Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलCarbon Dioxide : कर्बवायू

Carbon Dioxide : कर्बवायू

  • कथा : प्रा. देवबा पाटील

हवेत कार्बन डायऑक्साईड अत्यल्प असतो. त्याला कर्बवायू किंवा कर्बाम्ल वायू अथवा कर्बद्विप्रणील वायू असे म्हणतात. त्याला रंग व वास नाही. तो पाण्यात विरघळतो व त्याची चव आंबट आहे. तो निळा लिटमस पेपर तांबडा करतो. तो विषारी असतो.

आपले वातावरण हा रसायनशास्त्रातील पाठ देशमुख सर दहा दिवसांपासून ज्ञानवर्धिनी शाळेतील आठव्या वर्गातील मुला-मुलींना दर तासाला शिकवत असायचे. मुले-मुलीही सरांचे शिकवणे मनापासून ऐकत होते व समजूनही घेत होते. नेहमीप्रमाणे त्यांची हजेरी घेऊन झाली नि मुलांनी प्रश्नांना सुरुवात केली.

“सर, हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अत्यल्प असते असे आपण म्हणालात. त्याचे गुणधर्म काय आहेत सर?” सुरेंद्र म्हणाला.

“हो. हवेत कार्बन डायऑक्साईड अत्यल्प असतो. त्याला कर्बवायू किंवा कर्बाम्ल वायू अथवा कर्बद्विप्रणील वायू असे म्हणतात.” सर म्हणाले, “हा कर्बवायू हवेहून जड असून त्याला रंग व वास नाही. तो पाण्यात विरघळतो व त्याची चव आंबट आहे. तो निळा लिटमस पेपर तांबडा करतो. तो विषारी असतो.”

“सर, हाच कर्बवायू चुन्याची निवळी पांढरी करतो ना?” मध्येच जितेंद्राने विचारले.

“हो, बरोबर आहे.” सर पुढे म्हणाले, “तो ज्वलनशीलही नाही व ज्वलनास मदतही करत नाही; परंतु मॅग्नेशिअमची तार मात्र त्यासोबत जळते. त्याला थंड केल्यास त्यापासून कोरडा बर्फ बनतो. तो पाण्यात मिसळता त्यापासून कार्बनिक आम्ल बनते.”

“तो कसा निर्माण होतो सर?” चंदाने प्रश्न केला.

सर म्हणाले, “तो कोळशाच्या ज्वलनापासून निर्माण होतो. तसेच सेंद्रिय पदार्थ, वाहनांची इंधने यांच्या ज्वलनानेही निर्माण होतो.”

“तो हवेत वाढल्यास अपायकारक असतो ना सर? मग त्याचा मानवास काय फायदा होतो?” नंदाने विचारले.

सर सांगू लागले, “होय तो जरी वातावरणात अत्यल्प असतो तरी त्याचे हवेत ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण वाढले तर तो आरोग्यास अपायकारक असून प्राण्यांचे जीवन खराब करतो; परंतु तो सजीवांच्या विकास व हवामानासाठी महत्त्वाचा असतो. तो वनस्पतींसाठी प्रकाशसंश्लेषण क्रियेत त्यांचे अन्न बनविण्यासाठी खूपच उपयोगी पडतो व त्या वनस्पती खाऊनच माणूस जगतो. असा तो मानवासही अप्रत्यक्षरीत्या कामाचा आहेच. तसेच तो अग्निशामक उपकरणांतही वापरतात. द्रव वा बर्फरूपात त्याचा शीतकपाटात वापर केला जातो.”

“त्याचा बर्फ कसा बनवतात सर?” नंदाने प्रश्न केला.

“कार्बन डायऑक्साईडला गोठूवन त्याचा बर्फ तयार करतात. त्यालाच कोरडा बर्फ असे म्हणतात.” सरांनी उत्तर दिले.

“सर, हायड्रोजनची काय विशेषत: आहे?” वीरेंद्राने प्रश्न केला.

“हायड्रोजन अर्थात उद्जन वायूची विशेषत: म्हणजे आवर्त सारणीत त्याचा पहिला नंबर आहे व सूर्यामध्ये तो विपुल प्रमाणात आहे. त्याला रंग, वास व चव मुळीच नाही. तो जरी पाण्यात विरघळत नाही तरी ऑक्सिजनसोबत त्याचे पाणी बनते. हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाणी बनते. तो उदक म्हणजे पाणी तयार करतो म्हणूनच त्याला उद्जन वायू असे म्हणतात. सरांनी सांगितले.”

“तो कसा तयार होतो सर?” मंदाने प्रश्न काढला.

“हायड्रोजन हा गंधकाम्ल व जस्त यांपासून तयार होतो. तसेच तो पाण्यात विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने पाण्याचे विद्युत विघटन करूनही तयार करता येतो. तो स्वत: ज्वलनशील असून प्राणवायूसोबत त्याचा काही ठरावीक क्रियांमध्ये स्फोट होतो. ज्वलनास मात्र तो मुळीच मदत करत नाही; परंतु तो प्राणवायूला मात्र खलास करतो. म्हणूनच तोही हवेत अत्यल्प प्रमाणातच असतो. सरांनी स्पष्टीकरण दिले.” “मग याचा उपयोग काय होतो सर?” धर्मेंद्राने विचारले. सर म्हणाले, “हायड्रोजन हा हवेहून हलका असल्याने त्याचा उपयोग त्याला फुग्यांत भरण्यासाठी केला जातो. तसेच तेलाचे रूपांतर खोट्या तुपात करण्यासाठीसुद्धा हायड्रोजन वापरतात.” एवढ्यात रोजच्या प्रमाणे तो तास संपला व सरांनी आपले हजेरीपुस्तक उचलले, दुसऱ्या वर्गाकडे जाण्यासाठी निघाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -