दारुविक्रेत्याला महिलांनी चोपले!

सातारा : बेकायदा दारू विक्री करणा-या दुकानदाराला महिलांनी कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याची घटना साता-यामधील चिलेवाडी येथे घडली. रौद्ररूप धारण केलेल्या गावातील महिलांनी या दारुच्या दुकानावर हातात दांडकी घेऊन हल्ला केला. यावेळी संतप्त महिलांनी दारुच्या बाटल्याही रस्त्यावर आणून फोडल्या.

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महिलांनी नंतर दुकानदाराला वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. मार खाताना मात्र दुकानदार मला मारु नका मी पुन्हा दारु विकणार नाही, असे वारंवार सांगत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

गावाच्या वेशीवर असलेल्या दुकानात बेकायदा दारु विक्री केली जाते आणि आमचे पती तिथे दारु पिण्यासाठी जातात आणि घरी येऊन तमाशा करतात, असे म्हणत गावातील महिलांनी या दारुच्या दुकानावर हातात दांडकी घेऊन हल्ला केला.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ईडी छापेमारीत पाच अधिकारी ताब्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी कामगार मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय तसेच त्यांच्याशी निगडीत संस्थांवर ईडीची छापेमारी सुरुच आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या छापेमारीत पाच अधिका-यांना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी (१ फेब्रुवारी) ईडीच्या पथकाने सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत असा १२ तासांहून अधिक काळ तिन्ही कार्यालयात ठाण मांडून चौकशी केली होती, या पथकात स्थानिक दोन बँक अधिकाऱ्यांसह एकूण आठ अधिकाऱ्यांच्या समावेश होता. रात्री १० नंतर एकूण २२ अधिकाऱ्यांनी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष मुश्रीफ तसेच उपाध्यक्ष राजू आवळे यांच्या दालनातील कागदपत्रांची तपासणी केली.

तर गुरुवारी सुद्धा ईडीची कारवाई सुरु राहिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले आहे. ईडीने तब्बल ३० तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समन्स बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत घेतल्याची माहिती आहे.

याआधी ११ जानेवारी रोजी केलेल्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाहूपुरी येथील मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी तसेच गहहिंग्लज तालुक्यातील हरळी जिल्हा बँकेच्या शाखेत, तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या ठिकाणी तब्बल ३० तास छापेमारी केली.

मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ई-मेलवर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचे नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचेही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. एनआयएने याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली असून देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरूवात केली आहे.

मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. मेल कोणी पाठवला? नेमका मेल कुठून आला आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. मुंबईसह देशातील इतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क मजबूत आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला १० मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.

दरम्यान, याआधी जानेवारी महिन्यात देखील मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत शहराच्या विविध भागात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. १९९३ प्रमाणे मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. दोन महिन्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे फोनवर म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा हा मेल आला आहे.

अमूल दूध तीन रुपयांनी महागले!

मुंबई : अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच ३ फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता अमूल ताजाचे अर्धा लिटर दूध २७ रुपयांना मिळणार आहे. तर १ लिटर पॅकेटसाठी ५४ रुपये मोजावे लागणार आहेत.

अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा लिटरचे पॅकेट आता ३३ रुपयांना मिळणार आहे. तर १ लिटरसाठी ६६ रुपये मोजावे लागतील.

अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर ५६ रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे दूध आता ७० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे.

अमूलने तीन महिन्यापूर्वीच ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ला गरज बूस्टर डोसची…

जगातील आर्थिक घडामोडींचे एक केंद्र आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे तसेच सदैव धावत असलेले शहर म्हणून मुंबई शहराला ख्याती मिळवून देण्यात ‘बेस्ट’ उपक्रमाचा सिंहाचा वाटा आहे, हे निश्चित. जगभरात मुंबईचे नावलौकिक वाढविण्यात, अबाधित ठेवण्यात आणि मुंबईचे आकर्षण वाटावे, अशी स्थिती निर्माण करण्यात येथील रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांबरोबरच ‘बेस्ट’च्या बस सेवांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी मुंबईकर चाकरमान्यांच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असलेली ‘बेस्ट’ मुंबईकरांसाठी खरोखरीच बेस्ट ‘फ्रेंड’ ठरली आहे. कारण कोरोना महामारीच्या काळात हीच ‘बेस्ट’, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली हे आपण सर्व जाणतोच, तर अशी ही ‘बेस्ट’ सेवा अधिक चांगली कशी होईल, याचा प्रयत्न शासकीय, प्रशासकीय पातळीवर आणि जनतेच्या पाठिंब्याने सदोदित केला जात असतो, तर अशा या ‘बेस्ट’चा कोणतीही भाडेवाढ नसलेला आणि तोट्यात असलेला साल २०२२-२३ सालासाठीच्या ‘बेस्ट’ अर्थसंकल्प अखेर मंजूर झाला आहे. दोन हजार एक कोटी रुपये तुटीच्या या अर्थसंकल्पाला मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली. हा तुटीचा अर्थसंकल्प चहल यांना गेल्या ३० नोव्हेंबर रोजी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सादर केला होता. सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पात २,२३६.४८ कोटींची तूट होती; परंतु यंदाच्या सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तूट कमी झाली असून बस मार्गांत व बस फेऱ्यांमध्ये केलेली वाढ. तसेच त्या अानुषंगाने महसुलात झालेल्या वाढीबराेबरच इतर प्रशासकीय खर्चात केलेली बचत यामुळे सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तूट कमी झाली असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आधुनिक असा ‘नया भारत’ निर्माण करायचा म्हणजे कालानुरूप बदल घडवून आणणे क्रमप्राप्त आहेच. त्यानुसार नव-नवे तंत्रज्ञान आपलेसे करून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अमलात आणली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस, पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईची हवा देशातील दिल्लीसारख्या अन्य प्रमुख शहरांपेक्षा खूपच दूषित झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मुंबईतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास शहरांतील वाढलेली वाहनसंख्या कारणीभूत ठरत आहे. जर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असेल, तर खासगी वाहने रस्त्यावर कमी आणली जातील. अनेकजण या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जाणीवपूर्वक वापर करतील. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनसंख्या कमी झाल्यास प्रदूषणही कमी होईल. ही बाब ध्यानी घेऊन ‘बेस्ट’ने नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय स्वीकारला आहे. या बसेसमुळे ध्वनी आणि हवा प्रदूषणाला फार मोठा आळ बसत आहे. या सर्व बसेस वातानुकूलित असल्याने प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवासाची सोय अगदी कमी दरात उपलब्ध झाली आहे. ही बाब अत्यत कौतुकास्पद म्हणावी लागेल. अशी सेवा पुरविताना बेस्ट अजूनही अनेक बसेस डिझेलवर सुरू असल्याने डिझेल, सीएनजीचे वाढते दर वाढले असल्यामुळे ‘बेस्ट’ उपक्रमाच्या परिवहन विभागाला तोटा सहन करावा लागत आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने, मुंबई महापालिकेने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासीसंख्या आणि उत्पन्न वाढीसाठी सुमारे ३ वर्षांपूर्वी नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार ५ किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे ५ रुपये निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार साध्या बससाठी पहिल्या ५ किमीला ५ रुपये, तर एसी बससाठी ६ रुपये किमान तिकीट दर निश्चित झाले. या प्रस्तावामुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. ‘बेस्ट’ उपक्रमावर अद्याप फार मोठे कर्ज आहे. कधी कधी ‘बेस्ट’कडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नसायचे. ही बाब ध्यानी घेऊन त्यावेळी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. बेस्टच्या वसाहतींची दुरवस्था हा एक मोठा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरीत आहे. अनेक वर्षांपासून इमारतींची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे इमारतींची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. अनेक खोल्यांच्या स्लॅबची पडझड झाली आहे. रंगरंगोटी करण्यासाठी पैसा नसल्याने घरांच्या भिंतीची दुर्दशा झाली आहे. छोटी घरे असल्याने कुटुंबाला ती अपुरी पडत आहेत. घरांच्या किमती भरमसाट वाढल्याने घर घेणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.

काही कामगारांनी घरे घेतल्याने त्याचा हप्ता देणे आता अवघड होत असल्याची खंत कामगारांची आहे. अशा अनेक समस्या बेस्ट कामगारांपुढे ‘आ’ वासून उभ्या आहेत. त्या युद्ध पातळीवर सोडविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रवाशांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महसुलात वाढ झाली आहे. भविष्यात बेस्ट उपक्रमाला होणारी तूट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे, तरच आपली सर्वांची लाडकी ‘बेस्ट’ वाचविणे शक्य होईल. त्यामुळे आता नवीन वातानुकूलित बसेस खरेदीसाठी ७७४ कोटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासह अन्य कामांसाठी दोन हजार कोटी असे २,७७४ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने पालिकेला केली आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून पालिकेच्या अर्थसंकल्पात आता ‘बेस्ट’च्या पदरी काय पडणार? याकडे बेस्ट उपक्रमाचे व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या या लाडक्या ‘बेस्ट’ला मजबूत करण्यासाठी अनुदानरूपी ‘बूस्टर डोस’ची गरज आहे व ती पूर्ण केली जावी, अशीच सर्वसामान्यांची धारणा आहे.

अमृत महोत्सवी वर्षात “महाराजस्व अभियान”

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान ३० एप्रिल २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे. हे अभियान कसे असेल, याबाबतचा लेख

ज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महसूल विभागामार्फतही हा विभाग अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येणार असून या सेवा गतिमान पद्धतीने देण्यावर भर देण्यात येईल. सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे हा विभाग लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या विस्तारित स्वरूपातील अभियानात सर्व शेतकऱ्यांना घरी जाऊन शेतीच्या सातबारा देणे आणि फेरफार निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि फेरफार अदालतीचे आयोजन करणे, भूसंपादनाची गावपातळीवरील कमी-जास्त पत्रके अद्ययावत करणे आदींसह प्रमुख आठ बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या नवीन स्वरूपाच्या अभियानात बिगरशेती प्रकरणे गतीने मार्गी लावणे, पाणंद, शिवार रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, विस्तार पत्रकाच्या नोंदी अद्ययावत करणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या महत्त्वाच्या आठ बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील अनेक प्रकरणे हाताळावी लागतात. यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असतो. मात्र त्यांच्याकडे मोठी क्षमता असते. म्हणूनच त्यांच्यावर या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत.
एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६च्या विविध कलमांची कार्यवाही करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद/पांधण/शेतरस्ते/शिवाररस्ते/शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे आणि तयार करणे, गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देणे, लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच यासाठी प्रचार प्रसिद्धी करणे, निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, सप्टेंबर २०२२ पर्यंतची मोजणी प्रकरणे मार्च २०२३ पर्यंत निकाली काढणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ई- चावडी प्रणालीची अंमलबजावणी करणे, भूसंपादन अधिनियम, १८९४ अंतर्गत कार्यवाही करणे, या घटकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात
येणार आहेत.

याशिवाय परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी, गौण खनिज ऑनलाइन प्रणाली वापराबाबतची माहितीही देण्यात यावी तसेच सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र १ अन्वये कुळकायद्याच्या कलम ६३ मधील सुधारणा करणे, पोटहिस्सा/सामीलिकरण/भूसंपादन/रस्ता सेटबॅक इत्यादी कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा पुरविणे, नावीन्यपूर्ण योजना उपविभाग आणि तहसील कार्यालय येथे राबविणे महाराजस्व अभियाना घेण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत आपल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर केलेल्या कामगिरीबाबतची माहिती मासिक प्रगती अहवालाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी या अभियानाअंतर्गत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी घटकनिहाय कालबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून, व्यवस्थापन पथकाची स्थापना करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुपालनाचे निर्देश देण्यात यावेत, अशा सूचना आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

आधुनिकता आणि गतिमानतेला प्राधान्य

महाराजस्व अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविल्यामुळे महसूल विभागातील यंत्रणेमध्ये अधिक सुधारणा करून पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे. याशिवाय जमीन मोजणीची कामे अधिक गतीने आणि अचूकपणे होण्यासाठी रोव्हर यंत्रे क्रांतिकारी ठरणार आहेत, तर ऑनलाइन यंत्रणेचा उपयोग अधिकाधिक केल्यामुळे महसूल विभागाचे काम अधिक गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलमाची आणि लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबरोबरच गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे, पोटखराबा वर्ग अ खालील जमीन लागवडीसाठी आणण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. याशिवाय निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे यावरही भर देण्यात येणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी, ई-हक्क प्रणालीचा वापर, विसंगत सातबारा दुरुस्ती, प्रलंबित फेरफाराचा आढावा व उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत घोषणापत्र देणे या बाबी पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. महाराजस्व अभियानामाध्ये कार्यवाही करावयाच्या मुद्यांव्यतिरिक्त विभागीय आयुक्त, जिल्हाधिकरी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकभिमुख आणि लोकोपयोगी कोणताही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवायचा असल्यास ते या वर्षाच्या राजस्व अभियानामध्ये हाती घेऊ शकणार आहेत. त्या त्या भागातील गरज, भौगोलिक परिस्थिती, त्या भागानुसार वेगळे महसुली विषय इत्यादी या अंतर्गत ते राबविले जाऊ शकतात. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानाचा आपल्या जिल्ह्यांमध्ये आढावा घेऊन मासिक प्रगती अवाल विभागीय आयुक्त यांना सादर करणे आवश्यक आहे. तर विभागीय आयुक्त यांनी या अभियानाचा आढावा घेऊन तिमाही प्रगती अहवाल शासनास सादर करणे आवश्यक आहे. महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेखविषयक गाव नमुना नंबर ७/१२ अद्ययावत करणे, तसेच गावातील खातेदारांना संगणकीकृत ७/१२ घरपोच देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यावर भर देण्यात येत आहे. भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात येत आहे. यामध्ये संयुक्त मोजणी नकाशा आणि संयुक्त मोजणी पत्रक, भूसंपादन कायदा करून ६ चे नोटिफिकेशन, अंतिम जाहीर निवाड्याची प्रत, भूमी संपादित जमिनीचे ताबे पावतीची नक्कल, शेतसारा कमी करण्याबाबतचे आदेश, जमिनीचे सर्व्हे नंबर किंवा अन्य क्षेत्र वर्ग करावे लागत असल्यास तसे जमीन वर्ग केल्याबाबतचे जिल्हाधिकारी यांचे अभिहस्तांतरित आदेश याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

-वर्षा फडके – आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी (महसूल)

म्हातारा (ना) इतुका १९४६ – २०२३

ग्राहकांना सुरक्षिततेची आणि दर्जाची हमी देणाऱ्या आस्थापनेला (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)ला ६ जानेवारी रोजी ७६ वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या वेळेस भारतातील ब्रिटिश राजवट संपत आल्याची चाहूल लागली होती. देशाला औद्योगिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राष्ट्रीय मानके तयार करण्याचे मोठे कार्य समोर होते. त्यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स (इंडिया) ही संस्था कार्यरत होती. तिने संस्थेच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला. उद्योग आणि पुरवठा विभागाने ३ सप्टेंबर १९४६ रोजी ‘भारतीय मानक संस्था’ या संस्थेच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आणि ६ जानेवारी १९४७ रोजी भारतीय मानक संस्था (ISI) अस्तित्वात आली.

सुरुवातीच्या वर्षांत, संस्थेने मानकीकरणावर लक्ष केंद्रित केले. सामान्य ग्राहकांना मिळणारे मानकीकरणाचे फायदे डोळ्यांसमोर ठेवून भारतीय मानक संस्थेने मानकीकरण योजना योजनेची सुरुवात केली. ISI द्वारे १९५५-५६ मध्ये औपचारिकपणे सुरू केलेली ही योजना हळूहळू सक्षम होत गेली. भारतीय मानकांच्या आनुषंगाने वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना, त्यांच्या उत्पादनांवर ISI मार्क लागू करण्यासाठी परवाने देण्यास सुरुवात झाली. १९६३ मध्ये प्रमाणीकरण योजनेच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. भारतीय मानक संस्था (प्रमाणन गुण) अधिनियम, १९५२ अंतर्गत उत्पादनाचे प्रमाणीकरण कार्यान्वित होत असताना, मानके तयार करणे आणि इतर संबंधित काम करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. त्या दृष्टीने २६ नोव्हेंबर १९८६ च्या संसदेत विधेयक मांडण्यात आले. २६ नोव्हेंबर १९८६ ला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कायद्याद्वारे अस्तित्वात आली.
वस्तू, सेवा यांना त्रयस्थाकडून दर्जा आणि सुरक्षितता याबद्दल मिळणारी सरकारी हमी म्हणजेच ISI किंवा ISO हे मानांकन. पर्यावरण स्नेही उत्पादनांकरिता इको मानक किंवा सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारे हॉलमार्क, अशी सर्व मानके बीआयएस देत आली आहे. IS एक हे मानक आपल्या भारतीय झेंडा-तिरंगा याला आहे. तिरंग्याच्या लांबी-रुंदीचे प्रमाण, रंगांच्या छटा, वापरण्यात येणारे कापड (खादी) इ. गोष्टी त्यात प्रमाणित केलेल्या असतात. IS २ मानक आकड्यांचे सुलभीकरण किंवा (round off) साठी देण्यात आलेले आहे. प्रमाणीकरणाची सुरुवात इंजिनीयर मंडळींकडून झाल्याने त्यांना या गोष्टीची नितांत आवश्यकता होती. भारतीय मानके विकसित करणे, प्रकाशित करणे ही कामे बीआयएस करते. त्यासाठी योग्य मूल्यमापन योजना लागू करते. योग्य मूल्यमापनासाठी प्रयोगशाळा चालविणे किंवा सक्षम, खासगी प्रयोगशाळांची क्षमता जोखून त्यांना मान्यता देणे, हॉलमार्किंगची अंमलबजावणी करणे, ग्राहक सक्षमीकरण करणे ही देखील कामे त्यांच्याकडून केली जातात. तसेच ISO आणि IEC (इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन) यामध्ये बीआयएस भारताचे प्रतिनिधित्व करते.

ग्राहकांना उपयोगी पडेल, असे एक ॲप बीआयएसने विकसित केले आहे. एखाद्या वस्तूच्या दर्जाच्या किंवा सुरक्षिततेबद्दल हमीची माहिती हवी असल्यास बीआयएसच्या या ॲपवर तपासून बघता येते. हे ॲप २७ जुलै २०२० पासून उपलब्ध करण्यात आले आहे. त्या ॲपचे नाव ‘बीआयएस केअर.’ हे ॲप डाऊनलोड करून घ्या. ISI चिन्हाच्या वर भारतीय मानक नंबर अथवा इंडियन स्टँडर्ड लिहिलेले असते आणि खालच्या बाजूला उत्पादकाचा CM/L नंबर किंवा लायसेन्स नंबर लिहिलेला असतो. समजा आपल्याला ISI चिन्ह तपासून पाहायचे असेल, तर आयएसआय चिन्हावर टिचकी मारा. त्यावर ISI नंबर आणि CM/L नंबर टाका. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूची सर्व माहिती तिथे ताडून बघता येईल. सत्यता पडताळून मगच ग्राहकांनी खरेदी करावी.

भारतीय मानकांनुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्वयं-घोषणेवर आधारित नोंदणीद्वारे, विशिष्ठ आर-नंबरसह मानक चिन्ह वापरण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी परवाना उत्पादकांना मंजूर केला जातो. मूल्यांकन किंवा तपासणी केल्यावर अनिवार्य नोंदणी योजनेंतर्गत परवाना मंजूर करणे आणि कार्यवाही करणे अशी कामे केली जातात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी उपलब्ध असलेला हा परवाना ‘CSR’ ऊर्फ ‘कंपलसरी रजिस्ट्रेशन स्कीम’ देण्यास सुरुवात झाली आहे. इलेक्रोनिक गेम्स, मोबाइल फोन, लॅपटॉप/टॅबलेट/नोटबुक, मायक्रोवेव्ह ओव्हन, प्रिंटर, स्कॅनर वगैरे उपकरणांना ते दिले जाते. ग्राहकांनी अशा वस्तू खरेदी करताना पडताळणीसाठी याचा उपयोग जरूर करावा. ॲपवर ‘CRS’वर टिचकी मारावी व वस्तूवर लिहिलेला नंबर टाकून स्वतःची खात्री करून घ्यावी.

सोने खरेदीच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून बीआयएसने हॉलमार्कची सुविधा सुरू केली. पण, त्यासाठी खर्च जास्त होतो म्हणून ग्राहक विना हॉलमार्कच्या दागिन्यांना प्राधान्य देत होते. हॉलमार्क दागिन्यांवर उमटवताना त्यात बीआयएसचा लोगो, सोन्याची शुद्धता आणि HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) नंबर कोरला जातो. हा नंबर आपल्या आधार कार्डासारखा प्रत्येक दागिन्यासाठी वेगळा असतो. दोन दागिन्यांना एकच नंबर आहे असे कधीच होऊ शकत नाही.

काही बातमी मिळाल्यास या केंद्रांवर धाड घालते. नुकत्याच टाकलेल्या अशाच एका धाडीमध्ये साक्षीदार म्हणून जाण्याचा योग आला होता. कोणत्याही केंद्रामध्ये सोन्याचा कस (टंच) काढून देण्याला परवानगी असते. हे काम अर्ध्या तासाच्या आत होऊ शकते. पण, त्या दागिन्यावर HUID नंबर लेझरने कोरायचा असेल, तर मात्र ४८ तास लागतात. अशा वेळेस चुकीचा किंवा दुसऱ्याच एखाद्या दागिन्याचा नंबर कोरला जातो. हे लक्षात येण्याचे कारण म्हणजे मी त्या दागिन्यावर (नेकलेस) कोरलेला नंबर BIS care या ॲपवर टाकला असता ॲप मात्र तो दागिना कर्णफुले असल्याचे दाखवत होते. तसेच केंद्राचे नावही जुळत नव्हते. दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचे हजारोंनी पैसे लागतात. फसवणूक टाळण्यासाठी या ॲपचा उपयोग नक्कीच फायदेशीर ठरेल.

बीआयएसच्या स्थापनेला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवघे पाऊणशे वयोमान तरीही नवीन मानके तयार करणे, असलेल्या मानकांत सुधारणा करणे, लॅबोरेटरीची व्यवस्था वाढवणे, बीआयएस केअर ॲप तयार करणे अशा वेगवेगळ्या कामांतून संस्था अधिकाधिक मजबूत होत आहे.

-मंगला गाडगीळ

[email protected]

भक्ताचा ‘पाय’रोग पळाला

मुंबईच्या जगन्नाथराव शिरोडकरांच्या पायाची व्याधी फारच विकोपास गेली होती. त्या वेळच्या कोणत्याही वैद्य वा डॉक्टरांच्या औषधांचा गुण येईना. पाय ढोपरापासून कापावे लागतील, तसे डॉक्टरांचे मत पडले. यावरून त्यांच्या पायाच्या व्याधीची कल्पना येते. पण अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती आलेल्या मित्राच्या सांगण्यानुसार जगन्नाथराव अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामींचे तेजस्वी रूप पाहताच त्यांची खात्री झाली की, श्री स्वामी आपला रोग निश्चित बरा करतील.

महाराज एक तर हे पाय बरे करून मला जीवदान द्या, अथवा मारून तरी टाका. त्यांच्या या निर्वाणीच्या प्रर्थनेने श्री स्वामी कळवळले. त्या जखमांकडे ज्ञानदृष्टीने पाहत सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणाले, क्या दर्द है? फेक दो; त्या सरशी त्यास थोडे बरे वाटू लागले. सोबत आलेली त्यांची पत्नी सारखी रडत होती. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून तिने त्यांच्याकडे चुडेदान मागितले. त्यांनी त्यास होकारार्थी मान हलवून मूक संमती दिली. यातच सर्व काही आले. प्ररब्धातले भोग हे भोगून संपवावे लागतात, ते खरेच. आता ते दोघेही पती-पत्नी स्वामी समर्थ चरणाशी येऊन सेवा रुजू करीत होते. त्यामुळे वेदनेची प्ररंभीची तीव्रता कमी झाली. प्ररब्ध इतके तीव्र होते की, उपचार करून जगन्नाथराव कंटाळले. हे माझ्या कपाळीचे (नशिबातले) भोग कधी सरणार आहेत कुणास ठाऊक? असा कमालीचा उद्वेग त्यांच्या मनात आल्याचे सद्गुरू श्री स्वामींनी जाणले व त्यास दिलासा देत ते म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. हे नवे औषध दुसरे तिसरे कोणतेही नसून सद्गुरू श्री स्वामींची कृपादृष्टी. येथे कुणासही एक गोष्ट लक्षात येईल ही सद्गुरूंची सेवा. दुःख-संकट-व्याधी-पीडा यात दिलासा देते. श्री स्वामींचे चरणतीर्थ मनोभावे घेण्याचा जगन्नाथरावांचा नित्य उपक्रम सुरूच होता. सोसवत नाही, मला या दुःखापासून सोडवा. असे जेव्हा ते मोगलाईतील नरगुंद येथे श्री स्वामीस सांगतात तेव्हा ते मालक आला नाही, असे सूचकपणे त्यास सांगतात. पण, जगन्नाथरावांच्या दृष्टीने स्वामी हेच मालक-चालक-पालक. ते खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री समर्थ चरणास लावून परत खिशात ठेवतात. या पादुकांच्या (श्री समर्थांच्या) तीर्थाशिवाय अन्य औषध आता फलश्रुती म्हणून त्यांचे पाय यथावकाश बरे होतात. ढोपरांपासून पाय कापण्याचा सल्ला त्यांना दिला गेला होता. पण आता सर्वांनाच श्री स्वामी लीलेचे मोठे आश्चर्य वाटू लागते. केवळ सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या सहवासाने, सेवेने त्यांच्या चरणतीर्थाचा किती मोठा परिणाम होतो, हे या लीलेवरून प्रबोधित होते.

-विलास खानोलकर

[email protected]

मुंबईकरांना प्रतीक्षा शनिवारची, महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष

मुंबई (प्रतिनिधी): आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेचा यंदाचा सन २०२३ – २४ चा अर्थसंकल्प असण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन कोणतीही कर वाढीची शक्यता नसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने यंदा स्थायी समिती नसल्याने पालिका प्रशासनाकडून प्रशासकाला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. उद्या शनिवारी अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा तर अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे सर्वसाधारण अर्थसंकल्प आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करणार आहेत.

मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाली. मात्र निवडणूक लांबल्याने पालिका अस्त्तित्वात आलेली नाही. त्यामुळे पालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे स्थायी समिती, पालिका सभागृह अस्त्तित्वात नसल्याने आयुक्तांना दरवर्षी प्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे यंदा अर्थसंकल्प सादर करून मंजूर करून घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांना अर्थसंकल्प आपल्या अधिकारात मंजूर करता येणार आहे

गेल्यावर्षी सन २०२२-२३ चा ४५९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प पलिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थायी समितीला सादर केला होता. या वर्षी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे अर्थात तो फुगलेला असेल असा अंदाज आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा भांडवली खर्च आतापर्यंत अवघा ३६ टक्के झाला असून मार्च पर्यंत उर्वरित ६४ टक्के रक्कम खर्च होणे अशक्य असल्याचे मत पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा त्यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पासंदर्भांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजन करण्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.