Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीDhule Loksabha : धुळ्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य कायम

Dhule Loksabha : धुळ्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य कायम

काँग्रेसची गटबाजी भाजपाला पोषक

धुळे : लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) पहिला टप्पा पार पडला तरी अजून मविआतील घटक पक्षांमध्ये काही बाबतींत धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमध्ये (Congress) धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे सुरु झालेले नाराजीनाट्य अजूनही कायम आहे. काँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर ही दोन नावे चर्चेत असताना काँग्रेसने नाशिकमधील डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असून ते मेळाव्यांकडे पाठ फिरवत आहेत.

एकीकडे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे मेळावे होत आहेत, मात्र काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले असून जोपर्यंत स्थानिक उमेदवार दिला जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तसंच त्यांनी मेळाव्यांकडेही पाठ फिरवली आहे. दुसरीकडे पक्षाच्या नेतृत्वावर आपला विश्वास असून आपली उमेदवारी निश्चित जाहीर होईल, असा विश्वास काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे धुळ्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे.

उमेदवारावर नाही, तर पक्षावर नाराजी

शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होणारा विरोध ही काँग्रेससाठी मोठी अडचण आहे. ‘पक्षाने कुठल्याही सभेच्या माध्यमातून ही उमेदवारी दिलेली नसून आपला राग हा पक्ष नेतृत्वावर आहे. आपली नाराजी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठ आपल्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत निश्चित विचार करतील’, असा विश्वास श्याम सनेर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसची गटबाजी भाजपाला पोषक

एकीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच पक्षांतर्गत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली गटबाजी ही भाजपाला विजयासाठी पोषक वातावरण निर्माण करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -