Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरविहीरीला पडल्या भेगा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

विहीरीला पडल्या भेगा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लालोंडे ग्रामपंचायतीचे गवळी पाड्याकडे दुर्लक्ष

संदीप जाधव

बोईसर : पालघर तालुक्यातील लालोंडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गवळी पाड्यातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे विहीर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पण यावर्षी पावसाळा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असले तरी ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. या विहिरीला भेगा पडल्या असून गावकऱ्यांना घाबरत पाणी भरावे लागते; मात्र ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

गवळी पाड्यातील लोकसंख्या दोनशे ते अडीचशे च्या जवळपास आहे. त्या गावाला ग्रामपंचायतीमार्फत एक बोरवेल देण्यात आला आहे. त्यातुन काही घरापर्यंत नळ योजना केली आहे. तर अनेक वर्ष जुनी असलेली एक विहीर पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने कित्येक वर्षापासून या पाड्यातील नागरिक गावालगत असलेल्या जुन्याच विहिरीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत.

पण विहिरीचे बांधकाम अत्यंत जुने असल्याने विहिरीच्या कठड्याला पूर्णतः भेगा पडलेल्या आहेत. विहिरीचे कठडे पुर्णतः जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी कठड्याला पडलेल्या भेगांतून विहिरीत जाते. त्यामुळे विहिरीतील पाणी सुद्धा गढूळ होऊन पिण्यायोग्य राहत नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.

गवळीपाडा येथील ग्रामस्थानी ग्रामपंचायत कडे वारंवार तक्रारी करून सुद्धा विहिरीची दुरुस्ती करण्यात आली नाही. किमान पावसाळा सुरू होण्यापूर्वी विहिरीची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा ग्रामपंचायत विरुद्ध गावकऱ्यांचा आक्रोश पहावयास मिळणार आहे अशी गवळी पाडा येथील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

गावालगत असलेली विहीर कित्येक वर्षापासून जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीला वारंवार विनंती केल्यानंतरही याकडे पुर्णतः दुर्लक्ष आहे.

ग्रामपंचायतीमार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शासनाकडून नीधी उपलब्ध नाही. तरीही दात्यांकडून मदत घेवुन लवकरात लवकर विहिरीचे बांधकाम पुर्ण करण्यात येईल.– अदिती अविनाश तांडेल. सरपंच लालोंडे

वाड वडीलांपासून या विहिरीतील पाणी या पाड्यातील नागरीक पित आहेत. आज विहिरीची जीर्ण अवस्था झाली काही दिवसांत विहिरीसह विहिरीची जागाही चोरीला जाण्याची शक्यता आहे. गावातील कोंडवाडे, तलाव, स्मशान भूमी यांची जागा गायब झाली आहे. त्यामूळे या विहिरीला तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.– रोशन गवळी. ग्रामस्थ गवळी पाडा लालोंडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -