Friday, July 5, 2024
Homeक्रीडाIPL 2024चेन्नईचा सुपर विजय, हैदराबादवर ७ विकेट राखून सरशी

चेन्नईचा सुपर विजय, हैदराबादवर ७ विकेट राखून सरशी

चेन्नई (वृत्तसंस्था) : रवींद्र जडेजासह गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला अवघ्या १३४ धावांवर रोखत सहज विजय मिळवला. फलंदाजीत देवॉन कॉनवेने नाबाद ७७ धावांची फटकेबाजी करत चेन्नईचा विजय सोपा केला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २९व्या सामन्यात हैदराबादने दिलेल्या १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे यांनी दमदार सलामी दिली. या जोडगोळीने ८७ धावांची भागिदारी केली. ऋतुराजने ३५ धावा जमवल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू हे स्वस्तात माघारी परतले असले तरी देवॉन कॉनवेने नाबाद ७७ धावा तडकावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने १८.४ षटकांत ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने २ विकेट मिळवले. त्यांचे अन्य गोलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले.

तत्पूर्वी रवींद्र जडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादच्या संघाची दाणादाण उडाली. अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्येचा पल्ला पार करत आला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. रविंद्र जडेजाने तीन विकेट घेत हैदराबादचे कंबरडे मोडले. हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंत मजल मारू शकला. हॅरी ब्रूक आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. पण हॅरी ब्रूकला आकाश सिंहने तंबूत धाडले. हॅरी ब्रूक याने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले.

हॅरी ब्रूक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरला. दोघांनी चांगली भागिदारीही केली. ही जोडी जमली असे वाटत असतानाच रवींद्र जाडेजाने लागोपाठ दोन विकेट घेतल्या. जडेजाने आधी अभिषेक शर्माला रहाणेकरवी झेलबाद केले. अभिषेक शर्माने २६ चेंडूंत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीही लगेच तंबूत परतला. त्यानंतर हैदराबादचे फलंदाज मैदानात टिकू शकले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -