Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमी“गुंतवणुकीचे साम्राज्य आणि सहा वर्षे”

“गुंतवणुकीचे साम्राज्य आणि सहा वर्षे”

”गुंतवणुकीचे साम्राज्य” ही शेअर मार्केटवरील लेखमाला आणि सर्व वाचक गुंतवणूकदार यांच्यामध्ये एक वेगळेच नाते तयार झालेले आहे. पूर्वी प्रत्येक शनिवारचा “प्रहार” हा पेपर आणि त्यामध्ये “गुंतवणुकीचे साम्राज्य” सदर हे आज एक समीकरणच झालेले होते. या शेअर मार्केटवरील लेखमालेला सहा वर्षं पूर्ण होऊन सातवे वर्षं सुरू आहे. जानेवारी २०१८ नंतर वाचकांच्या आग्रहास्तव ही लेखमाला शनिवारऐवजी दर सोमवारी प्रकाशित होऊ लागली. या सहा वर्षांचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

“शेअर बाजार” हा विषयच प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी आवडीचा असतो. या शेअर बाजाराने आजपर्यंत अनेकांना शेअर्स गुंतवणुकीतून अत्यंत चांगला फायदा मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पदरी कायम निराशा देखील पडलेली आहे. शेअर बाजारावरील या लेखमालेतून प्रत्येक आठवड्याला दर सोमवारी “गुंतवणुकीचे साम्राज्य” ह्या सदरातून मी आपणाला भेटत असतो. “गुंतवणुकीचे साम्राज्य” या सदराची सुरुवात दिनांक १६ जुलै २०१६ ला प्रहारच्या कोकण आवृत्ती “रत्नागिरी” आणि “सिंधुदुर्ग”मधून झाली. दिनांक २० मे २०१७ पासून हे सदर मुंबई सोबत सर्व आवृत्तीत प्रकाशित होऊ लागले. आजपर्यंत हे सदर सातत्याने वाचणाऱ्या जुन्या वाचक गुंतवणूकदारांना माझ्या या लेखमालेतून निश्चितच चांगला फायदा झालेला असेल.

नवीन वाचक वर्गाला या लेखामालेविषयी सांगायचे झाल्यास या लेखमालेत आपण शेअर बाजाराची साप्ताहिक तसेच अल्प आणि मध्यम मुदतीसाठी दिशा काय आहे?, सध्या चालू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, कमोडीटी मार्केटमध्ये सोने, चांदी आणि कच्चे तेल यांची साप्ताहिक दिशा काय आहे? निर्देशांकाच्या एका आठवड्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या पातळ्या कोणत्या आहेत, नजीकच्या काळात येणारे आय.पी.ओ, कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल आणि त्यासोबत गुंतवणूक करण्यासाठी अल्पमुदत, मध्यममुदत तसेच दीर्घमुदतीसाठी कोणत्या कंपन्या या टेक्निकल अॅनालिसिसनुसार तेजीत आहेत हे सांगत असतो. उदाहरण म्हणून पाहायचे झाल्यास लेखमालेच्या ३० जुलै २०१६ च्या लेखात हॅवल्स इंडिया हा शेअर ३९० रुपये किमतीला असतानाच आपल्या लेखमालेतून मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी खरेदी योग्य म्हणून सुचविला गेला. आज सहा वर्षांनंतर या शेअर्सची किंमत १२३६ रुपये झालेली आहे. आपण सांगितल्यानंतर तब्बल ३०० टक्क्यांची “महावाढ” या शेअरने केवळ सहा वर्षांत दिलेली आहे. या सोबत आपण “अदानी एन्टरप्रायजेस” हा शेअर १४१ रुपये किमतीला असतानाच आपल्या लेखमालेतून मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी खरेदी योग्य म्हणून सुचविला गेला. त्यानंतर या शेअरने इतिहास घडवला आहे. आपण सांगितल्यानंतर या शेअरने महावाढ दाखविली आहे. सध्या हा शेअर ४००० रुपये किमतीला आहे. याशिवाय आपण लेखमालेतून सांगितलेले अनेक शेअर्सनी अपेक्षित मोठी वाढ दिलेली आहे. निर्देशांकाच्या बाबत सांगायचे झाल्यास निर्देशांक सेन्सेक्स २९६४८ आणि निफ्टी ९१६० ला असताना १८ मार्च २०१७ च्या माझ्या “गुंतवणुकीचे साम्राज्य” या सदरातील लेखात निर्देशांकाची दिशा ही तेजीची झालेली असून निर्देशांकानी दीर्घमुदतीसाठी महातेजीचे संकेत दिलेले आहेत हे सांगितलेले होते.

आपल्या या लेखानंतर पुढील २ वर्षांतच निर्देशांक सेन्सेक्सने २९६४८ पासून ४०३१२ निफ्टीने ९१६० पासून १२१०३ आणि बँकनिफ्टीने २११७५ पासून ३१७५२ पर्यंत मजल मारली. सध्या निफ्टीने १८००० चा टप्पा पार केलेला आहे, तर सेन्सेक्स ६१००० च्या वर आहे. याशिवाय आजपर्यंतच्या सहा वर्षांच्या या प्रवासात प्रत्येक साप्ताहिक लेखमालेतून अल्प, मध्यममुदतीसाठी एल.आय.सी. हौसिंग फायनान्ससोबतच हॅवल्स इंडिया, पिडीलाईट इंडस्ट्रीज, नवनीत एज्युकेशन लिमिटेड, ट्रायडेंट लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा केमिकल, अदानी एन्टरप्रायजेस, कल्पतरू पॉवर, एचडीएफसी बँक, जिलेट इंडिया, हेडेलबर्ग सिमेंट, झायद्स वेलनेस, एडेलवाइज, ब्रिटानिया सनफार्मा, एचडीएफसी बँक, कोलगेट, मॅरिको लिमिटेड, प्रॉक्टर अँड गॅम्बल, एचडीएफसी एएमसी यांसह अनेक शेअर्स अल्प, मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी गुंतवणुकीस सुचविले गेलेले आहेत.

प्रत्येक लेखात आपण शेअर्सशिवाय कमोडीटी मार्केट आणि करन्सी मार्केटबद्दल देखील सांगत असतो. यामध्ये आपण आपल्या १८ फेब्रुवारी २०१९ च्या लेखात सोन्याने दिले महातेजीचे संकेत हे सांगितलेले होते. मी टेक्निकलदृष्ट्या बांधलेला अंदाज अचूक ठरवत सोन्याने केवळ ४ महिन्यांत महातेजी दाखविलेली होती.

यापुढे देखील या लेखमालेतून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न राहील. आजपर्यंत या सदराला मिळालेले प्रेम, येत असलेले असंख्य ईमेल, थेट संभाषणामार्फत होत असलेले कौतुक आणि या सदरावरील आपला विश्वास यापुढे देखील असाच कायम राहील, अशी आशा आहे. निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून निर्देशांकांची गती ही देखील तेजीची झालेली आहे. निर्देशांक सेन्सेक्सची ६०००० आणि निफ्टीची १८००० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहेत. तोपर्यंत निर्देशांकामधील तेजी कायम राहील. शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवून तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

कमोडीटी मार्केटचा विचार करता अल्पमुदतीच्या चार्टनुसार सोने या धातूची दिशा ही तेजीची आहे. जोपर्यंत सोने ५१००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत ही तेजी अशीच टिकून राहील. सध्या निर्देशांकामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे. फंडामेंटल अॅनालिसिसनुसार निर्देशांकांचे पी. ई. गुणोत्तर जास्त आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना कमीत कमी जोखीम घेऊनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सर्व भांडवल एकाच शेअर्समध्ये घालू नये. तेजीत असणारे शेअर्स निवडून त्यामध्येच गुंतवणूक करावी. गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. शुक्रवारी निर्देशांक सेन्सेक्स ६१७९५ आणि निफ्टी १८३४९ अंकांना बंद झालेले आहेत.

-डॉ. सर्वेश सोमण

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -