Thursday, May 2, 2024
Homeकोकणरायगडपाली-खोपोली महामार्गावरील अंबा नदी पूल पाण्याखाली

पाली-खोपोली महामार्गावरील अंबा नदी पूल पाण्याखाली

वाहतुकीचा खोळंबा; वाहनांच्या रांगा प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल

गौसखान पठाण

सुधागड-पाली : सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबा नदी दुथडी भरून वाहत असून पाली-वाकण-खोपोली राज्य महामार्गावर अंबा नदी पुलावरुन सोमवारी मध्यरात्री नंतर व मंगळवारी दुपारी १२ नंतर पाणी गेले. परिणामी येथील वाहतूक खोळंबून प्रवासी व विद्यार्थी यांचे पुरते हाल झाले. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडली होती. तसेच वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या.

पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाजवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, तसेच सर्व तालुका प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा व खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायणावर यांनी सांगितले.

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी पाली येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने हे प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली असून त्यांची गैरसोय झाली. तसेच पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. येथे विविध गावातून मुले शाळा व महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात. मंगळवारी अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने शाळा महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेली मुले सुद्धा पुलाच्या एका बाजूला अडकून पडली होती.

नवीन पुलाचे काम अपूर्ण

अंबा नदीवरील पूल जुना, अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे या पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा असा खोळंबा व गैरसोय झाली नसती.

अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यामुळे पलीकडे खोळंबून रहावे लागले. अनेक प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी व वाहने अडकून पडली होती. – अरविंद फणसे, प्रवासी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -