Friday, May 3, 2024
Homeक्रीडागुजरात बनी गयू आयपीएल किंग

गुजरात बनी गयू आयपीएल किंग

राजस्थानला लोळवत पदार्पणातच उंचावला जेतेपदाचा चषक

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : कर्णधार, गोलंदाजी आणि फलंदाजी अशा तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरत हार्दीक पंड्याने अंतिम फेरीच्या मेगा मुकाबल्यात रविवारी राजस्थान रॉयलला लोळवत आयपीएल २०२२ च्या विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयामुळे गुजरातने पदार्पणातच अंतिम विजयी होण्याचा कर्तब केला आहे. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरातसमोर विजयासाठी १३१ धावांचे माफक आव्हान होते. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली.

रिद्धीमान साहा, मॅथ्यू वेड स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या २३ असताना हे दोन्ही फलंदाज तंबूत परतले होते. विकेट गमावल्याने गुजरातची धावगती मंदावली. सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार हार्दीक पंड्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. या जोडीने ६३ धावांची आवश्यक असलेली भागीदारी केली. ही जोडी गुजरातला विजयावर शिक्कामोर्तब करणार असे वाटत होते. येथे राजस्थानच्या मदतीला चहल धाऊन आला. त्याने स्लीपला असलेल्या यशस्वीकरवी झेलबाद करत पंड्याला पॅवेलियनचा रस्ता दाखवला. हार्दीक बाद झाल्यामुळे राजस्थानच्या संघात उत्साह संचारला.

परंतु राजस्थानचा हा उत्साह क्षणीकच राहीला. शुबमन गिल आणि डेविड मिलर या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने नाबाद ४५ धावांची कामगिरी केली, तर मिलरने नाबाद ३२ धावा ठोकल्या. त्यामुळे गुजरातने १८.१ षटकांत ३ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी कमालीची गोलंदाजी केली. परंतु त्यांना आपल्या संघाला विजयी करता आले नाही. बोल्टने ४ षटकांत १४ धावा देत १ बळी मिळवला. चहलने ४ षटकांत २० धावा देत १ बळी मिळवला. राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय राजस्थानच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या सलामीवीरांच्या जोडीला फारशी चांगली सुरुवात करता आली नाही. संघाची धावसंख्या ३१ असताना राजस्थानला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला.

जयस्वालने १६ चेंडूंत २२ धावा ठोकल्या. त्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन ही जोडी त्यातल्या त्यात सेट झाली. धावांची गती वाढविण्याची आवश्यकता असतानाच बटलर-सॅमसन जोडी फुटली. नवव्या षटकात सॅमसनचा अडथळा दूर करण्यात गुजरातला यश आले. सॅमसनने अवघ्या अवघ्या १४ धावा केल्या. येथे गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्या संघासाठी धाऊन आला. त्यानंतर जोस बटलरही फार काळ थांबला नाही.

पंड्यानेच यष्टीरक्षक साहा करवी बटलरला झेलबाद करत गुजरातला मोठा बळी मिळवून दिला. त्यानंतर गुजरातच्या फलंदाजीला जी गळती लागली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही. देवदत्त पडिक्कल, शेमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन ही राजस्थानची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली. तळात रियान पराग, ट्रेंट बोल्ट यांनी अनुक्रमे १५, ११ धावा करत थोडीफार धावसंख्या वाढवली. राजस्थानला २० षटकांअखेर ९ फलंदाजांच्या बदल्यात १३० धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्यात कर्णधार हार्दीक पंड्या आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीची धार अधिक होती. हार्दीकने ४ षटके फेकत अवघ्या १७ धावा देत ३ बळी मिळवले. राशिदने ४ षटकांत १८ धावा देत १ बळी मिळवला.

ए.आर. रेहमानचा लाईव्ह परफॉर्मन्स

आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी भव्य क्लोजिंग सेरेमनी पार पडला. यावेळी कार्यक्रमाला ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रेहमानसह अनेक कलाकार उपस्थित होते. रेहमानच्या लाईव्ह परफॉर्मन्सने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडले. विशेषत: त्यांचे प्रसिद्ध गीत वंदे मातरम् या ठिकाणी सादर करण्यात आले. ज्याने पुन्हा एकदा सर्वांचीच मने जिंकली. आयपीएलच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओलाही नेटकऱ्यांची तुफान पसंती मिळली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -