अंबड लिंकरोड वरील भंगार गोदमाला भीषण आग, तीन तासानंतर आग आटोक्यात

नाशिक : नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील मीना ट्रेडर्स या भंगार गोदामाला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मात्र लाखोंचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरातील अंबड लिंकरोड आगीची घटना घडली. येथील ज्वलनशील पदार्थ साठवलेल्या गोडावुनला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हे गोदाम प्लास्टिकचे असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. तसेच धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. महापालिका अग्निशमन विभाग आणि एमआयडीसीच्या बंबांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.

अंबड लिंक रोडवरील शाबू मकबल अहमद खान यांनी आझाद नगर भागात भाड्याने गोडाऊन घेतले आहे. या ठिकाणी ज्वलनशील साहित्यासाठी गोडाऊन तयार केले होते. आज सकाळी या ठिकाणी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामध्ये गोडावूनमधील फोमसह इतर साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता अधिक असल्याने जवळपास तीन तासानंतर आग आटोक्यात आली.

दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच शहरातील सातपूर, अंबड, एमआयडीसी, मुख्यालयाचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी, संजय लोंढे आदीं अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे कारण अस्पष्ट असून एक महिन्यातच या गोदामाला दुसर्‍यांदा आग लागल्याने संबंधित घटनेची पोलिसांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी अग्निशमन विभागाकडून करण्यात येते आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

पोलिसांच्या माहितीनुसार, आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे. त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याच पानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय शिरच्छेद करणाऱ्याला २ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले आहे.

मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, ज्या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली आहे, त्याच्या प्रोफाइल पिक्चरवर पाकिस्तानचा झेंडा आहे. या संदर्भात फेसबुकला ईमेल पाठवून या पेजबाबत माहिती मागवण्यात आली आहे.

सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची गेल्या दोन वर्षांत ही ११वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या क्रमातील पहिली धमकी २४ एप्रिल २०२० रोजी देण्यात आली होती. तेव्हापासून धमक्यांची मालिका सुरूच आहे.

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली; दोन खलाशी बेपत्ता

रत्नागिरी : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवरील एकूण पाच जणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.

या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही.

‘तिकीट काढले म्हणजे रेल्वेची मालकी आपली नव्हे’; राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत वाढ

सोनिका पाटील

मुंबई : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये दिवसागणिक प्रवासी संख्या वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्या प्रवासी संख्येच्या दुप्पट बेशिस्तीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रेल्वे स्थानके, रेल्वेमध्ये स्वच्छता पाळा, थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका अशा सूचना, पोस्टर, डब्यांमध्ये लिहिण्यात आले असले तरी बेशिस्त प्रवाशांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

अलीकडेच रेल्वे डब्यांत सीटवर पाय ठेवत राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. आजूबाजूला कोणी बघत नसल्याने यातील काही महाशय चक्क आपले हातपाय पसरत सीटवर अंगच टाकून देताना पाहायला मिळतात. काही वेळा रात्रीच्या वेळी महिला डब्यांमध्ये झोपून जागा व्यापतात. दरम्यान, काही सुजाण प्रवाशांकडून या अशा बेशिस्त प्रवाशांना हटकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ‘रेल्वे तिकीट काढली आहे, बसेल नाही तर झोपेल’ अशी उर्मटपणे उत्तरे देण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रवासात खाल्लेल्या वस्तूंचा कचरा सीटखाली टाकणे, तंबाखू-गुटखा-माव्याचा बकाणा रेल्वेच्या दरवाजातून अथवा खिडकीतून थुंकणे, आपल्या चप्पल-बुटांसह सीटवर पाय ठेवून बसणे-झोपणे आणि मालवाहू नेण्यासाठी लगेज डब्बा असताना देखील सामान्य डब्यात प्रवासासाठी येतात, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. दरम्यान, या बेशिस्तीचा त्रास इतर प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे. आपले इच्छित स्थळ येईपर्यंत उर्वरित प्रवाशांना या दांडगाईबाबत ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. कारण हे बेशिस्त प्रवासी ज्या सीटवर चप्पल-बुटांसह पाय ठेवून बसत असतात, त्या जागेवर दुसरा कुणीतरी प्रवासी येऊन बसत असतो. तेव्हा त्याचे कपडे खराब होतात तर बऱ्याच वेळेला त्यांच्या आडमुठेपणामुळे इतर प्रवाशांना त्याजागी बसता येत नाही.

रेल्वेने प्रवास करताना आपली काही जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. सीटवर पाय ठेवू नये हे सांगण्याची गरज का पडावी? प्रशासनांकडून वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई करूनही काही दांडगट प्रवासी अरेरावीच्या बळावर बेशिस्तीचे वारंवार दर्शन घडत आहे, ही गंभीर बाब आहे. आमची अशा बेशिस्त प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम सुरू असून पुन्हा आम्ही आवाहन करतो की, रेल्वे प्रवासात, स्थानकावर थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या जादा बसेस

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. जवळपास दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. मुंबई व परिसरातील अनेक चाकरमाने गणेशोत्सवात गावी जातात. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने दरवर्षी प्रमाणे तयारी केली आहे. काही दिवसांवर असलेल्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून २३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

तर यंदा बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून १२६८ बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून ६६७, पालघर विभागातून ३१३ आणि ठाणे विभागातून २८८ बसेस असणार आहेत.

अतिवृष्टी, दरड कोसळणे किंवा अन्य काही घटना घडल्यास किंवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात १०० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्याचबरोबर, पावसामुळे खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान १० अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाय, घाटात सुरक्षितपणे वाहतूक चालवावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईसाठीच्या अधिक बस सोडण्यात येणार आहेत.

बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा चर्चेतून मार्ग निघू शकतो : निलेश राणे

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे बारसू गावात पोहोचले होते. मात्र, रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी निलेश राणे यांनी आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

माजी खासदार निलेश राणे ग्रामस्थांना म्हणाले, यावेळी मी आहे, आपण बसून बोलू. चर्चा करू, हा राज्य आणि केंद्र सरकारने प्रकल्प आणला आहे. हा निलेश राणेचा प्रकल्प नाही. सरकारशी बोलावे लागेल. आता अधिवेशने सुरु आहेत. सरकारशी बोलून मार्ग काढू अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली.

नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तिकडे विनाशकारी ठरते, मग आमच्या गावात ती चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलकांमधील महिलांनी केला. यावेळी नितेश राणे यांनी तुम्ही जागा ठरवा आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, ते सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, ते ठिकाण सांगणार आहेत, असे म्हटले.

खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले आहे. अनेकांनी सरकारच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळे आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानकं तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेले म्हणून आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबईतील मीटर रीडिंग एजन्सीजवर कारवाईचा बडगा

मुंबई (वार्ताहर) : मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मन:स्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेत महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी राबविलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून एप्रिल ते जून २०२२ या ३ महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल ३ (८२५ द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरु करीत राज्यातील ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलींगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज या एजन्सींजना देण्यात आली आहे. अचुक मीटर रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलासोबतच वीज वितरण हानीतही घट होत असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ थेट वीज ग्राहकांना होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’च्या संख्येत वाढ

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत ५२ ने वाढ झाल्याने रुग्णांची संख्या ४०२ झाली. स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, कोरोनासह स्वाइन फ्लूचा मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४०२ वर, तर मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

मनीष सिसोदियांसह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस, देशाबाहेर जाण्यास बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात ‘सीबीआय’ने रविवारी दिल्लीचे उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित उर्वरित आरोपींविरुद्धही ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून कोणीही देश सोडून जाऊ नये. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सिसोदियांसह अन्य १३ जणांविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाच्या चौकशीप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या सरकारी निवासस्थानी सीबीआयने धाड टाकली होती. जवळपास १४ तास चाललेल्या या कारवाईत सिसोदियांचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी काही महत्वाचे दस्तावेजही आपल्यासोबत नेले होते.