Monday, May 5, 2025

महाराष्ट्रपालघर

वाड्यामध्ये पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा!

वाड्यामध्ये पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा!

वाडा : वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. तसेच हरघर नल या योजनेसह अन्यही पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपये खर्च करून वाड्यात कामे झाली. काही गावात कामे अर्धवट आहेत, तर काही गावांत टाक्या उभारल्या, नळजोडण्याही दिल्या, मात्र या नळांना पाणी काही येत नसल्याने नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागतेय, तर कोणाला विहिरीवर हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या तालुक्यातील १४ गाव-पाड्यांत तीव्र पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, घोडसाखरे, दिवेपाडा, फणसपाडा, गवळीपाडा, तरसेपाडा, तसेच तुसे ग्रामपंचायत पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास, मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा, तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या योजनांचा कालावधी संपला, तरी योजना पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. काही योजनांची कामे झाली. मात्र, ती निकृष्ट दर्जाची झाली असून, काही ठिकाणची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपये खर्चूनही जर नशिबी पाणीटंचाईच असेल, तर या खर्च झालेल्या निधीचा उपयोग काय अशा शब्दांत नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. तसेच योजना अपूर्ण असलेल्या गाव-पाड्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वाडा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. डी. जाधव यांनी दिली आहे.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वाडा तालुक्यात करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, प्रशसनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. - सागर पाटील, ग्रामस्थ

Comments
Add Comment