Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीतीन पक्षांचे तीन विधानसभा अध्यक्ष करा

तीन पक्षांचे तीन विधानसभा अध्यक्ष करा

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा टोला

कणकवली (वार्ताहर) :‘महाविकास आघाडीच्या दोन वर्षांची कारकिर्द पहाता जनतेची लूट व प्रचंड भ्रष्टाचार दिसून येतो. त्यामुळे सभागृह चालविण्यासाठी जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी दर्जेदार विधानसभा अध्यक्ष करावा, यावर तीन पक्षांच्या सरकारचे एकमत होत नाही. म्हणून तीन पक्षांचे तीन अध्यक्ष करा’, असा टोला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हाणला. ते पुढे म्हणाले, गुप्त मतदान पध्दतीने अध्यक्षांची निवड केली जाते असा नियम आहे. प्रथा आहे. मुख्यमंत्री पहिल्यांदा सभागृहात आलेत0. त्यामुळे त्यांना सभागृहाचे नियम माहित नाहीत, अशी टीकाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केली. ‘एका पदासाठी भांडणारे लोक राज्यातील जनतेला कारभार काय देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपा जिल्हा कार्यकारणीची बैठक मंगळवारी ‘प्रहार भवन’ मध्ये झाली. या बैठकीनंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.

जिल्हा बँकेत आमचाच विजय

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आमचाच विजय अभिप्रेत असल्याचे सांगून नारायण राणे पुढे म्हणाले, आमचे विरोधक जिल्हा बँक निवडणूक का जिंकू पहात आहेत? त्यांनी जिल्हा बँकेत जी पापं केली आहेत ती त्यांना लपविता यावीत म्हणून त्यांना बँकेत परत सत्ता हवी आहे. हा सत्तेचा दुरोपयोग असल्याचा आरोप त्यांनी केला.

एवढी पोलीस फौज कशासाठी?

राज्याचे पोलीस महासंचालक,अप्पर पोलीस महासंचालक, राज्यभरातील पोलीस कणकवलीत का आलेत? इथे कोणी अतिरेकी आलेत का? पाकिस्तानी आलेत का ? असं काही घडलंय काय? नाही ना? तर स्थानिक माणसाला मारहाण झाली त्यासाठी एवढी पोलीसफौज कशासाठी? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, ज्या व्यक्तीला मारहाण झाली ती स्थानिक आहे. तो सर्वांना ओळखतो. अशा मारहाणीच्या छोट्या – मोठ्या गोष्टी सर्वत्र घडत असतात. बरं त्यात आमदार नितेश राणे यांचा काय संबंध! मारहाण करताना तिथे नितेश होता काय? केवळ विनाकारण या केसमध्ये नितेश राणे यांचे नाव गोवण्यात आले आहे. त्यांना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्यासाठी या केसमध्ये ३०७ कलम लावण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला. एका आमदारासाठी एवढी यंत्रणा लावता, अतिरेक्यांना लावलात का? असा संतप्त सवाल करून राणे म्हणाले ‘जिल्ह्यात एवढी दारू पास होताना काय करतात एस. पी.? या मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस ज्याप्रमाणे गैर वागले त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठिक आहे मी केंद्रात मंत्री आहे. इथे नितेश आमदार आहे. तो काही अशा केसेस केल्या म्हणून इथून जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा राणे यांनी दिला.

राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही ?

‘राज्यात तीन काय चार पक्षांचे सरकार आहे ते आपल्याला माहित नाही. राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही? हे आपल्याला माहित नाही. या सरकारची आपण दखलही घेत नाही’, अशा शब्दात त्यांनी सुडाने वागणाऱ्या सरकारची फिरकी घेतली. अर्थमंत्री अजित पवार यांच्या गेल्याच आठवड्यातील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याचा समाचार ना. राणे यांनी यावेळी घेतला. अर्थमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले. आपण जाहीर केलेले पैसे पोहोचलेत का,याची माहिती घेऊन त्यांनी यायला नको होते का?

लघुपाटबंधारे विभागासाठी १३ कोटींची मंजुरी असताना साडेसहा कोटी पाठविले. अद्याप एकही टेंडर नाही. आता ३ महिने राहिले. पूरपरिस्थितीत असे अनेक विषय आहेत. जिल्हा विकासाला पैसा नाही पर्यटन जिल्ह्यात ‘सी वर्ल्ड’ प्रकल्प बंद करतात कसले सरकार? मी हे सरकार मानत नाही’,असे राणे यांनी सांगितले.

मांजरीचा आवाज आणि आदित्यचा काय संबंध?

विधिमंडळात सर्वात चांगले काम नितेश राणेंचे आहे व हिच सत्ताधाऱ्यांची खरी पोटदुखी आहे.सभागृहाच्या पायरीवर म्हणे नितेशने मांजरीचा आवाज काढला. मांजरीचा आवाज आणि आदित्यचा काय संबंध? आदित्यचा आवाज तसा आहे का? तसा त्याचा आवाज नाही. मग मांजरीचा आवाज काढल्यावर त्यांना राग का यावा ? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांवरील टिकात्मक नामोल्लेख मी सहन करणार नाही

भास्कर जाधव यांनी विधीमंडळ सभागृहात पंतप्रधानांवर केलेल्या टिकेचा प्रश्न उपस्थित केल्यावर नारायण राणे संतापले. ‘त्यांनी पंतप्रधानांचा नामोल्लेख करू नये, मी ते सहन करणार नाही. ज्यांनी पंतप्रधानांची नक्कल करून टिका केली त्यांना तशाच प्रकारे नक्कलेतून उत्तर दिले जाईल. आमच्या भाजपातसुद्धा अनेक नकलाकार आहेत’असा टोलाही त्यांनी हाणला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -