यमात प्रसिद्ध झाल्याने ही घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा करण्यात आला होता.
पाचघर गावांसह तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्ते, शिक्षण, पाणी व आरोग्यविषयक समस्यांची सोडवणूक प्राधान्य क्रमांकाने करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी यावेळी प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यादरम्यान आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची शासनस्तरावर गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून तातडीने समस्यांचे निवारण केले जाईल, असे यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पाहणी दरम्यान उपस्थीत ग्रामस्थांना सांगितले. या पाहणी दौऱ्यात पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील, जि.प. सदस्या रोहिणी शेलार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.