Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वEconomic recession : मंदी दाटतेय...

Economic recession : मंदी दाटतेय…

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

आर्थिक क्षेत्रातील मरगळ आणि मंदीचा फटका हळूहळू विविध क्षेत्रांना जाणवू लागला आहे. यामुळे अनेकजणांना नोकरकपातीला तोंड द्यावे लागल्याचे चित्र अलिकडे समोर आले. याच सुमारास बदलत्या आर्थिक समीकरणांमुळे इंधन दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दखलपात्र वृत्ताबरोबरच खादीच्या वस्तूंच्या विक्रीत ३३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले.

जगभर चर्चेत असलेल्या आणि चिंतेचे कारण बनलेल्या मंदीचा परिणाम हळूहळू अनेक क्षेत्रांमध्ये पहायला मिळू लागला आहे. यामुळे अनेकांना नोकरकपातीला तोंड द्यावे लागल्याचे चित्र अलिकडे समोर आले. याच सुमारास बदलत्या आर्थिक समीकरणांमुळे इंधन दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दखलपात्र वृत्ताबरोबरच खादीच्या वस्तूंच्या विक्रीत ३३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

नोकरीच्या संधी उपलब्ध होणे ही बाब अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात नवीन नियुक्त्यांमध्ये सुमारे सात टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.फाउंडइट हा एक टॅलेंट प्लॅटफॉर्म आहे. त्यातर्फे आशिया आणि मध्य पूर्वेतील अनेक भागांमध्ये काम केले गेले आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन नोकऱ्यांमध्ये सात टक्क्यांनी घट झाली असली, तरी छोट्या शहरांमधील नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अहमदाबाद, जयपूर यासारख्या टीयर-२ शहरांमध्ये नोकरभरतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील उद्योगांमध्ये चार टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. आर्थिक मंदी हे या घसरणीमागील मुख्य कारण आहे. जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे देशातील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासोबतच आपला खर्च कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी नोकरभरतीची प्रक्रिया काही काळासाठी कमी केली किंवा थांबवली आहे. अशा स्थितीत देशातील नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवर त्याचा परिणाम होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात नोकरभरतीत घट झाली असली तरी काही क्षेत्रे अशी आहेत, ज्यामध्ये नोकरभरतीत वाढ झाली आहे. एकूण १३ क्षेत्रांचा मागोवा घेतल्यानंतर आढळून आले आहे की एचआर आणि अॅडमिन अशा तीन क्षेत्रांपैकी एक आहे, जेथे मे महिन्यात भरतीमध्ये एकूण आठ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, विक‘ी आणि व्यवसाय विकास, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातही भरतीमध्ये वाढ झाली आहे. सागरी उद्योगातही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी मे महिना चांगला राहिला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या क्षेत्रातील एकूण नोकरभरतीत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढती महागाई, वाढलेले व्याजदर आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाले आहे.

बंगळुरुसारख्या शहरात नोकरभरतीत २४ टक्क्यांची घट झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. दुसरीकडे, अहमदाबादमध्ये सर्वाधिक लोकांना नवीन नोकऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय चंदीगड, कोलकाता, बडोदा आणि कोची या शहरांमध्येही नोकरभरतीत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरभरतीत बडोद्यात सात टक्के तर कोईम्बतूरआणि कोचीमध्ये दोन टक्के घट झाली आहे. कोलकातामध्ये हा आकडा जवळपास १६ टक्के आहे. ‘बायजू’च्या सेल्स आणि मार्केटिंग टीमला कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा दावा ‘मॉर्निंग काँटेक्स्ट’ने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. ‘बायजू’च्या या निर्णयाचा फटका अनेक विभागांना बसल्याचे ‘मिंट’च्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक मंदीच्या शक्यतेदरम्यान अनेक भारतीय युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीला स्टार्टअप कंपन्यांना निधीची कमतरता (स्टार्टअप फंडिंग विंटर) भेडसावत आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांनी आपल्या खर्चात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १०० हून अधिक युनिकॉर्न कंपन्यांनी त्यांच्या मूल्यमापन बजेट २०२३ (स्टार्टअप कंपन्यांचे मूल्यांकन बजेट) मध्ये मोठी कपात केली आहे. अशा परिस्थितीत कपातीनंतर कर्मचाऱ्यांना मूल्यांकनातही कपातीचा सामना करावा लागणार आहे. या वर्षी दहापैकी जवळपास तीन युनिकॉर्न्सने पगारवाढीसाठी किमान ते शून्य बजेट ठेवले आहे. आघाडीच्या पाच भारतीय कंपन्यांनीही किमान शून्य मूल्यांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारवाढीचा दर २०२२ मध्ये १२.४ टक्क्यांवरून ८.२ टक्क्यांवर आला आहे. स्टार्टअप कंपन्यांनी कोरोनाच्या काळात जास्त काम केले होते. यानंतर जागतिक मंदीच्या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यापासून माघार घेतली. त्यामुळे स्टार्टअप फंडिंगमध्ये मोठी घट झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार २०२२ मध्ये अनेक स्टार्टअप कंपन्यांनी देशभरातील २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दुसऱ्या एका वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले आहेत. गेल्यावर्षी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले होते; पण तरीही भारतात इंधनाचे दर वाढवण्यात आले नव्हते. यामुळे तेल कंपन्यांना नुकसान सोसावे लागत होते. तेलाचे दर स्थिरावल्यावरही इंधनाचे दर कमी करण्यात आले नाहीत. कारण तेल कंपन्या आपले नुकसान भरून काढत होत्या. आता या नुकसानाची वसुली बर्यापैकी पूर्ण झाली आहे.तसेच, तेल कंपन्यांचा ताळेबंदही नफ्यात आला आहे.म्हणूनच येत्या काही दिवसांमध्ये तेलाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या सूचना तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तेल कंपन्यादेखील पेट्रोलआणि डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या विचारात आहेत. जागतिक बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच कंपन्यांचा तोटादेखील भरुन निघाला आहे. अशातच तेल कंपन्यांना मागील तिमाहीमध्ये चांगला फायदा झाला आहे. याशिवाय तेल कंपन्यांना विक्रीतूनही नफा होत आहे. सर्वसामान्य नागरिकांनाहीनफ्याचा फायदा मिळावा यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ब्रेंट क्रूड तेल ०.१६ टक्क्यांनी वाढून प्रतिपिंप ७६.९० डॉलर एवढ्या किमतीला विकले जात आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क‘ूड ऑईल ०.०४ टक्क्यांनी घसरून प्रतिपिंप ७२.५० डॉलरला विकले जात आहे.

दरम्यान, एक आनंदवार्ताही पुढे आली. अलीकडच्या काळात खादीसंबंधित उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. परिणामी, ग्रामीण भागामधील कारागीरांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये मागील नऊ आर्थिक वर्षांमध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचा व्यवसाय सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचा होता. २०२२-२३ मध्ये तोच व्यवसाय एक लाख चौतीस हजार ६३० कोटी रुपयांपर्यंत वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः खादी आणि संबंधित उत्पादनांचे मोठे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. ‘खादी ग्रामोद्योग विकास महामंडळा‘च्या उत्पादनांचा व्यवसाय प्रथमच एक लाख ३४ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाने नोकरीच्या ग्रामीण भागात नऊ लाख चोपन्न हजार ८९९ संधी निर्माण केल्या आहेत. खादी आणि संबंधित उत्पादने लोकप्रियतेच्या नवीन शिखरावर पोहोचली असल्याचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार म्हणाले. जगातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये खादी उत्पादनांची गणना केली जाते. २०१३-१४ ते २०२२-२३ या नऊ आर्थिक वर्षांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीमध्ये ३३२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यावरून, स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांसाठी आवाज उठवणार्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर असणारा नागरिकांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. परिणामी, २०१३-१४ या आर्थिक वर्षात खादी आणि संबंधित वस्तूंचे सुमारे २६ हजार कोटी रुपये असलेले उत्पादन २०२२-२३ या आर्थिक वर्षात २६८ टक्के वाढीसह ९५ हजार ९५७ कोटी रुपयांवर पोहोचले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -