Saturday, May 4, 2024
Homeअध्यात्मअपयशाने बोधता

अपयशाने बोधता

भालचंद्र मॅट्रिकच्या परीक्षेला बसला; परंतु त्याच्या नशिबाने त्याला बरोबर साथ दिली नाही. तो परीक्षेत नापास झाला आणि त्या अपयशाचा त्याला जणू धक्काच बसला व निसर्गत: त्याच्यात एक प्रकारची बोधता आली. तो वेड्यासारखा वागू लागला. कारण एक तर ममतेने जवळ ओढणारी आई, वडील ही दोन्ही श्रद्धास्थाने त्याला लहानपणीच दुरावली आणि परकीयांचे अन्न खाऊन, परिश्रमाने अभ्यास करून शेवटी अपयश पत्करावे लागले.

त्याच्या आयुष्यात असे दोन-तीन हादरे बसल्याने तो अगदी हतबल झाला होता आणि त्यामुळेच त्याच्यात विक्षिप्तपण निर्माण झाले होते. अशा घोर स्थितीत त्याचे चुलत चुलते यांनी त्याला गावी म्हापण येथे आणला व त्याच्यात काही सुधारणा होण्याच्या दृष्टीने नाना प्रयत्न आणि उपाय केले; परंतु तो काही सुधारणा होण्याच्या पंथातला नव्हता. तो कुठेतरी एकांतात जाऊन बसत असे. भूक लागली तरी जेवण मागत नसे. लहर आलीच तर आंबा, चिंच, वड अशासारख्या उंच उंच झाडांवर चढून फांदीवर गप्प बसत असे.

त्यांच्या अशा वेडसर वागणुकीमुळे घरात त्याला साहजिकच मारझोड केली जात असे. खरे पाहता तो वेडा नव्हताच. त्याचा पवित्र आत्मा थोर तत्त्व शोधात गुंतला होता. बाह्यत: वेडसर दिसणारा भालचंद्र आपल्या निष्पाप मनात निर्धार करून म्हणत असे की, माझी माता, पिता ही पवित्र दैवते या स्वार्थी जगात, मला एकट्याला टाकून गेली. तरी अशा या अनीती, अधर्म आणि अत्याचाराने बरबटलेल्या स्वार्थी जगात एक क्षणभरही न राहता प्रल्हाद, ध्रुव ज्या मार्गाने गेले त्या थोर मार्गाने आपण वाटचाल केल्यास त्यांना जी चीर आणि शाश्वत अशी शांती
मिळाली ती मलाही मिळवता येईल का? असा थोर आदर्श, दिव्य आणि ओजस्वी विचार त्याच्या निर्धार मनात एकसारखा घोळत असे.

भालचंद्राचे शिक्षणाकडे फारसे लक्ष नव्हते. बाकी अभ्यासात तो फार हुशार होता. त्याच्या आत्म्याने जरी मानव देह धारण केला असला तरी तो पुण्यात्मा होता. त्याला उपजतच दीनदुबळे आणि मुके प्राणी यांच्याविषयी फार कळवळा होता, जिव्हाळा होता. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेली आपल्या प्रिय भक्तांची जी प्रमुख लक्षणे आहेत, ती सर्व भालचंद्राच्या नसानसांत भरली होती.

‘कमल मुख हरि भजनकु दिया’ ही कबीर वाणी त्याने जणू आत्मसात केली होती. त्यामुळे सहजच त्याला नामस्मरणाचा जणू छंदच लागला होता. त्याच्या चुलत्यांची फार इच्छा होती की, भालचंद्राने अभ्यास करून पुन्हा परीक्षेला बसावे व पुढे खूप खूप शिकावे आणि हुशार व्हावे; परंतु विधिलिखित फार
निराळेच होते.
।। राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -