Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या जादा बसेस

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या जादा बसेस

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. जवळपास दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. मुंबई व परिसरातील अनेक चाकरमाने गणेशोत्सवात गावी जातात. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने दरवर्षी प्रमाणे तयारी केली आहे. काही दिवसांवर असलेल्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून २३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

तर यंदा बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून १२६८ बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून ६६७, पालघर विभागातून ३१३ आणि ठाणे विभागातून २८८ बसेस असणार आहेत.

अतिवृष्टी, दरड कोसळणे किंवा अन्य काही घटना घडल्यास किंवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात १०० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्याचबरोबर, पावसामुळे खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान १० अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाय, घाटात सुरक्षितपणे वाहतूक चालवावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईसाठीच्या अधिक बस सोडण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -