Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमला हिंदू म्हणा

मला हिंदू म्हणा

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

फार मोठ्या कालावधीनंतर संपूर्ण गांधी परिवार एकाच व्यासपीठावर एकत्र आला होता. राजस्थानची राजधानी आणि देशात गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये काँग्रेस पक्षाने महागाईच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पक्षाची रॅली होती महागाईच्या विरोधात, पक्षाच्या घोषणा व बॅनर्स झळकत होते मोदी सरकारच्या विरोधात आणि राहुल गांधी यांनी मात्र हातात माईक घेताच हिंदू आणि हिंदुत्वावर प्रवचन झोडायला सुरुवात केली. राहुल यांनी देशाला हिंदू आणि हिंदुत्व या दोन शब्दांतील फरक समजावून सांगितला. मी स्वत: हिंदू आहे, पण भाजप हिंदुत्ववादी आहे, असे सांगून भाजपचे हिंदुत्व हे राजकीय आहे, व्होट बँकेसाठी आहे, निवडणुका जिंकण्यासाठी आहे, असे त्यांनी जनतेला समजावण्याचा प्रयत्न केला.

राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. अशोक गहलोतसारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदावर आहेत. काँग्रेस पक्ष भाजपचा कट्टर विरोधक. केंद्रातील सत्ताधारी भाजपवर टीका करणे समजता येईल, पण महागाईविरोधी मोहिमेत हिंदू आणि हिंदुत्व यावर काथ्याकूट करण्यामागे राहुल गांधी यांचा हेतू तरी काय असू शकतो?

जयपूरच्या महागाईविरोधी रॅलीमध्ये असली हिंदू आणि नकली हिंदू असा राग राहुल गांधी यांनी आळवला. आपण स्वत: हिंदू असल्याचे राहुल यांनी आवर्जून सांगितले व आपली राष्ट्रीय प्रतिमा हिंदू बनवण्याचा प्रयत्न केला. भाजप हा हिंदुत्ववादी आहे. भाजपकडे हिंदू व्होट बँक मोठी आहे. आपण हिंदू असल्याचे सांगून राहुल गांधी भाजपकडून हिंदूंची व्होट बँक खेचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. खरे तर भाजप आपल्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर अधिक जोर देतो. हिंदुत्व आणि विकास असा दुहेरी मंत्र वापरल्याचा लाभ प्रत्येक निवडणुकीत भाजपला होतो आहे. भाजप धार्मिक प्रचार करून मते मिळवतो, असा आरोप करण्याची विरोधी पक्षांना सवयच लागली आहे, पण अशा प्रचाराने भाजपची मते कमी होत नाहीत आणि विरोधकांच्या मतांची टक्केवारी वाढत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या मंदिरात गेले म्हणून विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता. मोदींनी विधिवत राम मंदिराचे भूमिपूजन केले, तेव्हा देशाचा पंतप्रधान घटनेने धर्मनिरपेक्षतेला बांधिल असताना अयोध्येला कसा काय जाऊ शकतो, असा प्रश्न विचारला गेला. वाराणसीत जाऊन काशी विश्वेश्वर धामाचे लोकार्पण केल्यावर मोदींनी भाजपच्या प्रचाराचा नार‌ळ फोडला, अशी टीका झाली. अशी टीका करणाऱ्यांत काँग्रेसचे नेते सर्वांत पुढे होते. आता याच पक्षाचे नेते राहुल गांधी मी हिंदू आहे, असे वारंवार सांगू लागले आहेत.

मोदी केंद्रात सत्तेवर आल्यापासून काँग्रेसची देशभर घसरण झाली. लोकसभेत काँग्रेस कमालीची संकुचित झाली. आणीबाणीनंतरही काँग्रेसचे शंभरपेक्षा जास्त खासदार निवडून आले होते, पण मोदींच्या राजकीय उदयानंतर काँग्रेसला पन्नास खासदार निवडून आणतानाही घाम फुटला. एका बाजूला भगव्या वस्त्रातील योगी आदित्यनाथ आहेत व वाराणसीला गंगेत स्नान करणारे मोदी आहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधी परिवार आहे आणि ‘मी हिंदू आहे’, असा घोषा लावणारे राहुल गांधी आहेत. आपण हिंदू आहोत हे ठसविण्यासाठी राहुल ज्या राज्यात निवडणुका आहेत, तेथे वेगवेग‌ळ्या मंदिरात जाऊ लागले आहेत. यापूर्वी त्यांनी मंदिरात देवदर्शनाचा सपाटा लावला होता, पण काँग्रेसला काही देव पावला नाही. आता पुन्हा ‘मी हिंदू आहे’, असा त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जप सुरू केला आहे.

मी हिंदू आहे, हे राहुल यांना का सांगावे लागते? मतदारांनी मला हिंदू म्हणावे, अशी त्यांची का धडपड चालू आहे? महात्मा गांधी हिंदू होते, पण त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, असे उदाहरण देऊन ते भाजप कसा धोकादायक पक्ष आहे, असे सांगत आहेत. मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही, अशी भूमिका मांडली आहे. भाजप सावरकरांचे नाव घेत नाही, पण वल्लभभाई पटेल व मोहम्मद अली जीना यांची नावे घेतो, कारण त्यांना चांगले ठाऊक आहे की, सावरकरांच्या मार्गाने जाणे सोपे नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे. जो महात्मा गांधींच्या विचारांवर चालतो तो खरा हिंदू आहे व जो गोडसेला मानतो तो हिंदुत्ववादी, अशी व्याख्या राहुल यांनी केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना हिंदू कोण हे समजलेले नाही आणि हिंदुत्व काय असते हेही समजलेले नाही. भाजपचे प्रवक्ता गौरव भाटिया यांनी तर राहुल हे हिंदूही नाहीत आणि हिंदुस्तानी म्हणजे काय हेही त्यांना कळत नाही, असे म्हटले आहे. देशात सत्तेवर जे हिंदुत्ववादी बसले आहेत त्यांना खेचून बाहेर काढले पाहिजे व देशाची सत्ता हिंदूंकडे सोपवली पाहिजे, असे अजब विधान राहुल यांनी केले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला गळती लागली आहे. जेवढा काँग्रेसचा पराभव होतो, तेवढे भाजपचे संख्याबळ वाढत आहे. एक काळ असा होता की, देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. प्रत्येक निवडणुकीत हिंदू-मुसलमान, जीना-पाकिस्तान असे विषय येतात, पण मोदींसारखा शक्तिशाली व प्रभावी चेहरा राष्ट्रीय पातळीवर आला तेव्हा भाजपची चौफेर घोडदौड सुरू झाली. एका बाजूला मोदी व दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कमजोर नेतृत्व आणि काँग्रेसवर विश्वास नसलेले प्रादेशिक पक्ष, अशा स्थितीत भाजपचा सतत विस्तार होत आहे.

राहुल गांधी म्हणतात, ‘‘हिंदू हूँ, हिंदुत्ववादी नहीं, सत्याग्रही हूँ, सत्ता-ग्रही नहीं, गांधी हूँ, गोडसे नहीं, हिंदुओंको सत्ता में लाना हैं’’ राहुल गांधींच्या या वक्तव्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘‘क्या यही सेक्युलर अजेंडा हैं?’’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. अन्य कोणाहीपेक्षा शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार व कृती अधिक लढाऊ आहे, असे ते सांगत. शिवसेनेच्या मुखपत्रावरही ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक’ असे बिरूद आहे, पण आजची शिवसेना हिंदुत्वाचा तिरस्कार करणाऱ्या पक्षाला बरोबर घेऊन सत्तासुख भोगत आहे.
sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -