मुंबईच्या जगन्नाथराव शिरोडकरांच्या पायाची व्याधी फारच विकोपास गेली होती. त्या वेळच्या कोणत्याही वैद्य वा डॉक्टरांच्या औषधांचा गुण येईना. पाय ढोपरापासून कापावे लागतील, तसे डॉक्टरांचे मत पडले. यावरून त्यांच्या पायाच्या व्याधीची कल्पना येते. पण अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती आलेल्या मित्राच्या सांगण्यानुसार जगन्नाथराव अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामींचे तेजस्वी रूप पाहताच त्यांची खात्री झाली की, श्री स्वामी आपला रोग निश्चित बरा करतील.
महाराज एक तर हे पाय बरे करून मला जीवदान द्या, अथवा मारून तरी टाका. त्यांच्या या निर्वाणीच्या प्रर्थनेने श्री स्वामी कळवळले. त्या जखमांकडे ज्ञानदृष्टीने पाहत सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणाले, क्या दर्द है? फेक दो; त्या सरशी त्यास थोडे बरे वाटू लागले. सोबत आलेली त्यांची पत्नी सारखी रडत होती. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून तिने त्यांच्याकडे चुडेदान मागितले. त्यांनी त्यास होकारार्थी मान हलवून मूक संमती दिली. यातच सर्व काही आले. प्ररब्धातले भोग हे भोगून संपवावे लागतात, ते खरेच. आता ते दोघेही पती-पत्नी स्वामी समर्थ चरणाशी येऊन सेवा रुजू करीत होते. त्यामुळे वेदनेची प्ररंभीची तीव्रता कमी झाली. प्ररब्ध इतके तीव्र होते की, उपचार करून जगन्नाथराव कंटाळले. हे माझ्या कपाळीचे (नशिबातले) भोग कधी सरणार आहेत कुणास ठाऊक? असा कमालीचा उद्वेग त्यांच्या मनात आल्याचे सद्गुरू श्री स्वामींनी जाणले व त्यास दिलासा देत ते म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. हे नवे औषध दुसरे तिसरे कोणतेही नसून सद्गुरू श्री स्वामींची कृपादृष्टी. येथे कुणासही एक गोष्ट लक्षात येईल ही सद्गुरूंची सेवा. दुःख-संकट-व्याधी-पीडा यात दिलासा देते. श्री स्वामींचे चरणतीर्थ मनोभावे घेण्याचा जगन्नाथरावांचा नित्य उपक्रम सुरूच होता. सोसवत नाही, मला या दुःखापासून सोडवा. असे जेव्हा ते मोगलाईतील नरगुंद येथे श्री स्वामीस सांगतात तेव्हा ते मालक आला नाही, असे सूचकपणे त्यास सांगतात. पण, जगन्नाथरावांच्या दृष्टीने स्वामी हेच मालक-चालक-पालक. ते खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री समर्थ चरणास लावून परत खिशात ठेवतात. या पादुकांच्या (श्री समर्थांच्या) तीर्थाशिवाय अन्य औषध आता फलश्रुती म्हणून त्यांचे पाय यथावकाश बरे होतात. ढोपरांपासून पाय कापण्याचा सल्ला त्यांना दिला गेला होता. पण आता सर्वांनाच श्री स्वामी लीलेचे मोठे आश्चर्य वाटू लागते. केवळ सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या सहवासाने, सेवेने त्यांच्या चरणतीर्थाचा किती मोठा परिणाम होतो, हे या लीलेवरून प्रबोधित होते.
-विलास खानोलकर