Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखRahul flying kiss: ‘फ्लाईंग किस’ने गेली उरली-सुरली पत

Rahul flying kiss: ‘फ्लाईंग किस’ने गेली उरली-सुरली पत

‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे’ किंवा ‘जित्याची खोड… या म्हणींप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चपखल लागू होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारणही तसेच घडले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नुकत्याच बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसच्या धोरणांवर सडकून प्रहार केले तसेच राहुल गांधी यांना लक्ष्य केले. सरतेशेवटी भाषण संपविताना त्यांनी राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेबाहेर पडून सुमारे अर्ध्या तासांहून अधिक काळ होऊन गेला होता.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी भाषण करत केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केले. भारतमाता ही माझी आई आहे. मणिपूर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केलेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचेच तुकडे केले आहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. सुमारे अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रा, अदानी प्रकरण आणि धगधगत्या मणिपूरला स्पर्श केला आणि राजस्थानच्या दौऱ्यावर जायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आपले भाषण आटोपून लगोलग लोकसभेच्या बाहेर पडणे पसंत केले. तत्पूर्वी लोकसभेतून जाताना त्यांच्या हातातील काही कागदपत्रे खाली पडली. संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी ते खाली वाकले. त्यावेळी भाजप खासदारांनी त्यांच्यावर काही टिप्पणी केली. त्यावर राहुल गांधी यांनी समोरील सत्ताधारी भाजप खासदारांकडे पाहून स्मितहास्य केले आणि फ्लाईंग किसप्रमाणे इशारा केला.

राहुल गांधी या कृतीमुळे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी भाषण आटोपून निघून गेल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलायला उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना लक्ष्य करताना त्यांच्या फ्लाईंग किस प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच या प्रकरणी स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या २२ महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राहुल गांधींचे हे कृत्य केवळ महिलाद्वेषी असल्याचे द्योतक आहे. संसदेत असे कृत्य करणे हे अशोभनीय आहे. राहुल गांधी यांच्या कृत्याने संसदेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे हे नक्की. या आधी असे कृत्य कोणत्याही खासदाराने कधी केलेले नव्हते. लोकसभेचे सभागृह, जिथे महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कायदे केले जातात, तिथेच राहुल गांधी यांचे हे अभद्र वर्तन संपूर्ण देशाने पाहिले आहे. अशा माणसाने सभागृहात पाऊल ठेवताना या सभागृहाची, देशाची, माता – भगिनींची आणि जनतेची प्रतिष्ठा याचे भान ठेवायला हवे होते.

काँग्रेससारख्या दीडशे वर्षे जुन्या अशा पक्षाच्या एका प्रमुख सदस्याचे हे वर्तन अयोग्य आणि असभ्य असेच म्हणायला हवे. अविश्वास प्रस्तावावरील महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली त्याचा योग्य तऱ्हेने वापर करायला सोडून राहुल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने बालिशपणा किंवा गल्लीतील टपोरी मुलाप्रमाणे असभ्य वर्तन करणे म्हणजे त्या पक्षाची, पक्षातील अन्य महिला नेत्यांचीही अप्रतिष्ठा करण्यासारखे आहे. आता या प्रकरणी राहुल गांधींवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावेळी एका अधिवेशनात राहुल गांधी यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोधी यांना मिठी मारली होती आणि डोळे मिचकावले होते. आता या अधिवेशनात राहुल यांच्या फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केला आहे. मोदी आडनावावरून बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने खासदारकी गमावलेल्या पण सुप्रीम कोर्टाकडून तीच खासदारकी पुन्हा मिळवून लोकसभेत दाखल झालेल्या राहुल गांधी यांच्यामागे आता ‘फ्लाईंग किस’चा भुंगा हात धुवून लागू शकतो. त्याचे परिणाम काही दिवसांतच दिसतील हे नक्की. परिणामी मोदी आडनाव प्रकरणाचे वादळ शमले असले तरी राहुल गांधींना आता नव्या वादाला तोंड द्यावे लागणार आहे व त्यांची पंचाईत करण्याची मोर्चेबांधणी सत्ताधारी भाजपने सुरू केली आहे.

‘फ्लाईंग किस’चा मुद्दा काढून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी बाब म्हणजे लोकसभेत २०१९ सालच्या निवडणुकीत राहुल गांधींना धूळ चारणाऱ्या याच इराणी यांनी पुन्हा राहुल यांच्या विरोधातच नवी मोहीम उघडली आहे. त्याचे देशभरात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या नव्या वर्तनामुळे (फ्लाईंग किस) राहुल गांधी यांची उरली- सुरली पतही गेली असेच म्हणायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -