मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनने आयोजित केलेल्या एका पार्टीत शिवेसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता यांनी केला आहे. ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीवर त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला असून आता नवीन वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.

दिशा सालियान ही सुशांतची मॅनेजर होती. तिचा सुशांतच्या आत्महत्यपूर्वी मृत्यू झाला होता. त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बघतात. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सरकारला माहिती आहे की यात आदित्य ठाकरे फसलेले आहेत आणि त्यांना सरकारमधील काही मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या मुलाखतीत पन्नास वेळा सांगितले आहे की आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह प्रकरणात हात आहे. ते स्वत: यात अडकले असून त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

आतापर्यंत ५० दिवसांत या लोकांनी पुरावे बदलले असतील किंवा नष्ट केले असतील. अजून त्याची पूर्ण माहिती नाही. चौकशीनंतर सगळे बाहेर येईल. पण मला ज्या लोकांकडून काही गोष्टी कळल्या आहेत, त्यामध्ये आदित्य ठाकरे हे या बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यांमध्ये ते जात होते. दिशा सालियान आणि सुशांतसिंह या दोघांच्या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांना शंभर टक्के पूर्ण माहिती आहे. पण हे सामूहिक पद्धतीने लपवले जात आहे. दररोज शिवाजी पार्कमध्ये या लोकांच्या बैठका व चर्चा होतात, काय करायचे, आदित्य ठाकरेंना कसे वाचवायचे याबाबत तेथे चर्चा केली जाते, असाही आरोप राणे यांनी केला होता.