Friday, July 5, 2024
Homeक्रीडाIPL 2024राजस्थानचा रोमांचक विजय

राजस्थानचा रोमांचक विजय

चेन्नईवर ३ धावांनी मारली बाजी

चेन्नई (वृत्तसंस्था) : जोस बटलरच्या अर्धशतकाला अश्विन, चहल आणि संदीप शर्मा यांच्या अप्रतिम गोलंदाजीची मिळालेली जोड यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर अवघ्या ३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. धोनी आणि जडेजा यांच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर रॉयल्सने बाजी मारली. राजस्थान रॉयल्सचा हंगामातील तिसरा विजय असून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

राजस्थानने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईच्या फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडला स्वस्तात माघारी धाडण्यात रॉयल्सना यश आले. अवघ्या ८ धावा करून ऋतुराज तंबूत परतला. संदीप शर्माने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. देवॉन कॉनवे आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे यांनी चेन्नईचा डाव सावरत त्यांना सुस्थितीत आणले. फटकेबाजी करत असलेल्या रहाणेला अश्विनने पायचित करत रॉयल्सना दुसरा बळी मिळवून दिला. रहाणेने १९ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा फटकवल्या. त्यानंतर कॉनवेही फार काळ थांबला नाही. अर्धशतकाची बॅट उंचावल्यानंतर कॉनवेला एकही धाव जोडता आली नाही. येथे चहल राजस्थानच्या मदतीला धावून आला. कॉनवे बाद झाल्यानंतर मात्र चेन्नईच्या फलंदाजीची घसरगुंडी झाली. शिवम दुबे, मोईन अली आणि अंबाती रायडू यांचा पाय मैदानात स्थिरावलाच नाही. त्यामुळे धावा आणि चेंडू यांतील अंतर वाढत गेले. त्यानंतर मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी विस्फोटक फलंदाजी करत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणला. शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता असताना धोनीने दोन षटकार लगावत सामना रोमांचक स्थितीत आणला. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी संदीप शर्माने आपल्या ताफ्यातील अस्त्र यॉर्कर चेंडू फेकत धोनीला मोठा फटका लगावण्यापासून रोखले आणि रॉयल्सने ३ धावांची विजय मिळवला. अश्विन आणि चहल राजस्थानसाठी फायदेशीर गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. संदीप शर्माने निर्णायक षटकात चांगली गोलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

जोस बटलरच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात १७५ धावांपर्यंत मजल मारली. बटलरने ३६ चेंडूंत संघातर्फे सर्वाधिक ५२ धावा तडकावल्या. त्यात १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. देवदत्त पडिक्कलने ३८ धावांचे योगदान दिले. रविचंद्रन अश्विनने ३०, तर शिमरॉन हेटमायरनेही नाबाद ३० धावा फटकवल्या. अश्विन आणि हेटमायरने जमवलेल्या धावांमुळे राजस्थानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आले. हेटमायरने हाणामारीच्या षटकांत २ चौकार आणि २ षटकार मारत १८ चेंडूंत नाबाद ३० धावा जमवल्या. त्यामुळे संघाच्या धावसंख्येचा वेगही चांगलाच वाढला. चेन्नई सुपर किंग्जच्या रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीने राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच रोखले होते. जडेजाने ४ षटकांत २१ धावा देत २ बळी मिळवले. आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनीही प्रत्येकी २ विकेट मिळवल्या, परंतु त्यांना धावा रोखण्यात यश आले नाही. मोईन अलीने एक विकेट मिळवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -