Monday, May 20, 2024
Homeक्रीडाइंग्लंडचा ६८ धावांमध्ये खुर्दा

इंग्लंडचा ६८ धावांमध्ये खुर्दा

मेलबर्न (वृत्तसंस्था): ज्यो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा नन्नाचा पाढा तिसऱ्या कसोटीतही कायम राहिला. पाहुण्यांचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी मंगळवारी अवघ्या ६८ धावांमध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी एक डाव आणि १४ धावांनी जिंकली. नवोदित मध्यमगती गोलंदाज स्कॉट बॉलँडने अप्रतिम स्पेल टाकता अवघ्या ७ धावा देत पाहुण्यांचे ६ फलंदाज बाद केले. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच कसोटीचा निक्काल लागला. सलग तिसऱ्या विजयासह यजमानांनी अॅशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ४ बाद ३१ धावांवरून पुढे खेळताना उर्वरित ६ इंग्लिश फलंदाजांना आणखी ३७ धावांची भर घालता आली.

कर्णधार ज्यो रूटने आधीच्या धावसंख्येत आणखी १६ धावांची टाकली. त्याच्या २८ धावा पाहुण्यांच्या डावातील सर्वाधिक आहेत. बेन स्टोक्स ११ धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात केवळ याच दोघांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. तळातील पाच फलंदाजांपैकी मार्क वुड आणि ऑली रॉबिन्सनला खाते उघडता आले नाही. बोलँडने या दोघांना एकाच षटकांत माघारी धाडले.

३२ व्या वर्षी बोलँडने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पणात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात एका विकेटवर समाधान मानावे लागलेल्या बोलँडने दुसऱ्या डावात ४-१-७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी टाकली. त्याने तिसऱ्या दिवशी अवघ्या ७ धावांमध्ये ६ विकेट घेतल्या. बोलँडला मिचेल स्टार्कची (२९-३) चांगली साथ लाभली. कॅमेरॉन ग्रीनने १ विकेट घेतली. बोलँडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पहिल्या डावामध्ये इंग्लंडने १८५ धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने २६७ धावा करत ८२ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात पाहुण्यांकडून दमदार फलंदाजी अपेक्षित होती. मात्र, इंग्लंडची दुसऱ्या डावातील फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली पाहुण्यांचा दुसरा डाव २७.४ षटकांमध्ये ६८ धावांवर आटोपला.

उभय संघांतील मधील हा १३ वा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना ठरला. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने सात, तर इंग्लंडने चार सामने जिंकले. दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. दुसरीकडे, सलग तिसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियाने मायदेशातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -