Thursday, May 2, 2024

पहिला दिवस

प्रा. प्रतिभा सराफ

आज व्हीआरएस (VRS)चा पहिला दिवस. सकाळपासून अभिनंदनाचे फोन! त्याचबरोबर काही प्रश्न – ‘मग आता काय करणार?’, ‘आम्हाला आता नवीन कविता ऐकायला मिळणार तर…’ ‘साहित्याला वाहून घेणार का?’, ‘थोडेसे वाचन वाढवा म्हणजे वैचारिक लिहिता येईल!’, ‘कुठे फिरायला जाणार?’, ‘कोणती नवीन नोकरी आहे का डोक्यात?’, ‘आता मित्र-मैत्रिणींसाठी थोडा वेळ देत चला.’ ‘रिटायर्ड माणसाचा आयुष्य फारच बोअरिंग असतं… माझा अनुभव आहे ना!’, ‘आता व्यायामाचा कंटाळा करायचा नाही.’ ‘कधीही करा पण मेडिटेशन कराच!’, ‘निवृत्तांनी प्राणायाम केलेच पाहिजे!’, ‘थोडे गावाकडं जाऊन या… खूपच रिलॅक्सिंग वाटतं’, ‘वेळच्या वेळी जेवा.’, ‘थोडं कलेत मन गुंतवा नाहीतर डिप्रेशन येतं.’, ‘सतत मोबाइल पाहत नका बसू… त्यानेही मानसिक स्थिती बिघडते’, ‘आता फक्त आराम करायचा’, ‘उगाच घरातल्यांशी भांडू नका.’ ‘निवृत्तांना कोणी भाव देत नाही.’ ‘आता मित्र-मैत्रिणी वाढवायला हवेत…’, ‘बागेत जाऊन बसा खूप लोक भेटतात. आपल्यासारखे समदुःखी असतात… आपल्याला त्याने समाधान मिळते.’, ‘नामस्मरण केलेच पाहिजे.’ ‘जगभ्रमंती करा.’ ‘अष्टविनायकाला जाऊन या.’ ‘जवळपासचे देवदेव केव्हाही करता येतील, जरा चारधाम करून या… नंतर इच्छा असली तरी हात-पाय साथ देत नाहीत.’ ‘मसाज घ्यायलाच हवा नाहीतर गुडघे जातात.’ ‘रिकामटेकडा माणूस उगाचच खूप चहा पितो तो कमी करायला हवा किंवा त्यातली साखर तरी वर्ज करायला हवी.’ ‘चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही’, ‘निवृत्त माणसाने थोडेसे समाजकार्य केलेच पाहिजे!’, ‘आता पगार नाही पेन्शन मिळणार त्यामुळे पैसे सांभाळून वापरा.’ ‘कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा.’

खूप सल्ले मिळाले. शांतपणे ऐकून घेतले. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी त्यांचे समाधान झालेच असे नाही पण एक माणूस नेमकं काय काय कळणार? हे सगळं करायचं म्हणजे तर नोकरीपेक्षा पण जास्त बिझी आयुष्य झालं.

सकाळपासून विचार करत आहे. काहीतरी प्लॅन करायला हवे. काटेकोरपणे जगायला हवे. मग मनात विचार आला, जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा घड्याळाच्या काट्यावर चालत होतो. आता परत तेच करायचं का? मग व्हीआरएस कशासाठी घेतली? आता सकाळी केव्हा उठायचं म्हणजे अलार्म न लावता जेव्हा जाग येईल तेव्हा! त्यासारखा वेगळा आनंद नाही आणि दुसरं म्हणजे दुपारी जेवल्यावर निवांत झोपायचं. वाह…!

सकाळी नाष्ट्यानंतर पूर्ण पेपर वाचला म्हणजे कोपरा आणि कोपरा अगदी जाहिरातीपासून क्रीडा क्षेत्रातील बातम्यांपर्यंत सगळेच. कितीतरी दिवसांनी असा पेपर वाचत होते. बरे वाटले.

बाकी काही नाही पण कॉलेजचे विद्यार्थी आसपास असणार नाहीत. त्यांचा खळखळता उत्साह ज्याने आजपर्यंत मला कधी वयस्कर होऊ दिलं नाही या महत्त्वाच्या गोष्टीची कमतरता मात्र आयुष्यभर जाणवेल!

शेवटच्या दिवशी एक विद्यार्थी म्हणाला, ‘आमची बॅच झाल्यावर का नाही तुम्ही निवृत्ती घेतलीत?’ बस एवढे एकच वाक्य हेच माझ्या आयुष्याचे संचित!

आणखी एक म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेले बेकार तरुण, ज्यांच्यापैकी एकाला माझ्या जागी नोकरी मिळेल. त्याचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होईल, याक्षणी हा आनंद मला फार महत्त्वाचा वाटतो!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -