पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप निवडणूक लढणार

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले. यामध्ये हेमंत रासने यांना कसब्यातून तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलले अशी चर्चा होत असतानाच यावर पालकमंत्री आणि भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केले आहे. त्यांनी देखील पक्षासोबत राहू असे म्हटले आहे. तसेच जगताप यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने समजदारी दाखवली. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटूंब राहिल, असे त्यांच्या मुलाने सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले.

टिळक कुटुंबाला डावलण्यात आले का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, टिळक कुटुंबाशी चर्चा करून ही निवडणूक जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. त्यावर शैलेंद्र टिळक आणि कुणालला महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून घोषित केले आहे. टिळक कुटुंबाच्या पाठिशी आम्ही आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.

एसबीआय आणि एलआयसी बाबत काळजीचे कारण नाही

अदानी प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय बँकिंग प्रणाली चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अदानी समूहातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या दोन्हींची गुंतवणूक मर्यादेत आहे. तसेच बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहेत आणि गुंतवणूकदारांना सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात तोट्याचा सामना करावा लागत आहे. या अहवालामुळे गेल्या आठ दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या मार्केट कॅपला ८ लाख ७६ हजार ५२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांनाही झटका बसला आहे. गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अदानी प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, माझ्या समजुतीनुसार, अदानी समूहातील एलआयसी आणि एसबीआयची गुंतवणूक ठरविण्यात आलेल्या मर्यादेतच आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही स्पष्टपणे उत्तरे दिली.

त्या म्हणाल्या, की मी नमूद करू इच्छिते की एसबीआय आणि एलआयसी या दोघांनी त्यांची तपशीलवार माहिती संबंधित सीएमडी सोबत शेअर केली आहे. त्या अशाही म्हणाल्या की, भारतीय बँका आज एनपीएचे ओझे कमी करण्यात यशस्वी ठरल्या असून त्या मजबूत स्थितीत आहेत.

या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, एसबीआय आणि एलआयसीने आपण ओव्हरएक्सपोज केलेले नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या वतीने अदानी समूहाच्या शेअर्सचे एक्सपोजर मर्यादेत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन घसरल्यानंतरही ते फायद्यात आहेत. सीमारामण म्हणाल्या की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्थेने एनपीएचे ओझे कमी केले आहे. बँकेकडे मजबूत दुहेरी ताळेबंद आहे. एनपीए आणि रिकव्हरी स्थिती चांगली आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.

लग्नास नकार दिला म्हणून सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही

सत्र आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तरूणाची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, आरोपी व्यक्तीसोबत राहण्यासाठी महिलेने आपला पती आणि तीन मुलांना सोडले होते. तसेच, बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती देखील विवाहित होती.

दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदला उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने नमूद केले की, अनेक कारणांमुळे सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बिघडल्यानंतर सतत महिलांकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी याचा वापर करतात.

अहमदने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने लग्नाचे वचन दिले होते, असा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलेची बाजू मांडताना सांगितले. तर दुसरीकडे, अहमदचे वकील राज के चौधरी यांनी सांगितले की, महिलेने मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्याने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, महिलेचे लग्न झाले असून तिला तीन मुले आहेत. पती आणि मुलांना सोडून ती २००९ मध्ये अहमदसोबत पळून गेली. त्यानंतर २०११ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. यानंतर अहमदने लग्न टाळले. २०१२ मध्ये महिला अहमदच्या मूळ गावी गेली असता तो विवाहित असून त्याला आधीच मुले असल्याचे आढळून आले. तरीही, महिलेने २०१४ मध्ये आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पतीसोबत आपली तीन मुले सोडली. हे सर्व घडल्यानंतरही अहमदने संबंधित महिलेशी लग्न करण्याचे टाळले. त्यामुळे २०१५ मध्ये या महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

कोणतीही करवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प

विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकांच्या माध्यमातून महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पात नवीन करवाढीची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

छाया : अरुण पाटील

सुमारे ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा ५२६१९.०७ कोटींच्या या अर्थसंकल्पात चालू विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

छाया : अरुण पाटील

मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. एप्रिल १९८४ मध्ये द. म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५ मध्ये जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला.

छाया : अरुण पाटील

यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत १४.५२ टक्क्यांनी जास्त आहे. मागील अर्थसंकल्पात ४५९४९.२१ कोटी रुपये होते, तर यावर्षी ५२,६१९.०७ कोटी रुपये एवढे आहे. हा अर्थसंकल्प आनंदमय असल्याचे महापालिका प्रशासकांनी म्हटले आहे.

BMC Budget : कसा आहे मुंबईचा अर्थसंकल्प?

चार-पाच तासांऐवजी अवघ्या २० मिनिटांत अर्थसंकल्प सादर

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२,६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात शनिवारी सकाळी सादर करण्यात आला. महापालिकेच्या एवढ्या आर्थिक वर्षात यंदा प्रथमच आयुक्तांनी अवघ्या २० मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. एरवी हाच अर्थसंकल्प सादर करायला चार ते पाच तास लागतात. शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. बरोबर १० वाजून ४८ मिनिटांनी त्याची सांगता झाली. अवघ्या १५ ते १८ मिनिटांच्या कालावधीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

छाया : अरुण पाटील

मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प

२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एमआरआय मशिन उभारण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.

स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद केली आहे.

शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

महानगरपालिकेकडून काल शनिवारी शिक्षण विभागाचा ३,३४७.१३ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मागील वर्षी ३,३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला होता.

यावर्षी खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

व्हर्च्युल क्लासरूमसाठी 3.20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे

2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद

याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम 2023- 24 मध्ये ही सुरू राहणार असून यामध्ये गणवेश पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, शालांत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शालेय आरोग्य कार्यक्रम, अत्याधुनिक बैठक व्यवस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे

आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत

नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

World Cancer Day: या गोष्टी टाळाल तर कर्करोगापासून बचाव शक्य

आज जागतिक कर्करोग दिन. दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी हा कर्गरोग या आजाराबद्दल जन जागृती करण्यासाठी दिवस साजरा केला जातो. दरवर्षी कर्करोगाने होणारे लाखो मृत्यू रोखण्यासाठी लोकांना कर्करोगाबद्दल शिक्षित करणे गरजेचे आहे.

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. अनुवांशिक कारणांमुळे झालेला कर्करोग टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करु शकतात. पण काही सवयी टाळून आपण स्वत:चा कर्करोगापासून बचाव करु शकतो.

धूम्रपान
धुम्रपानामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. तसेच इतरही अनेक घातक रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे त्वरित धूम्रपान बंद केल्यासकर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

शारीरिक हालचालींचा अभाव
आठवड्यातून पाच दिवस दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्याने कर्करोग होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. असे दिसून आले आहे की आठवड्यातून काही दिवस बागकाम केल्याने फुफ्फुसाचा आणि इतर कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

लठ्ठपणा
कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे स्तनाचा कर्करोग, गुदाशय आणि आतड्यांचा कर्करोग, एंडोमेट्रियल कर्करोग, अन्ननलिका कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग आणि मूत्रपिंडाचा कर्करोग हे काही कर्करोग आहेत ज्यांचा धोका वाढतो. अतिरिक्त चरबीच्या पेशी अधिक इस्ट्रोजेन आणि इन्सुलिनवर परीणाम करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

चूकीचा आहार
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आदर्श आहार म्हणजे भाज्या, फळे, धान्य आणि मटार आणि बीन्समधील प्रथिने यावर भर दिला पाहिजे. प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पेये यांचे सेवन कमी प्रमाणात करणेच योग्य आहे.

जास्त सूर्यप्रकाश
जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होते ज्यामुळे सनबर्न किंवा टॅन देखील होते. यासाठी दुपारच्या उन्हात बसणे टाळा, छत्री वापरा, सनस्क्रीन वापरा तसेच डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा

जास्त मद्यपान
कोलनच्या कर्करोगास कारणीभूत अल्कोहोलमुळे मद्यपान टाळण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणे हे केव्हाही चांगलेच.

(वरील दिलेली बातमी ही सामान्य माहितीच्या आधारे दिलेली आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणतीही गोष्ट करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

प्राजक्त सुमन

(सुमन कल्याणपूर यांना यंदा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विशेष लेख…)

एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांचे बीज रुजत नाही. सृष्टी नियमच आहे. मात्र प्रत्येक नियमाला अपवादही असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अशाच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा यासारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणाऱ्या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही, तर बहरून आलं. एव्हरेस्ट शिखर सर करणाराच फक्त उत्तम गिर्यारोहक असतो असं नाही, कारण तुलनेनं थोड्या कमी उंचीची शिखरं काबीज करायलाही तशीच गुणवत्ता असावी लागते. व्यावसायिक उंची अथवा गाण्यांची संख्या या निकषांचं एव्हरेस्ट जरी सुमनताईंनी गाठलं नसलं, तरी सुकून गेल्यानंतरही ज्याचा सुवास दरवळत राहतो आणि माळलाही जातो, अशा बकुळ फुलांची त्या माळ ठरल्या. रसिक आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा, त्यांच्याच ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ या गाण्याप्रमाणे आजही सातत्यानं गुणग्राहकांच्या मुखी आहेत. आता, तर ‘पद्मभूषण’रूपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणाऱ्यांनाही हा सुमनहार गळ्यात मिरवायला हरकत नसावी.

सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. अस्सलशी साधर्म्य हे कमअस्सल कलाकारासाठी तर वरदान ठरू शकतं. मात्र तेवढ्याच ताकदीच्या दुसऱ्या एखाद्या अव्वल कलाकारासाठी ते अस्मितेच्या संकटासारखं घातक ठरतं. सुमनताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या उगवतीच्या समयी लतारूपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेचं चीज करण्यास मायानगरी तोकडी पडली. न्याय्य ते त्यांना देण्यास अवकाशच कमी पडलं. त्यांची स्वतःची अशी शैली असूनही आवाजातल्या साधर्म्यामुळे अनेकदा संगीतकार त्यांना लता मंगेशकर यांच्यासारखं गायला प्रवृत्त करत. त्यामुळे स्वशैली असूनही, हुबेहूब लतासारखी गाणारी, लताची क्लोन, प्रती लता वगैरे विशेषणं (?) त्यांना चिकटू लागली. बरं त्यातही लता उपलब्ध असेल, तर प्रती लताला गाणी का द्यायची, असा विचारही संगीतकार, निर्माते करीत, असे सगळे विसंवादी सूर हे सुमन रागाचे वादी-संवादी स्वर झाले होते. एकूण परिस्थिती त्यांच्यासाठी फारच कठीण होती. कारण लताजींना, तर स्वतःचंच गाणं गायचं असायचं. मात्र सुमनजींना लतासारखं गाण्याचं दडपण बाळगत गाणं गावं लागत असे. हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘चांद’ या चित्रपटासाठी शैलेंद्र यांच्या लेखणीतून झरलेलं ‘कभी आज कभी कल कभी परसो ऐसे ही बीते बरसों’ हे समदर्शी सुमन लतेच एकमेव युगुलगीत

ऐकताना या एक ‘सूर’त्वाची प्रचिती येते.
कभी आज कभी कल कभी परसों

हे नृत्यगीत हेलन आणि शीला वाज यांच्यावर चित्रित झालं आहे. कुणी कुणाला आवाज दिला, हे ओळखणे निव्वळ अशक्य आहे किंवा आता फक्त सुमनताईंनाच शक्य आहे. शीला-लता आणि हेलन-सुमन असं यमक मी तरी जुळवलं आहे. व्यासंगी याचा योग्य निर्णय करू शकतील. ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, कुण्डे कुण्डे नवं पयः, जातौ जातौ नवाचाराः, नवा वाणी मुखे मुखे॥’ या सुभाषिताला अनुसरून या दोन्ही समगुणी गायिकांमधल्या संबंधांवर निरनिराळी भाष्य झाली. सुमनताईंच्या पहिल्याच गाण्याच्या वेळी (मंगू चित्रपट) लतादीदींसोबत झालेल्या सुसंवादाच्या, ‘आठवणीच्या चिंचा गाभुळ’ चाखायला देतात. लतादीदींच्या गाण्यांनी सुमनच्या मनात घर केलं होतं. आपल्या बालसखीबरोबर घराच्या गच्चीवर सततच त्यांच्या मैफली घडत असत. योगायोग पाहा प्रथम हिंदी आणि नंतर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पणातली गाणी, तर रेकॉर्ड झाली. मात्र चित्रपट आलेच नाहीत. सुमन कल्याणपूर यांची सांगितिक कारकीर्द मुख्यत्वे तिरंगी आहे. एक तर हिंदी पार्श्वगायन, नंतर मराठी वगळता अन्य भाषेतील पार्श्वगायन आणि सुगम संगीत आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे मराठी, हिंदी पार्श्वगायन हे त्यांच्याकडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही काम न मागता विनासायास चालत आलं. मात्र ते राजकारणानं ग्रासलं गेलं. बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, असमिया, मैथिली, राजस्थानी, ओडिया अशा अन्य भाषांतही त्यांनी गायलेली कितीतरी गीतं गाजली. गुजरात, पंजाब राज्य सरकारकडून सलग पुरस्कृतही करण्यात आलं. अखेरीस हरदास जसा मूळ पदावर येतो तद्वतच असं लक्षात येतं की, सुमनताईंचा आवाज नुसताच गोड नाही, तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच पद्मभूषणावह असून विश्वामित्र बाण्याच्याही एखाद्याचं अरसिकत्व भंग करेल, अशी लाघवी आहे.

-नितीन सप्रे

[email protected]
(लेखक डी. डी. न्यूज, (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.)

ब्लॅकमेलिंगचे कॉल सेंटर

हॅलो इन्स्टंट लोन हवं आहे का?, एका दिवसात कर्ज खात्यावर जमा होईल’, असे फोन आपल्यापैकी अनेकांना आले असतील. कोविडनंतरच्या काळात पैशांची चणचण मध्यमवर्गीय, सर्वसामान्य नागरिकांना भासत होती. त्यामुळे सहज असे कर्ज उपलब्ध होत असेल, तर देवा पावला, अशी काही मंडळींची भावना झाली असेल. मात्र असे इन्स्टंट लोन घेतल्यानंतर पठाणी पद्धतीने हफ्ते भरण्यासाठी तगादा लागतो, हे किती जणांना माहीत आहे. तसेच अनेकदा अश्लील शिवीगाळीपासून कुटुंबाच्या इतर मंडळींना त्रास देण्याचे प्रकारही घडतात. त्यावेळी असे वाटते की, अशा खासगी लोकांकडून कर्ज घेण्याची बुद्धी का झाली…

औरंगाबाद शहरात असे एक कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यावेळी या ठिकाणावरून ब्लॅकमेलिंग करणारे फोन जात असल्याची माहिती तपासात उघड झाली. आजकाल बहुतांश काम मोबाइलवर होते. त्यात सध्या एका क्लिकवर इन्स्टंट लोनदेखील मिळते. मात्र याच लोनच्या माध्यमातून मनमानी वसुली होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सायबर सेलकडे प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात अशा पद्धतीने अनेक लोकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र या साऱ्यांचे केंद्रबिंदू औरंगाबाद या ठिकाणी असल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलही चक्रावून गेले होते.

उत्तराखंडमधील डेहराडून पोलीस आले होते. औरंगाबाद पोलिसांची त्यांनी स्थानिक पातळीवर मदत मागितली आणि छापा टाकून कॉल सेंटरचा पदार्फाश केला. औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात भर वस्तीत जोएब कुरेशी नावाची व्यक्ती हे कॉल सेंटर चालवत होता. त्यामध्ये तब्बल दीडशे तरुण-तरुणी काम करत होते. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून तब्बल १२ तास झाडाझडती घेतल्यानंतर हे कॉल सेंटर आता सील करण्यात आले. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि नंतर औरंगाबादपर्यंत या पथकाने तपास केला आहे.

यश एंटरप्राइजेसच्या नावाखाली हे कॉल सेंटर तिथे सुरू होते. मुळात यश एंटरप्राइजेस हे वोडाफोन, आयडीबीआय आणि भारत पे यांचे अधिकृत कॉल सेंटर असल्याचे कागदपत्री दिसत होते. मात्र डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असलेल्या तक्रारदारांना याच कॉल सेंटरमधून ३३ सीमकार्डद्वारे धमकीचे फोन करण्यात आल्याची पक्की माहिती हाती होती. तसेच त्यांचे लोकेशन पैठण गेट येथे याच कॉल सेंटरचे आढळून आले होते. पोलिसांच्या छाप्यात त्यापैकी २३ सीमकार्ड या ठिकाणी आढळून आले. त्यावेळी पोलिसांची खात्री पटली की, हे कॉल सेंटर नव्हे, तर ब्लॅकमेलिंगचे मुख्य केंद्र आहे. त्यानुसार पोलिसांनी १३४ साधे मोबाइल, दहा अँड्रॉइड मोबाइल, एक लॅपटॉप, तेराशे ते चौदाशे सीमकार्ड ताब्यात घेतले, अशी माहिती सायबर पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू ठेवली. त्यात अधिकृत कॉल सेंटर असलेल्या कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यातून या कंपन्यातील काही व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. डेहराडून पोलिसांच्या मदतीने छापा टाकल्यावर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीमकार्ड मोबाइलबरोबर दोन तलवारी आढळून आल्या. त्यामुळे या आरोपींमध्ये कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे का? याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये कॉल सेंटरमधून इन्स्टंट लोन ॲपद्वारे कर्ज घेतलेल्यांना, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पुरावे पोलिसांना आढळून आले आहेत. डेहराडूनमध्ये ब्लॅकमेलिंग करण्याच्या जवळपास अडीचशे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत मूळ मालक अद्याप सापडला नाही. त्यात तपासात आणखी सविस्तर माहिती समोर आली. जोएब नामक तरुण आधी कॉल सेंटरमध्ये काम करायचा. नंतर त्याने स्वतःच ऑपरेटर कंपन्यांसाठीचे कर्ज वसुलीचे कॉल सेंटर सुरू केले. त्याच्या नावाखाली त्याचे ब्लॅकमेलिंगचे कॉल सेंटर सुरू केले होते. दीडशे तरुण-तरुणी त्याच्याकडे काम करत होते. तो प्रत्येकाला १५ हजार रुपयांपर्यंत पगारही देत होता. जोएब हा एक मोहरा असला तरी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, मोठी माहिती उघड होईल, असा विश्वास सायबर पोलिसांना वाटत आहे. कारवाई करण्यात असलेल्या कॉल सेंटरमध्ये दीडशे युवक-युवती काम करत होते, ते पैठण गेट परिसरातील मध्यमवर्गीय वस्तीतील होते. त्यातील काहीजण तर पॉकेट मनी मिळावा, यासाठी या कॉल सेंटरमध्ये पार्टटाइम काम करत होते. पैठणच्या आसपास अनेक महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस आहेत. तसेच बाहेरगावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयदेखील सोयीने उपलब्ध होते. त्यामुळे औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी आलेली काही मुले या कॉल सेंटरमध्ये फावल्या वेळेत पैसे कमवण्यासाठी काम करत असल्याची माहिती समोर आली. मात्र पोलिसांना यात या मुलांचा काही दोष वाटला नाही.त्यामुळे त्यांच्यावर सध्या तरी कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांच्या तपासाचा फोकस हा ब्लॅकमेलिंगसाठी कॉल सेंटरचा वापर करणाऱ्या चतुर टोळीच्या मागे आहे. पोलीस पथक या टोळीच्या मुळाशी कुठपर्यंत जाणार आहे, ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तात्पर्य : इन्स्टंट लोनच्या नावाखाली खात्यावर पैसे पडतील. पण व्याज, चक्रवाढ व्याज याचे कोणताही मापदंड न ठरवता अवाच्या सव्वा रक्कम लोनच्या नावाखाली लुटमार करणारी टोळी कार्यरत आहे. त्याचे सेंटर महाराष्ट्रात असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. तेव्हा अशा भूलभुलैया, इन्स्टंट लोनच्या प्रकारांपासून सावधान!

-महेश पांचाळ

हॉटेल सह्याद्री शाकाहारी-मांसाहारी

मुंबई सेंट्रल : दक्षिण मुंबईमधील मोठ्या एसटी डेपोबाहेर गावावरून येणाऱ्या व बाहेरगावी जाणाऱ्या एसटी गाड्यांची वर्दळ. हाकेच्या अंतरावर मुंबई सेंट्रल. पश्चिम रेल्वेचे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे शेवटचे स्थानक. अशा या मुंबई सेंट्रल विभागात साधारण ३० वर्षांपूर्वी मुंबई सेंट्रल एसटी डेपोच्या समोर ‘सह्याद्री’ नावाचे हॉटेल सुरू झाले.

ईस्राईल साजी, या हॉटेलचे एक भागीदार गुजरातमधून आलेले साजी स्वच्छ व नीटनेटक्या कपड्यांमधील हसतमुख, लाघवी, व्यक्तिमत्त्व. ग्राहकांचे हसतमुखाने स्वागत करणारी व्यक्ती. प्रवेशद्वारातून आत शिरताच मन प्रसन्न करणारे वातावरण. स्वत: साजी यांनीच आमचे स्वागत केले. सुरुवातीच्या गप्पाटप्पा झाल्यानंतर आमच्यासमोर मांडली ‘चिकन क्रिस्पी’. नावातलाच क्रिस्पीपणा, कुरकुरीतपणा पदार्थांमध्ये उतरलेली चिकन क्रिस्पी. पहिलाच घास तोंडात जाताच पदार्थाचे वेगळेपण जाणवले. वर सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणी खाल्लेली व सह्याद्रीची चिकन क्रिस्पी खूपच वेगळी. वाजवी किमतीत पदार्थ जास्त प्रमाणात, हे इथले वैशिष्ट्य. तसेच मटण मसाला व चिकन बेगम बहार. हे पदार्थसुद्धा भरपूर प्रमाणात व वाजवी किमतीत. घरच्याच मसाल्यांमध्ये बनवलेले असल्यामुळे अप्रतिम चव व शेफचे कौशल्य घेऊन समोर येतात. तयार केलेल्या पदार्थांचा सुगंध मनाला मोहीत करतो व जठराग्नी प्रज्वलित करतो व आपण नकळत दोन घास जादा खाऊन तृप्त मनाने बाहेर पडतो. ते सुद्धा खिशाला जादा कात्री न लागता. त्याचप्रमाणे मुल्तानी चिकन, मुघलाई चिकन, कॅप्सा चिकन, व्हेज पटियाला, व्हेज जयपुरी या डिशसुद्धा वरीलप्रमाणेच प्रसिद्ध व रुचकर. पोट शांत करतील; परंतु मन नाही.

एसी व नॉन एसी विभागामध्ये विभागलेले हे हॉटेल सह्याद्री. येथे आपण कुटुंबासहित जाणार असाल, तर आपणासाठी ‘मैफल’ सजलेली तयार आहेच. शाकाहारी, मांसाहारी, चायनीज सर्व प्रकारच्या व्यंजनमुक्त या हॉटेलमध्ये एकदा तरी भेट द्या व वाजवी दरात पाहुणचार अनुभवा.

हॉटेल सह्याद्री
२९५, बेलासिस रोड, एसटी डेपो समोर, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८

परिषदेच्या निवडणुकीतून ठाकरे गटाला धडा

गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी ठाकरे गटाकडून सोडण्यात आलेली नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्यानिमित्ताने महापुरुषांचा मुद्दा उचलून धरून पाहिला. तळेगावचा फोक्सान वेदांतचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, आता मराठी तरुणांच्या हातात काम कोण देणार असा प्रचार करत ठाकरे गट आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोपांची राळ उठवली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे महाराष्ट्रद्रोही आहे हे जनतेच्या मनात बिंबवण्याचा ऐनकेन प्रकार विरोधी पक्षांकडून केला गेला; परंतु या प्रचाराला महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक बळी पडले नाहीत, हे गुरुवारी विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील पाच मतदारसंघांतील शिक्षक आणि पदवीधरांनी मतदान केले आहे. शिकला तो वाचला असे म्हणतात. त्याप्रमाणे आदर्श पिढी घडविण्याचे काम जे शिक्षक असतात, त्यांनी आपले अमूल्य मत दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुजाण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी पदवीधर मंडळींनी यावेळी मतदानांचा हक्क बजावला. या मतदानांतून मराठी अस्मितेच्या नावाने जनतेला भ्रमिष्ठ करणाऱ्या विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; परंतु कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. खरं तर म्हात्रे हे मूळचे शिवसैनिक. मागील विधान परिषद निवडणूक त्यांनी लढवली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट हे स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

ही जागा भाजपच्या चिन्हावर लढवावी असा आग्रह भाजप नेतृत्वाकडून धरण्यात आला होता. त्यामुळे म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली. पहिला निकाल जाहीर झाला तो म्हात्रे यांचा. ते जाएंट किलर ठरले आणि महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. अँटीइंकम्बसीचा फटका बाळाराम पाटलांना बसला. जुन्या पेन्शन योजनेसारखा मोठा मुद्दा भाजपच्या विरोधात असला तरी भाजपने कोकणात विजय खेचून आणला. खरं तर शिक्षक मतदारसंघाची समीकरणे वेगळी असतात. या निवडणुकीत पक्षापेक्षाही उमेदवाराचे संघटनात्मक काम कायमच निर्णायक ठरते हे या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. म्हात्रे यांनी या मतदारसंघात गेले ६ वर्षं जोरदार मोर्चेबांधणी केली. शिक्षकांची मोठी फौज त्यांनी उभी केली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतदारसंघातील तब्बल ३३ संघटनांचा पाठिंबा म्हात्रेंनी मिळवला. याच जोरावर म्हात्रेंचा दमदार विजय झाला. म्हात्रेच्या विजयामुळे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाला आता मोठेपणा करण्याची संधी मिळणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने सुरुवातीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीची ताकद पाटील यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर तब्बल ६८ हजार ९९९ मते मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते पडली. तांबे हे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्क्याने विजयी झाले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असतानाही शुभांगी पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे यांची किती चालते हे या निकालावरून स्पष्ट झाले.

दुसरीकडे या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या काही चुका सुधारण्यावर भर देत आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले आहे. कारण अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे- पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले ना. गो. गाणार यांचा नागपूरमध्ये झालेला पराभव हाही अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे चाैथ्यांदा आमदार झाले आहेत. शिंदे गटाचे पाच आमदार या मतदारसंघात असताना, काळे यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागेल, असे वाटत होते. त्यात राष्ट्रवादीतील फुटीर उमेदवार निवडणूक रिंगणार असतानाही काळे यांचा विजयाचा मार्ग कोणी रोखू शकले नाही. त्यामुळे भाजपकडून आत्मचिंतनाचा दिलेला सल्ला हा पुढील निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्यास कारणीभूत ठरेल. या निवडणुकीतून ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या छत्राखाली राहून भविष्यात यश मिळेल का? याचा विचार करावा लागणार आहे. कोकणात म्हात्रे यांच्यासारखा जुना शिवसैनिक हा भाजपच्या तिकिटावर विजयी होत असेल, तर आता शिवसैनिकांनाही भाजपशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, असे वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. मातोश्रीच्या चार भिंतीत बसून राजकारण करणे हे पुढील काळात तितकेसे सोपे राहिलेले नाही, हे ठाकरे गटाला कळून चुकेल.