खेळणे कमी झाल्याने मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुलांचा खेळण्याचा वेळ कमी झाला असून टॅब, मोबाईलवर व्यस्त राहिल्याने किंवा सतत टीव्ही पाहिल्याने लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे दिसून येत आहेत. अलिकडील झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडीओ गेम, टॅब किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी संबंधित लक्षणे आढळतात. पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम कमी करतात तेव्हा ही लक्षणे दूर होतात.

हा सिंड्रोम ‘व्हर्च्युअल ऑटिझम’ म्हणून ओळखला जातो किंवा ऑटिझम संगणकाच्या स्क्रीननद्वारे होतो. रोमानियातील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. मारियस झाम्फिर यांनी ‘व्हर्च्युअल ऑटिझम’ या संज्ञेचा शोध लावला. व्हर्च्युअल ऑटिझमचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक ठरते; परंतु मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी मुलाची ऑटिस्टिक लक्षणे तपासून ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा आभासी ऑटिझम दिसून येतेय किंवा कसे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतात ऑटिझमचे प्रमाण वाढत असून यामुळे पालक, शाळा आणि आरोग्यसेवा व्यावसायिकही चिंताग्रस्त झाले आहेत.

पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा हल्लीच्या पिढीतील मुलांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जास्त रस दिसून येतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार वाढलेला स्क्रीन टाईम हा मेलेनोप्सिन-संप्रेषण करणारे न्यूरॉन्स आणि कमी झालेल्या गॅमा-अमिनोब्युटीरिक अॅसिड न्यूरोट्रान्समीटरशी संबंधित आहे. त्यामुळे असामान्य वर्तन, मानसिक आणि भाषिक विकास कमी होतो आणि इतर समस्या जाणवतात. दररोज चार किंवा त्याहून अधिक तास गॅजेट्सचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. आभासी जगात जास्त वेळ घालवल्याने लहान मुलांच्या मेंदूवर दुष्परिणाम होतो. यामुळे बोलण्यात तोतरेपणा येऊ शकतो तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात, असे समोर आले आहे.

खारघरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? अधिकारी म्हणाले…

पनवेल : खारघर आणि परिसरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. यातून फुटपाथही सुटलेले नाहीत. काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी कार्यालये थाटली आहेत. मात्र पनवेल महापालिकेचा अतिक्रमण विभाग त्यावर कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

खारघर नोड हा मोठा परिसर आहे. तेथे अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. पनवेल पालिकेचा अतिक्रमण विभाग तात्पूरती कारवाई करतो. त्यातही बड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप येथील नागरिक करतात. सेक्टर १६ येथे फुटपाथवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले आहे. युफोरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेनेही फुटपाथवर कार्यालय थाटले आहे. सेक्टर ३४ मध्ये पेठ गावाजवळ निळकंठ ग्रुपचे कार्यालयही फुटपाथवर आहे. त्यामुळे फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी आहे की अतिक्रमण करणारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फुटपाथवर ही अतिक्रमणे होईपर्यंत पालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याने पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खारघर येथील अतिक्रमण विभागाचे जितेंद्र मढवी यांना याबाबत विचारले असता त्यांनी पाच जणांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यात त्यांनी स्वतःहून ती हटवली नाहीत तर पालिका ती हटवेल, असे सांगितले.

आशेरी गडावर मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा

पालघर: वनदुर्ग प्रकारात इतिहास प्रसिद्ध असणाऱ्या पालघर तालुक्यातील खडकोना गावाजवळील आशेरी गडावर हौशी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यातील काहीजण मद्यपान करून धिंगाणा घालतात. डहाणू वनविभाग व कासा, मनोर पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आशेरी गडावर येणाऱ्या पर्यटकांमुळे विविध प्रकारचा कचरा वाढला आहे. त्यात प्लास्टिक, विविध खाद्यपदार्थ्यांच्या पाकिटांचे वेष्ठन, मद्याच्या बाटल्या, तसेच फेकून दिलेले जुने कपडेही आढळत आहेत. यामुळे गडावर आगी लागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्याला पालघर, डहाणू वनविभागाची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. पर्यटकांची तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी केंद्र नाही.

गेल्या वर्षी पावसाळ्यात स्थानिक पोलीस प्रशासनाने आशेरी गडावर होणारी बेसुमार गर्दी आवरत मदत करीत असलेल्या दुर्गमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनाच अटक करून कारवाई केली. त्यावेळी गडावर मद्यपान करीत धिंगाणा घालणारे पळून गेले होते. पंचक्रोशीतील तरुणांनी गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. मात्र, शनिवार, रविवारी येणाऱ्या पर्यटकांनी या टाक्यांमधील पाण्यात यथेच्छ उड्या मारून पाणी दूषित केले आहे.

दुर्गमित्र संघटनेचा विरोध

ग्रामपंचायत, पोलीस, वनविभागाने गडावर दारूबंदी, प्लास्टिक बंदी करावी. पर्यटकांसाठी नियम फलक, वनसंरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ठोस पावले उचलावित, अशी मागणी होत आहे. गडावर दारू नेणाऱ्या, गडावर दारू पिणाऱ्या, कर्कश आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या, तोफांवर बसून व उभे राहून छायाचित्रे टिपणाऱ्या, मुख्य पाणवठ्यावर अन्न, मांसाहार शिजवत कचरा करणाऱ्या हौशी पर्यटकांचा दुर्गमित्र संघटना विरोध करीत आहे.

ठाण्यातील जलतरणपटूंची शहिदांना अनोखी मानवंदना

ठाणे (वार्ताहर) : ठाण्यातील साधारणत: ८ ते १७ वयोगटातील १८ जलतरणपटूंनी भल्या पहाटे ४ वाजता धरमतरच्या जेटीवरून पाण्यात झोकून देत तब्बल ९ तासांनी गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहिदांना आणि ठाणेकरांसाठी पितृतुल्य असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांना आगळीवेगळी मानवंदना दिली.

ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलावात सर्वश्री अर्णव पाटील, अमीर साळसकर, जयराज नाखवा, वंशिका आयर, रोहन राणे, अथर्व पवार, सोहम देशपांडे, करण नाईक, मित गुप्ते, मनोमय लिंगायत, अमोल दिवाडकर, स्वरा हंजनकर, रुद्र शिलारी, अपूर्व पवार, गौरी नाखवा, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, श्रीकर पेडणेकर आदी युवा होतकरू जलतरणपटू नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा कसून सराव करतात. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी ३३ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते. प्रत्येकी नऊ जणांचे असे दोन गट तयार करण्यात आले होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी पोहायला सुरुवात केली. प्रत्येकी एक किलोमीटर अंतरानंतर आपल्या पुढच्या सहकाऱ्याला टाळी देत दुपारी १ वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करत मोहीम फत्ते केली.
प्रशिक्षक नरेंद्र पवार म्हणाले की, खुल्या पाण्यातील विशेषतः सागरी जलतरणाच्या स्पर्धा वाढल्या आहेत. त्यामुळे सागरी जलतरणात मुलांना करियर घडवण्याची संधी मिळाली आहे. सागरी जलतरणात मानसिक आणि शारीरिक क्षमतेचीही कसोटी लागते. त्यातून आव्हानाला सामोरे जाण्याची सवय मुलांना व्हावी याकरता ही मोहीम आखण्यात आली होती. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आरती प्रधान यांनी या मोहिमेचे प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम पाहिले.

मुंबई- गोवा महामार्गाचे काम २०२४ पू्र्वी पूर्ण होणार

मुंबई: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम फेब्रुवारी २०२४ पूर्वी पूर्ण केले जाईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या महामार्गाच्या रुंदीकरण आणि सुधारणा कामाच्या अनुपालन अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पहिल्या ४२ किमी लांबीच्या दुरुस्तीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत आणि ४२ ते ८४ किमी लांबीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल असे म्हटले आहे. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारने पनवेल ते इंदापूर हा पट्टा सोडून उर्वरित पट्ट्यातील महामार्ग रुंदीकरणाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. त्याआधीही अनेकवेळा राज्य सरकारने महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या तारखा वारंवार बदलल्या होत्या आणि त्यासाठी न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकार व प्राधिकरणाच्या कामावर समाधान दर्शवत अनुपालन अहवालावर याचिकाकर्ते ओवेस पेचकर यांचे मत विचारले. त्यावर पेचकर यांनी महामार्गाचे बरेच काम पूर्ण केल्याचे मान्य केले. मात्र, सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा

मुंबई: श्रमिक मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र आदी आदिवासी मंच यांच्या माध्यमातून वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला.

मुंबईतील पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. असे असताना विविध प्रकल्पासाठी त्यांच्या शेत जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. त्यांची घरे झोपडपट्टी घोषित करून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेताना आवश्यक ती प्रमाणपत्रे त्यांच्याकडे नसतात. ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने हे आदिवासी हैराण झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आदिवासीं बांधवांनी हा मोर्चा काढला.

सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम

मुरबाड: मुरबाड मधील सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी टेक्निकल इन्स्टिटयूटला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. तब्बल ६ हजार प्रोजेक्ट्समधून त्यांची निवड करण्यात आली. मुंबईमध्ये वरळी एक्सिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. बी. एस मार्शल फाउंडेशनचे संस्थापक बलदेवकृष्ण शर्मा, न्यूक्लियर सायंटिस्ट डॉ. अ. प. जयरामन, रोटरी क्लब वरळीचे अध्यक्ष. सचिन संघवी व आयसीटीचे माजी कुलगुरू जे. बी. जोशी, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या महाविद्यालयातील विद्यार्थी प्राजक्ता गावडे, मानसी शेळके, राहुल विश्वकर्मा व पियुष यादव यांनी हा प्रोजेक्ट तयार केला होता. प्रथम पारितोषिक म्हणून सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह व रुपये १ लाखाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीकांत काकडे प्रा. मोहित जाधव उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठानचे चेअरमन संतोष अनंत देशमुख यांनी कौतुक केले आहे. महाविद्यालयात रिसर्च करणे हि काळाची गरज आहे, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची क्षमता ओळखुन त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम प्राचार्य डॉ. रजनीकांत तु. काकडे सर करत आहेत. तसेच या प्राचार्य शोहेब शेख, प्राचार्य सचिन कोकाटे तसेच इतर सर्व प्राध्यापक वर्गाचेही योगदान लाभले.

सर्वांना परवडतील अशी घरे बांधा

ठाणे : प्रत्येकाला स्वतःचं, चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या परिसरात हक्काचं घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशीही घर बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्यावतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंड चे संदीप माहेश्वरी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन झाले.

ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करणार आहोत. या कनेटिव्हिटीमुळे शहराचा पर्यायाने राज्याचा विकास होण्यास मदत होत आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी सुमारे २ लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होणार…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) चे पहिले दोन टप्पे डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ०६० कोटी खर्चून पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. रस्ता तयार झाल्यावर, मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे.

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यांसारख्या इतर प्रमुख मार्गांवर गर्दी कमी करण्यासाठी गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) ते मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा लिंक रोड महत्त्वाचा ठरेल. हा प्रकल्प चार टप्प्यात विभागला गेला असून त्याची किंमत सुमारे ८ हजार कोटी आहे. संपूर्ण प्रकल्प २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
फेज-१ अंतर्गत, महानगपालिकेने नाहूर रोड ओव्हर ब्रिजचे ७० टक्के काम पूर्ण केले. हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मुलुंड पश्चिम आणि गोरेगाव पूर्व येथील जीएमएलआर रुंदीकरणाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. “दुसऱ्या टप्प्याचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल”, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. बीएमसीने चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) यासाठी ४४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नागरी संस्थेने कामाचा तिसरा टप्पा नुकताच सुरू केला आहे ज्यात गुरु गोविंद सिंग रोड आणि GMLR जंक्शन येथे उन्नत रोटरी बांधणे, गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथे उड्डाणपूल आणि मुलुंड पश्चिम येथील हेडगेवार जंक्शन येथे उड्डाणपूल यांचा समावेश आहे. जानेवारी २०२५ पर्यंत प्रकल्पाचे ७ टक्के काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

बोगदे २०२८ पर्यंत पूर्ण होतील

बॉक्स बोगदा आणि जुळ्या बोगद्यांचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. चौथ्या टप्प्यात मुलुंड पूर्व येथे ऐरोली जंक्शन येथे उड्डाणपूल आणि गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ओलांडून एक अंडरपास बांधणे यांचा समावेश आहे. बोगद्याचे काम सुरू झाल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. कंत्राट दिल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

फेअरनेस क्रीम वापरताय मग किडनी सांभाळा! पाहा त्या मुलीचे काय झाले?

मुंबई: अकोला येथील बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीला तिचा रंग गोरा करण्याचा हट्ट चांगलाच महागात पडला. त्यासाठी ती फेअरनेस क्रिम लावू लागली. तिच्या घरच्यांना तीचा रंग उजळल्याचे दिसू त्यामुळे तेही ती क्रीम वापरु लागले. पण हळूहळू त्यांना अनेक आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागल्या.

अचानक आलेल्या अशक्तपणामुळे त्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. २०२२ च्या सुरूवातीच्या चार महिन्यात तिची किडनी डॅमेज झाल्याचे निदान झाले. मात्र, किडनी का डॅमेज झाली याचा शोध घेतला असता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली.

त्याच्या किडनीच्या समस्येचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना धक्काच बसला. याप्रकरणी केईएममधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाले आणि अकोल्यातील डॉ. अमर सुलतान यांनी त्यावर काम सुरू केले. एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधले, ते म्हणजे मेकअप किटचा वापर.

केईएमच्या आयुर्वेद प्रयोगशाळेत फेअरनेस क्रीमसह विविध वस्तूंची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर डॉ जमाले यांनी निदर्शनास आले की स्किन क्रीममध्ये पारा या शरीरारासाठी अत्यंत धोकादायक असणाऱ्या धातूची पातळी प्रमाणापेक्षा अधिक होती. त्या क्रिममध्ये हे प्रमाण ४६ इतके आढळले, जे ७ पेक्षाही कमी असणे गरेजेचे असते. पारा या घातक धातूचा त्या मुलीसमवेतच तिची आई आणि बहीण हिच्याही किडनीवर परीणाम झाल्याचे उघडकीस आले आहे. तरुणीची आई व बहिण आजारातून बऱ्या झाल्या असल्या तरी ती अजूनही बरी झालेली नाही. २०१४ मध्ये दिल्लीच्या एका विद्यार्थीनीच्या स्किन क्रिममध्येही हा धातू धोकादायक पातळीत आढळला होता.