पालघर: वनदुर्ग प्रकारात इतिहास प्रसिद्ध असणाऱ्या पालघर तालुक्यातील खडकोना गावाजवळील आशेरी गडावर हौशी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यातील काहीजण मद्यपान करून धिंगाणा घालतात. डहाणू वनविभाग व कासा, मनोर पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आशेरी गडावर येणाऱ्या पर्यटकांमुळे विविध प्रकारचा कचरा वाढला आहे. त्यात प्लास्टिक, विविध खाद्यपदार्थ्यांच्या पाकिटांचे वेष्ठन, मद्याच्या बाटल्या, तसेच फेकून दिलेले जुने कपडेही आढळत आहेत. यामुळे गडावर आगी लागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्याला पालघर, डहाणू वनविभागाची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. पर्यटकांची तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी केंद्र नाही.
गेल्या वर्षी पावसाळ्यात स्थानिक पोलीस प्रशासनाने आशेरी गडावर होणारी बेसुमार गर्दी आवरत मदत करीत असलेल्या दुर्गमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनाच अटक करून कारवाई केली. त्यावेळी गडावर मद्यपान करीत धिंगाणा घालणारे पळून गेले होते. पंचक्रोशीतील तरुणांनी गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. मात्र, शनिवार, रविवारी येणाऱ्या पर्यटकांनी या टाक्यांमधील पाण्यात यथेच्छ उड्या मारून पाणी दूषित केले आहे.
दुर्गमित्र संघटनेचा विरोध
ग्रामपंचायत, पोलीस, वनविभागाने गडावर दारूबंदी, प्लास्टिक बंदी करावी. पर्यटकांसाठी नियम फलक, वनसंरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ठोस पावले उचलावित, अशी मागणी होत आहे. गडावर दारू नेणाऱ्या, गडावर दारू पिणाऱ्या, कर्कश आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या, तोफांवर बसून व उभे राहून छायाचित्रे टिपणाऱ्या, मुख्य पाणवठ्यावर अन्न, मांसाहार शिजवत कचरा करणाऱ्या हौशी पर्यटकांचा दुर्गमित्र संघटना विरोध करीत आहे.