Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीBhagat Singh Koshyari : भारत-रशियातील सांस्कृतिक संबंध शेकडो वर्षे जुने

Bhagat Singh Koshyari : भारत-रशियातील सांस्कृतिक संबंध शेकडो वर्षे जुने

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई (वार्ताहर) : भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरीही उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. रामचरित मानस व ज्ञानेश्वरी प्रमाणेच रशियन लेखक मॅक्सिम गॉर्की, लिओ टॉल्स्टॉय, अँटन चेकॉव्ह यांचे साहित्य सर्वकालीन श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी येथे केले.

रशिया – भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे सोमवारी रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रशियातील ५० कोसॅक कलाकारांच्या चमूने ‘क्रिनित्सा’ हे संगीत, लोककला व युद्धकला यावर आधारित नृत्य सादर केले.

भारत व रशियात आज अतिशय घनिष्ठ राजकीय व राजनैतिक संबंध आहेत. सांस्कृतिक संबंध वाढल्यास हे संबंध आणखी दृढ होतील, असे मत राज्यपालांनी मांडले. पूर्वी जसे अभिनेते राज कपूर रशियात प्रसिद्ध होते तसेच आज भारतीय योग तेथे लोकप्रिय असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी आपले स्वागत भाषण संपूर्ण हिंदीत केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी राज्यपालांनी ‘क्रिनित्सा’ संगीत नृत्याचे दिग्दर्शक तसेच सर्व सहभागी कलाकारांची भेट घेऊन त्यांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, रशियाचे मुंबईतील उप वाणिज्यदूत जॉर्जी ड्रीअर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पश्चिम विभागीय अधिकारी अनुराग सिंह, रॉयल ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष दोशी व निमंत्रित उपस्थित होते.

भारतातील रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन रशियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावास, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पश्चिम विभाग व रॉयल ऑपेरा हाऊस यांच्या सहकार्याने केले होते. महोत्सवानिमित्त दिल्ली व कोलकाता येथे देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वाणिज्यदूतांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -